Latest

बेळगावची डोकेदुखी दिल्लीपर्यंत.. भाजपसमोर उमेदवारीचा तिढा; उपमुख्यमंत्री फडणवीस करणार मध्यस्थी

दिनेश चोरगे

बंगळूर; पुढारी वृत्तसेवा :  येत्या 10 मे रोजी होणार्‍या विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी यादी जाहीर करताना भाजपसमोर बेळगाव जिल्हा हा सगळ्यात मोठी डोकेदुखी ठरला आहे. भाजपला सत्तेवर आणणारे किंगमेकर रमेश जारकीहोळी यांनी चार मतदारसंघासाठी हट्ट धरल्याने भाजपची पहिली यादी रखडली आहे. यावर तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मध्यस्थी करण्याची शक्यता आहे. ती यशस्वी ठरल्यास 10 एप्रिलनंतर भाजपची पहिली यादी जाहीर होईल. ती यादी निश्चित करण्यासाठी दिल्लीत शनिवारी भाजपच्या संसदीय पक्षाची बैठक झाली. पण तोडगा निघालेला नाही.

बेळगाव जिल्ह्यातील 18 मतदारसंघांबरोबरच राज्यातील 224 पैकी सुमारे सुमारे 40 मतदारसंघात भाजपकडून प्रत्येकी 4 इच्छुक आहेत. ही भाजप हायकमांडसाठी डोकेदुखी ठरली आहे. त्यावर तोडग्यासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी उमेदवारांच्या निवडीसंदर्भात नवी दिल्लीत संसदीय पक्षाची बैठक घेतली. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा, प्रदेशाध्यक्ष नलीनकुमार कटील, संघटन सचिव संतोष आदी नेते सहभागी होते या बैठकीत कोअर कमिटीने सादर केलेल्या संभाव्य उमेदवारांच्या यादीचा सखोल आढावा घेण्यात आला.

जारकीहोळींची सरशी?

रमेश जारकीहोळी यांनी बेळगाव जिल्ह्यातील बेळगाव ग्रामीण, कागवाड आणि अथणी मतदार संघात आपल्या पसंतीच्या नेत्यांना उमेदवारीची मागणी केली आहे. त्यामुळे माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी हे विधान परिषद सदस्य असल्याने त्यांना विधानसभेसाठी तिकीट देण्याची शक्यता नसल्याचे बोलले जाते. त्याऐवजी अथणी मतदारसंघातून रमेश जारकीहोळी यांचे निकटवर्तीय महेश कुमठळ्ळी यांना तिकीट दिले जाण्याची शक्यता आहे. तसेच कागवड मतदारसंघातून जारकीहोळी यांचे निकटवर्तीय श्रीमंत पाटील यांना तिकीट मिळण्याची शक्यता आहे, मात्र जारकीहोळी यांची दुसरी मागणी बेळगाव ग्रामीणची असून, मतदारसंघातील उमेदवाराबाबतचा आपला निर्णय अंतिमच आहे, असे जारकीहोळींचे म्हणणे आहे. इथून त्यांनी नागेश मन्नोळकर यांना उमेदवारी देण्याची मागणी केली आहे.
हावेरी जिल्ह्यातील राणेबेन्नुर मतदार संघातील विधान परिषद सदस्य आर.शंकर यांनी उमेदवारीचा हट्ट धरला आहे. तिकीट न दिल्यास अपक्षलढवण्याची त्यांनी धमकी दिली आहे. बागलकोट मतदार संघातील विद्यमान आमदार वीरेंद्र यांच्या ऐवजी मल्लिकार्जुन चरंतीमठ यांना उमेदवारी जाहीर करण्याची शक्यता असल्यामुळे येथे बंडखोरी होण्याची शक्यता आहे.

फडणवीस महत्त्वाच्या भूमिकेत

बेळगावच्या 18 मतदारसंघांतल्या इच्छुक उमेदवारांनी महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडसणवीस यांच्याशी संपर्क साधला असून ते मध्यस्थ्याची भूमिका घेण्याची शक्यता आहे. रमेश जारकीहोळी यांनीही फडणवीस यांच्याच माध्यमातून केंद्रीय नेतृत्वावर दबाव आणला आहे. रमेश जारकीहोळी यांनी कर्नाटक आणि महाराष्ट्रात भाजपचे सरकार आणण्यासाठी महत्त्वपूर्ण प्रयत्न केले. कर्नाटकात तर ते भाजपसाठी किंगमेकरच होते. त्यामुळे त्यांना न दुखावता यादी निश्चित करण्याची कसरत भाजप करत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT