दुबई : जगातील सर्वात उंच इमारत असलेल्या बुर्ज खलिफाच्या चारही बाजूने एक टिकाऊ कडे तयार करण्यात येणार आहे. हे कडे अगदी शनी ग्रहाच्या कड्यासारखे दिसणार आहे. या कड्याची कल्पना जेनेरा स्पेस या आर्किटेक्चर फर्मच्या वतीने मांडण्यात आली आहे.
बुर्ज खलिफाभोवती तयार करण्यात येणारे हे कडे एखाद्या भविष्यातील इमारतींसारखे असणार आहे. तसेच ही रिंग 550 मीटर उंचावर बांधण्यासाठी डिझाईन करण्यात आली आहे.
यामध्ये घरे, सार्वजनिक आणि व्यापारी आस्थापने असतील. या कड्याचे वैशिष्ट्य म्हणजे ती बुर्ज खलिफाला सर्व बाजूने घेरणार आहे. तसेच सुमारे तीन कि.मी. इतका या रिंगचा व्यास असणार आहे. जेनेरा स्पेसच्या वतीने सोशल मीडियावर या भविष्यातील कड्याची छायाचित्रे शेअर करण्यात आली आहेत. ही रिंग उभारण्याचा उद्देश म्हणजे एक सिंगल मेगा बिल्डिंग कॉम्प्लेक्सच्या रूपात अतिकुशल शहरी केंद्राची निर्मिती करणे हा आहेे. मात्र, ही रिंग गगनचुंबी बुर्ज खलिफापेक्षा पूर्णपणे वेगळी असेल.
रिंगमध्ये तयार करण्यात येणार्या इमारतीत एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी जाण्यासाठी सस्पेंडेड पेरिफेरल पॉडस् तयार असतील. हे इमारतीला लटकून रेल्वे नेटवर्क तयार करतील. तसेच येथे सर्व त्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असतील, असे जेनेरा स्पेसने म्हटले आहे.