Latest

बेळगाव झाले ‘जल’गाव; अनेक घरांत पाणी, दहाहून अधिक घरांचे नुकसान

अमृता चौगुले

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : सलग तीन दिवस संततधार कोसळत असलेल्या पावसामुळे शहरात पाणीच पाणी झाले. शहर आणि उपनगरात दहाहून अधिक घरे कोसळली आहेत. अनेक घरांत पाणी शिरले आहे. अनेक चुकीच्या विकास कामांचा लोकांना फटका बसला असून महापालिका आणि जिल्हा प्रशासनाची कसरत सुरू झाली आहे.

रविवारी (दि. 7) रात्री आणि सोमवारी (दि. 8) पहाटेपर्यंत संततधार पाऊस कोसळला. दिवसभरही जोरदार पाऊस झाला. त्यामुळे वडगाव येथील केशव नगर, अन्‍नपूर्णेश्‍वरी नगर, शास्त्रीनगर, गांधीनगर, पंजीबाबा, शिवाजीनगर, महांतेशनगर, एस. व्ही. कॉलनी, मराठा कॉलनी, भारत नगर, हरीकाका कंपाऊंड, रघुनाथ पेठ अनगोळ, मारुतीनगर, उज्ज्वलनगर आदी परिसरात पाणी तुंबून राहिले. महांतेशनगर, श्रीनगर, ओमनगर येथील अनेक घरांत पाणी शिरले. त्यामुळे लोकांची धावपळ उडाली. अनेक घरांतील संसारोपयोगी साहित्य पाण्यात भिजले.

महापालिकेने अनेकदा दावा करून ठिकठिकाणी गटारी, नाले स्वच्छ झालेनाहीत. त्यामुळे शहरात दुसर्यांना पाणी तुंबून राहिले आहे. स्मार्ट सिटी योजनेतून अनेक ठिकाणी कामे अपूर्ण आहेत. पाणी जाण्यास मार्ग नाही, त्यामुळे रस्त्यांत पाणी तुंबून राहिले.

गांधीनगर, फोर्ट रोड, बी. एस. येडियुराप्पा मार्ग, एसपीएम रोड, टिळकवाडीतील काही भागात पाणी तुंबून होते. त्यामुळे वाहतूक मंदावली होती. बळ्ळारी नाल्यातून व्यवस्थित पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे शहरात पाणी तुंबून राहण्याची समस्या निर्माण झाली आहे. याशिवाय शिवारातही पाणी तुंबून राहात असल्यामुळे शेतकर्यांतून संताप व्यक्त होत आहे. दुबार पेरणीही वाया जाण्याची भीती व्यक्त होत आहे.

तत्काळ मदत, जेवणाचे किटस्

शहरात विविध ठिकाणी घरांत पाणी शिरल्यामुळे महापालिकेकडून लोकांना जेवणाचे किटस् वाटप करण्यात आले. तर ज्यांच्या घरांची पडझड झाली आहे, अशा लोकांना तत्काळ आर्थिक मदतही करण्यात आली. भारतनगर, केशवनगर परिसरात जिल्हाधिकारी नितेश पाटील, महापालिका आयुक्‍त डॉ. रूद्रेश घाळी यांच्या हस्ते ही मदत देण्यात आली. यावेळी महापालिका उपायुक्‍त भाग्यश्री हुग्गी, महसूल निरीक्षक यल्‍लेश बच्चलपुरी आदी उपस्थित होते.

शाळांच्या सुट्टीबाबत परिस्थितीनुसार निर्णय

परिस्थिती लक्षात घेऊन बुधवारी शाळा-महाविद्यालयांना सुट्टी द्यायची की नाही याबाबत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी पाटील यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT