म्युनिच ; वृत्तसंस्था : युरोपला युद्धाच्या खाईत लोटण्याचा कट रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी रचलेला आहे. 1945 नंतरचे सर्वांत मोठे युद्ध करण्याच्या तयारीत ते आहेत. दुसर्या महायुद्धानंतरचा सर्वात भयावह हल्ला पुतीन करणार आहेत, असा इशारा ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी म्युनिच येथील सुरक्षा संमेलनात दिला.
युक्रेन आणि रशियादरम्यानच्या युद्धसदृश परिस्थितीबद्दल जॉन्सन यांनी चिंता व्यक्त केली. युक्रेनची राजधानी कीवला चारही बाजूंनी घेरता येईल, अशा पद्धतीचा हल्ला करण्याची पुतीन यांची योजना आहे, असेही जॉन्सन म्हणाले. या युद्धात किती माणसांचे बळी जातील, याचा विचारच करावा, असे पुतीन यांना वाटत नसेल तर ही बाब किती भयावह आहे, याची कल्पनाच केलेली बरी, असेही बोरिस जॉन्सन म्हणाले.
असे घेरणार युक्रेनला
नॉर्वेतील डोंबास या शहराच्या सीमेवरून रशिया युक्रेनवर चढाई करणार, त्याचवेळी बेलारूसकडूनही चढाई करणार, असेही जॉन्सन यांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्या हवाल्याने सांगितले.
रशिया काय करतो आहे?
रशियाने युक्रेन सीमेलगत तीन नवी आण्विक क्षेपणास्त्रे लाँच केली आहेत. पैकी एकाचा वेग हायपरसोनिक आहे. अमेरिकन संरक्षण यंत्रणेला मात देण्याची या क्षेपणास्त्राची क्षमता आहे. दोन क्षेपणास्त्रे हवेतून मारा करणारी आहेत, तर एक समुद्रातून मारा करणारे आहे.
क्रेम्लीन वॉररूममध्ये पुतीन!
स्वत: रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन हे क्रेम्लीन वॉररूममधून 'वॉरगेम'वर देखरेख ठेवत आहेत. युक्रेन सीमेवर रशियाचे 1.70 लाख ते 1.90 लाख सैनिक तैनात आहेत. रशिया आणि शेजारी बेलारूस या देशात सीमांवर ही तैनात आहे. पूर्व युक्रेनमधील बंडखोरांचाही त्यात समावेश आहे.