Latest

बेळगाव : वीस मिनिटांत दाम दीडपटचे आमिष; क्रिप्टो करन्सीच्या नावे लाखोंची फसवणूक

मोनिका क्षीरसागर

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा :  शेअर मार्केटच्या धर्तीवर क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक केल्यास 20 मिनिटांत 60 टक्के नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून लोकांना फसविणार्‍या दोघांना बंगळूर पोलिसांनी बेळगावातून अटक केली. विशेष म्हणजे हे दोघेजण बेळगाव जिल्ह्यातील आहेत. किरण भरतेश (वय 20) व अर्शद मोईद्दिन (वय 21, दोघेही रा. हारुगेरी, ता. रायबाग, सध्या रा. बेळगाव) अशी संशयितांची नावे आहेत.

या दोघा भामट्यांनी अनेक गुंतवणूकदारांकडून 3 हजारांपासून 40 हजारांपर्यंत ऑनलाईन रक्‍कम घेऊन लाखो रुपयांची फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले आहे. बंगळूर दक्षिण सीईएन विभागाने ही कारवाई केली.

उपरोक्‍त दोघा संशयितांनी इन्स्टाग्रामवर अनेक खाती खोलून बनावट जाहिरातबाजी केली होती. यामध्ये म्हटले होते की वेगवेगळ्या क्रिप्टो करन्सीमध्ये रक्‍कम गुंतवा व अवघ्या 20 मिनिटांमध्ये 60 टक्के अधिक परतावा मिळवा, अशा आशयाची ती जाहिरात होती. त्यांनी अशी अनेक खाती बनवून त्याद्वारे तब्बल 10 हजार फॉलोअर्स बनवले होते. यापैकी अनेकांकडून हे भामटे बँक खात्यावर ऑनलाईन, गुगल-पे, फोन-पेद्वारे हे रक्‍कम ट्रान्स्फर करून घेत होते. यानंतर संबंधितांशी संपर्क बंद करत होते. अनेकजण किरकोळ रकमेला फसलो, असे समजून तक्रार करत नव्हते. त्यामुळे या भामट्यांनी लाखो रुपयांची माया जमवल्याचा संशय आहे.

बंगळुरात फिर्याद

इन्स्टाग्रामवर जाहिरात वाचून यलहंका येथील अबीन शहद नामक व्यक्‍तीने 26 हजार रुपयांची रक्‍कम भामट्यांनी सांगितल्यानुसार ऑनलाईन पाठवली. परंतु, त्यांचा प्रतिसाद बंद झाल्यानंतर त्यांनी याबाबतची तक्रार बंगळूर सीईएन पोलिसांकडे केली. अशाच आशयाची आणखी एक तक्रार बंगळुरातील बनशंकरी परिसरातूनही दाखल झाली. या दोन्ही तक्रारींची पडताळणी करून सीईएन बंगळूर दक्षिण विभागाने याची चौकशी सुरू केली. ट्रॅकरद्वारे दोघांची माहिती घेतली असता हे दोघेजण बेळगावातून हे करत असल्याचे स्पष्ट झाले. सोमवारी बंगळूर सीईएन पथकाने या दोघांना बेळगावातून अटक केली.

फसवणूक सुचली कशी?

हे दोघे तरुण बेळगावातील एका नामांकित कॉलेजमध्ये शिक्षण घेतात. यापैकी अर्शदने बीए पूर्ण केले आहे, तर किरण हा बी. कॉमचे शिक्षण घेत आहे. दोघेही घनिष्ठ मित्र आहेत. बीट कॉईनसह अन्य क्रिप्टो करन्सीमध्ये रक्‍कम गुंतवली तर काही मिनिटांतच ती दीडपट होते, अशा आशयाची जाहिरात त्यांनी तीन महिन्यांपूर्वी इन्स्टाग्रामवर पाहिली होती. त्या जाहिरातीला भुलून दोघांनी मिळून 4 हजारांची रक्‍कम एका अनोळखी व्यक्‍तीच्या खात्यावर जमा केली. यानंतर त्या भामट्याने संपर्क तोडून या दोघांना फसवले. मग दोघांनाही कल्पना सुचली की आपणही लोकांची अशारितीने फसवणूक केली तर आपल्यालाही बक्‍कळ पैसा मिळेल. म्हणून त्यांनी अशी जाहिरातबाजी करत ऑनलाईन रक्‍कम उकळण्यास प्रारंभ केला खरा. परंतु, ते अलगद पोलिसांच्या जाळ्यात अडकले.

फसवणूक होते कशी?

आभासी चलन अर्थात क्रिप्टो करन्सी तब्बल 100 हून अधिक प्रकारची आहे. यापैकीच एक म्हणजे बीट कॉईन. कोरोनापूर्वी एका बीटकॉईनचे मूल्य सुमारे 50 लाखांवर होते. कोरोना काळात हे 5 मूल्य लाखांवर आले होते. आता पुन्हा या करन्सीने उभारी घेतली असून अंदाजे 36 लाखांपर्यंत मूल्य गेले आहे. या क्रिप्टो करन्सीचा दर दररोज बदलत असतो. असाच दर अन्य करन्सींचाही बदलत असतो. तुम्ही अमूक इतक्या रकमेला खरेदी करा व आम्ही सांगतो तेव्हा विका, असे सांगत आपल्या खात्यावर रक्‍कम पाठवा, तुम्हाला नफा मिळवून देतो, असे हे भामटे सांगतात. ज्यांना याबद्दल फारशी माहिती नसते ते आंधळेपणाने 4 हजारापासून 40 हजारांपर्यंत रक्‍कम पाठवतात व फसतात. असाच फसवणुकीचा प्रकार या दोघा भामट्यांकडून देखील सुरू होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT