Latest

भवानी तलवारीची प्रतिकृती ‘वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया’मध्ये

Arun Patil

ठाणे ; अनुपमा गुंडे : छत्रपती शिवाजी महाराजांची भवानी तलवार हा मराठी माणसाच्या जिव्हाळ्याचा विषय. ही तलवार लंडनच्या संग्रहालयातून आपल्या भूमीत आणण्याच्या चर्चा होतात; पण त्या हवेतच विरतात. ही तलवार येईल तेव्हा येईल; पण एका गुणवंत चित्रकाराने या तलवारीची हुबेहूब प्रतिकृती साकारून त्या तलवारीचा इतिहास रयतेच्या मनात ताजा केला आहे. त्यांचे नाव नारायण मोतीरावे. मोतीरावे यांनी भवानी तलवारीच्या प्रतिकृतीसोबतच लंडनच्याच संग्रहालयात असणार्‍या छत्रपती शिवाजी महाराजांच्या चित्राचे हुबेहुब रेखाचित्रही साकारले आहे. या दोन्हींची नोंद 'वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया'मध्ये झाली आहे. 'वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया'चे संजय आणि सुषमा नार्वेकर यांनी ही घोषणा केली. मृदंगाचार्य ह.भ.प. शिवाजी बुधकर यांच्या हस्ते त्यांना हे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

पेशाने इंजिनिअर असलेल्या; पण कलेतही तितकेच रमणारे नारायण मोतीरावे मूळचे लातूर जिल्ह्यातील उदगीरच्या भूमीतले. सध्या ते बोरिवलीत वास्तव्यास आहेत. त्यांना लहानपणापासूनच चित्रकलेची आवड आहे. रत्नजडीत भवानी तलवारीची प्रतिकृती साकारण्यासाठी त्यांना 49 दिवसांचा कालावधी लागला. तलवार आणि त्याच्या पात्यासाठी त्यांनी सागाच्या लाकडाचा तसेच ग्लॅनाईड पत्र्याचा आणि मुठीवरील नक्षीकामासाठी मिनाकारी आणि कुंदनचा वापर केला आहे. या तलवारीची लांबी 122 सेंटिमीटर आहे.

इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, मालोजी जगदाळे, प्रणव महाजन, प्रेम बढे, पवन निपाणीकर, उमेश जोशी यांच्या सहकार्याने भवानी तलवारीची माहिती त्यांनी संकलित केली. ही तलवार हुबेहुब साकारण्यासाठी इतिहास संशोधक इंद्रजित सावंतलिखित 'शोध भवानी तलवारी'चा या पुस्तकाचाही आधार त्यांनी घेतला. नोकरी सांभाळून विविध माध्यमांत ते चित्रे रंगवत, साकारत असतात. त्यांनी कागदाच्या (पेपर आर्ट) च्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र कोरीव काम करत रेखाकृतीच्या (पोर्ट्रेट) स्वरूपात साकारले आहेत. त्यासाठी त्यांनी कागद आणि ब्लेडचा वापर केला. ही रेखाकृती 4.5 बाय 3.5 फूट आहे. ही रेखाकृती साकारण्यासाठी त्यांना 26 दिवस लागले.

छत्रपतींच्या चित्राचे तसेच या तलवारीच्या प्रतिकृतीचे अनावरण संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. संभाजीराजे यांनीही मोतीरावे यांच्या या दोन्ही कलाकृतींचे कौतुक केले. या दोन्ही कलाकृतींसाठी रामरावे यांना आळंदीच्या इंद्रायणी सेवा फाऊडेंशनतर्फे कला रत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. भविष्यातही अशाच भव्य कलाकृती निर्माण करण्याचा त्यांचा मानस आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT