Latest

भारतीय विकास दर अंदाजात घट!

Arun Patil

कोल्हापूर ; राजेंद्र जोशी : बाजारातील घटती मागणी, सर्वसामान्यांच्या क्रयशक्‍तीमध्ये झालेली उतरण आणि रशिया-युक्रेन युद्धाच्या पूर्णविरामाला लागत असलेला विलंब, यामुळे आंतरराष्ट्रीय पतमानांकन संस्थांनी भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकास दराचा अंदाज घटविण्यास सुरुवात केली आहे. जागतिक बँकेने बुधवारी सादर केलेल्या अहवालामध्ये पूर्वी व्यक्‍त केलेल्या 8.7 टक्के विकास दराच्या अंदाजामध्ये घट केली असून, 2022-23 या आर्थिक वर्षामध्ये विकास दर 8 टक्क्यांवर राहील, असा जागतिक बँकेचा सुधारित अंदाज आहे.

जागतिक बँकेने द्वैवार्षिक अहवाल बुधवारी प्रसिद्ध केला. या अहवालामध्ये कोरोनानंतर भारतातील अर्थव्यवस्थेमध्ये सुधारणा होत असली, तरी बाजारातील मागणी अपेक्षेप्रमाणे वाढली नसल्याकडे तसेच वाढत्या महागाईकडे लक्ष वेधले आहे. विशेषतः, कामगारवर्गाची क्रयशक्‍ती घटल्याने त्यांच्या कौटुंबिक खर्चावर मोठा आर्थिक दबाव असल्याचे बँकेचे म्हणणे आहे. त्यांच्या अंदाजानुसार, चालू आर्थिक वर्षाच्या दुसर्‍या तिमाहीत हे परिणाम अधिक जाणवू शकतात, असे स्पष्ट केले आहे. तसेच भारतीय शेअर बाजारातून विदेशी गुंतवणूदारांनी आपला काढता पाय घेण्यास यापूर्वीच सुरुवात केल्याचा परिणामही अर्थव्यवस्थेवर जाणवतो आहे, असे म्हटले आहे.

रशिया-युक्रेन युद्ध दक्षिण आशियाई देशांमध्ये मोठा परिणाम करणार असल्याचे जागतिक बँकेचे मत आहे. यामुळेच निर्माण झालेल्या अस्थिर वातावरणात गेल्या काही दिवसांपूर्वी मोठी झेप घेण्याच्या तयारी असलेला भारतीय शेअर बाजार हुलकावण्या खातो आहे. या अस्थिर वातावरणात विदेशी गुंतवणूकदार सक्रिय होत नाहीत. त्याचा एकत्रित परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर दिसेल, असा अंदाज या अहवालातून व्यक्‍त होतो आहे.

इतर जागतिक संस्थांचे अंदाज

जागतिक बँकेबरोबरच 'फिच' या संस्थेने नव्या आर्थिक वर्षामध्ये 10.3 टक्के विकास दराचा अंदाज व्यक्‍त करीत भारतीयांना सुखद धक्‍का दिला होता. या संस्थेने आता सुधारित अंदाज 8.05 टक्क्यांवर, 'मॉर्गन स्टॅनले' या संस्थेने 8.4 टक्क्यांवरून 7.9 टक्क्यांवर, 'सिटी ग्रुप'ने 8.3 टक्क्यांवरून 8 टक्क्यांवर आपले अंदाज उतरविले आहेत. दरम्यान, भारतीय रिझर्व्ह बँकेने यापूर्वीच आपला अंदाज 7.8 टक्क्यांवरून 7.2 टक्क्यांवर आणला होता, तर एशियन डेव्हलपमेंट बँक व एस अँड पी या संस्थेने मात्र आपला अंदाज अनुक्रमे 7.5 व 7.8 टक्के इतका कायम ठेवला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT