लंडन : ब्रिटिश राजघराण्यात अनेक मौल्यवान आभुषणे, मुकुट आहेत. महाराणीच्या मुकुटातील कोहिनूर हिरा हा मूळचा भारतातीलच आहे. आताही महाराणीच्या सर्व दाग-दागिन्यांमध्ये सर्वात मौल्यवान दागिना भारतातून मिळालेलाच ठरला आहे. महाराणीच्या वाङ्निश्चयावेळी हैदराबादच्या निजामाने भेट म्हणून दिलेला हिर्यांचा हार महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या खजिन्यातील सर्वात महागडा दागिना ठरला आहे. तो केवळ ब्रिटिश शाही घराण्यातीलच नव्हे तर जगभरातील राजघराण्यांमधील सर्वात महागडा दागिना आहे हे विशेष!
या शानदार हाराची किंमत सध्या 6 अब्ज 59 कोटी रुपये इतकी आहे. तज्ज्ञांनी म्हटले आहे की महाराणीच्या खजिन्यात एकापेक्षा एक सुंदर व महागडे दागिने आहेत. मात्र, या हिर्यांच्या हारापुढे अन्य सर्व दागिन्यांची चमक फिकी पडते! काही दिवसांपूर्वीच महाराणीने आपली नातसून आणि प्रिन्स विल्यमची पत्नी कॅथरिन ऊर्फ केटला हा नेकलेस परिधान करण्यासाठी दिला होता. हा हार पाहून अनेक लोक थक्क झाले. 1947 मध्ये प्रिन्स फिलीप यांच्यासमवेतच्या वाङ्निश्चयावेळी हैदराबादच्या निजामाने हा हिर्यांचा हार महाराणीला भेट म्हणून दिला होता.
एलिझाबेथ त्यावेळी 'प्रिन्सेस' होत्या आणि पाच वर्षांनी 'क्वीन' म्हणजेच 'महाराणी' बनल्या. त्यावेळी हैदराबाद संस्थानावर आसफ जाह सप्तम या निजामाचे राज्य होते. आसफ हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक होते. आभूषण तज्ज्ञ डायना बोरोमन यांनी सांगितले की हा जगातील सर्वात महागडा शाही दागिना आहे. त्याची सध्याची किंमत सुमारे 6 अब्ज 59 कोटी रुपये आहे.
विशेष म्हणजे आपल्या दागिन्यांच्या संग्रहातून राजकुमारीने स्वतःच्या पसंतीने हवा तो दागिना घ्यावा असे निजामाने सुचवले होते आणि राजकुमारीने हा हिर्यांचा हार स्वतः निवडला होता! तीन फुले एकमेकांमध्ये गुंफली असल्यासारखा हा हार आहे. महाराणीला हा हार अत्यंत आवडला आणि अद्यापही तो त्यांच्या पसंतीचा आहे. नातसून केट मिडल्टनलाही त्या अधूनमधून हा हार देत असतात. या हारामध्ये 50 पेक्षा अधिक हिरे जडवलेले आहेत.