Latest

बॅटरी 3 मिनिटांत चार्ज होणार; 20 वर्षे टिकणार

Arun Patil

नवी दिल्ली ; वृत्तसंस्था : अवघ्या तीन मिनिटांत चार्ज होणारी खास बॅटरी अमेरिकेतील एडन एनर्जी या हार्वर्ड विद्यापीठाशी संबंधित स्टार्टअपने विकसित करून बॅटरीच्या क्षेत्रात जणू चमत्कारच घडवला आहे. या बॅटरीचे आयुष्य 20 वर्षे असेल, असा दावा करण्यात आला आहे. याचा फायदा प्रामुख्याने विद्युतशक्तीवर चालणार्‍या म्हणजेच इलेक्ट्रिक व्हेईकल्सना मोठ्या प्रमाणावर होणार आहे. विशेष म्हणजे, या क्रांतिकारी उत्पादनामुळे पर्यावरणाचेही जतनही केले जाणार आहे.

हार्वर्ड विद्यापीठाच्या तंत्रज्ञान विकास विभागाने या स्टार्टअपला 5.15 मिलियन डॉलर्स उपलब्ध करून दिले आहेत. या निधीतून एडन एनर्जीने या अनोख्या बॅटर्‍या विकसित केल्या आहेत. दिवसेंदिवस गॅरेजमधील जागादेखील घटत जाणार आहे. त्यामुळे बॅटर्‍या चार्ज करतानाही कसरत करावी लागेल. हा मुद्दा लक्षात घेऊन आम्ही नव्या बॅटर्‍या विकसित करण्यावर लक्ष केंद्रित केले आणि त्याला चांगले यश लाभल्याची माहिती एडन एनर्जीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विल्यम फिट्झहुग यांनी दिली. दीर्घकाळ बॅटरी चार्ज करा, त्यावर लक्ष ठेवा, या कटकटीतून आता कारचालकांची मुक्तता होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

यापुढे विद्युतशक्तीवर चालणारी वाहने ही चैन नसेल. भविष्यात इंधनाची टंचाईदेखील जाणवणार आहे. त्यामुळे विद्युतशक्तीवर चालणार्‍या वाहनांना पर्याय नसेल. त्याचा विचार करूनच ही क्रांतिकारी बॅटरी विकसित करण्यात आली आहे. जर विद्युतशक्तीवर चालणार्‍या वाहनांना सर्वोच्च प्राधान्य दिले, तर हरितवायूचे प्रमाण सोळा टक्क्यांनी घटू शकेल, असा निर्वाळा हार्वर्ड विद्यापीठातील सहयोगी प्राध्यापक शीन ली यांनी दिला आहे.

पर्यावरणपूरक बॅटरी

लिथियम मेटल टेक्नॉलॉजीचा अवलंब करून या बॅटर्‍यांची निर्मिती करण्यात आली आहे. आता लवकरच या बॅटर्‍यांचे व्यावसायिक तत्त्वावर उत्पादन सुरू केले जाणार आहे. या बॅटरीमुळे वाहने दीर्घकाळ धावतील आणि त्याद्वारे धुराचे लोट व विषारी वायू हवेत पसरण्याचा विषयच उरणार नाही. त्याद्वारे पर्यावरणाचे जतन केले जाईल. म्हणजेच एक प्रकारे या नव्या बॅटर्‍या पर्यावरणपूरकही ठरणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT