बेळगाव; पुढारी ऑनलाईन: बेळगाव महापालिका निवडणूक : बेळगाव मनपा निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक ४९, ५२ आणि ३९ नंबर प्रभागातील काही मतदारांची नावे गायब झाल्याने शहरात गोंधळ निर्माण झाला. यानंतर जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी यावर आता मी काय करू शकत नसल्याचे ' दै. पुढारी' शी बोलताना सांगितले आहे.
जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ म्हणाले की, यापूर्वीच आम्ही अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केले होती. याबाबत आक्षेप मागविण्यात आले होते. त्यानुसार यादी दुरुस्त करण्यात आली आहे. जुलैनंतर एकही तक्रार आलेली नाही. परंतु, आता मतदार यादीतून मतदारांची नावे गायब झाली असल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.
यादी प्रत्येक राजकीय पक्षाकडे दिली होती, त्यावेळी कुणीही तक्रार केली नव्हती. मात्र, आता तक्रारी येत आहेत. यावर आता मतदान प्रक्रिया रोखता येत नाही. आता मी यावर काहीही करू शकत नाही. प्रशासनाने मतदान केंद्र निहाय ही मतदार यादी दिली होती, अशी माहिती जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी ' दै. पुढारी'शी बोलताना दिली.
यापुढे निवडणुकीदरम्यान मतदार यादीमध्ये नावे नसल्याच्या बहुतांशी तक्रारी प्रत्येक प्रभागात आढळून आल्या आहेत. नागरिक मतदानासाठी आपली नावे यादीत शोधताना दिसत होते. जाधव नगरमधील १०० हून अधिक नावे नसल्याच्या तक्रारी पुढे आल्या आहेत. याबाबत नागरिकांनी आ. अनिल बेनके यांच्याकडे तक्रारी केल्या आहेत. त्यानी यासंदर्भात न्यायालयात जाणार असल्याचे माहिती त्यांनी यावेळी सांगितली.
दरम्यान दुपारी तीन वाजेपर्यंत एकूण ३३.८७ टक्के मतदान झाले आहे. एकूण मतदार ४ लाख ३० हजार १२५ असून यापैकी दुपारी तीन वाजेपर्यंत एक लाख ४५ हजार ९१५ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. यामध्ये ७८ हजार १२९ पुरुष तर ५७ हजार ७८६ महिला मतदारांचा समावेश आहे.
खासदार मंगल अंगडी यांनी आज त्यांच्या मुली श्रद्धा आणि स्फूर्ती अंगडी यांच्या समवेत सरकारी मराठी प्राथमिक शाळा क्रमांक ४१ सदाशिवनगर येथे आपल्या मतदानाचा हक्क बजावला.
हेही वाचलंत का?