Latest

ब्रिटिशांना आता दोन वेळेचे जेवणही दुरापास्त!

Arun Patil

लंडन : एकेकाळी ज्यांच्या साम्राज्यावरील सूर्य मावळत नव्हता अशा ब्रिटनमध्ये आता लोकांना दोन वेळेचे अन्नही मिळणे कठीण झाले आहे. रशिया-युक्रेन युद्ध, सतत वाढत जाणार्‍या तेलाच्या किमती आणि महागाई यामुळे जगभरात खळबळ उडाली आहे. याचा सर्वाधिक परिणाम ब्रिटनमध्ये झाला आहे. एका अहवालानुसार, वाढत्या महागाईमुळे ब्रिटनमधील लोक एक वेळचे जेवण सोडत आहेत. हे अलीकडच्या काळातील सर्वात मोठे आर्थिक संकट म्हटले जात आहे. ब्रिटनमध्ये महागाईचा प्रभाव इतका वाढला आहे की, लोकांना दोन वेळेचे जेवण मिळवणेही कठीण झाले आहे. या संकटामुळे देशातील जवळपास निम्मी कुटुंबे त्यांच्या दैनंदिन आहारात कपात करत आहेत.

'विच'च्या सर्वेक्षणात ही आकडेवारी समोर आली आहे. यूएस सेन्सस ब्युरोनुसार, या वर्षाच्या मध्यभागी ब्रिटनची लोकसंख्या 5,59,77,178 इतकी होती. जवळपास 3000 लोकांमध्ये सर्वेक्षण करण्यात आले आहे. सर्वेक्षण अहवालानुसार, आर्थिक संकटापूर्वी पुरेसे आणि पौष्टिक अन्न मिळणे कठीण होत आहे. अहवालात असेही म्हटले आहे की सुमारे 80 टक्के कुटुंबांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सप्टेंबरमध्ये ब्रिटनमध्ये महागाई 10 टक्क्यांहून अधिक झाली आहे. त्याचवेळी, किरकोळ किंमत निर्देशांक 12.6 टक्क्यांवर पोहोचला, जो ऑगस्टमध्ये 12.3 टक्के होता. ऊर्जेच्या किमती वाढल्याने ब्रिटनमधील आर्थिक संकट अधिकच वाढले आहे.

रशिया-युक्रेन युद्धामुळे गॅस, पेट्रोलियम पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. त्याचबरोबर विजेचे दरही वाढले आहेत. ऊर्जेच्या किमती वाढल्याने विविध वस्तूंच्या किमतीही मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. अहवालानुसार, ब्रिटनमधील आर्थिक आणि ऊर्जा संकटामुळे लाखो लोक या हिवाळ्यात त्यांचे घर पुरेसे ऊबदार ठेवू शकणार नाहीत. अशाप्रकारे, जेवण कमी करण्याबरोबरच त्यांना थंडीचा अधिक फटका सहन करावा लागणार आहे. नवीन चलनवाढीनुसार ब्रिटनमधील महागाई 1982 च्या सुरुवातीपासून सर्वोच्च पातळीवर पोहोचली आहे.

सांख्यिकी कार्यालयाने सांगितले की, सप्टेंबरमध्ये महागाई वाढण्यात खाद्यपदार्थांचा मोठा वाटा आहे. वर्षभरापूर्वीच्या तुलनेत या काळात अन्नधान्य महागाई 14.5 टक्क्यांवर पोहोचली आहे. 1980 नंतरची अन्नधान्याची ही सर्वाधिक महागाई आहे. महागाईचा हा उच्चांक पाहता बँक ऑफ इंग्लंडकडून धोरणात्मक व्याजदरात आणखी वाढ होण्याची शक्यता बळावली आहे. ब्रिटिश मध्यवर्ती बँक महागाई 2 टक्क्यांपर्यंत खाली आणण्याचा प्रयत्न करत आहे; पण आतापर्यंत ती अपयशी ठरली आहे. देशातील आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर सत्तेतील अवघ्या 44 दिवसांनी लिझ ट्रस यांनी गुरुवारी ब्रिटनच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT