तांत्रिक प्रगतीच्या जमान्यात बिग डेटा अॅनालिस्ट हा कारकीर्द घडवण्यासाठीचा उत्तम पर्याय आहे. विविध माहिती हाताळण्याची आवड असेल तर हा पर्याय तुमच्यासाठी आव्हानात्मक आणि अधिक पगार मिळवून देणारा आहे. या क्षेत्रात उल्लेखनीय काम करण्यास सुरुवात करता येईल.
बिग डेटा म्हणजे डिजिटल डेटा. आपण फेसबुक, ट्विटर, व्हॉटस् अॅप सारख्या सामाजिक संकेतस्थळावर ज्या गोष्टी शेअर करत असतो किंवा ऑनलाईन पद्धतीने मागवत असतो ती माहिती म्हणजे बिग डेटा. याला आजच्या जगात प्रचंड महत्त्व प्राप्त झाले आहे.
ही सर्व माहिती म्हणजे कंपनीच्या सर्व्हरवर कायम साठवल्या जाणार्या सूचना असतात. त्या कधीच नष्ट होत नाहीत, पण हीच जुनीपुराणी माहिती कंपन्यांसाठी खूप महत्त्वाची आहे. कारण अनेक कंपन्यांचे पूर्ण व्यवसायच या डिजिटल माहितीवर विसंबलेला आहे. या माहितीमधून मिळणार्या तथ्यांच्या आधारेच कंपन्या पूर्व अंदाज बांधून आपली वितरण विपणनाची धोरणे आणखी मजबूत करू शकतात. याच कारणांमुळे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात एकीकडे नोकर्या कमी होत आहेत, त्याचवेळी बिग डेटा अॅनालिटिक्स, डेटा व्हिज्युलायझेशन, मशिन लर्निंग इत्यादी क्षेत्रांतील तंत्रज्ञांची मागणी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. एका अंदाजानुसार देशात अजूनही 2 लाख डेटा अॅनालिस्टची गरज भासते आहे. विशेषतः टेक्नॉलॉजी क्षेत्रातील कंपन्या, बँका, विमा कंपन्या तसेच आर्थिक क्षेत्रातील कंपन्यांकडून डेटा अॅनालिस्टची सर्वाधिक मागणी होते आहे. यामागे एक कारणही आहे अमेरिकेनंतर जगात अॅनालिटिक्स हब म्हणून भारताची ओळख निर्माण झाली आहे. त्यामुळेच युरोपीय देशांतही अशा प्रकारच्या तज्ज्ञांना मोठी मागणी आहे.
आज डेटा अॅनालिटिक्स क्षेत्रात कुशल लोकांची मागणी सरकारी आणि खासगी दोन्ही क्षेत्रांत आहे. ज्या वेगाने डिजिटलायझेशन येऊ घातले आहे ते पाहता येत्या काही वर्षांत बिग डेटा एक प्रगतिशील क्षेत्र म्हणून पुढे येईल. डेटा विज्ञानाच्या अभ्यासकांच्या मते बांधकाम, उपयुक्तता, तेल, गॅस, खाणकाम, हॉस्पिटल आणि आरोग्य सुविधा, वाहतूक आणि निर्मिती यांसारख्या कंपन्यांमध्येही डेटा अॅनालिस्टसाठी नोकरीच्या संधी सातत्याने वाढत आहेत. संशोधनात रुची असेल तर कोणत्याही महाविद्यालय किंवा विद्यापीठ यांच्या संशोधन विभागातही काम करता येते.
डेटा अॅनालिटिक्सच्या क्षेत्रात पदवी, पदव्युत्तर पदवी किंवा पीएच.डी. करून चांगली कारकीर्द घडवता येते. खासकरून अभियांत्रिकी, एमबीए, अकाऊंटिंग, स्टॅटिस्टिक्स, मॅथेमॅटिक्स किंवा कॉम्प्युटर सायन्समध्ये असलेली पदवी उपयुक्त ठरते, पण तांत्रिक क्षेत्रातील असाल तर मात्र या क्षेत्रात अधिक प्रगती करण्यास नक्कीच वाव आहे. कारण डेटा अॅनालिटिक्स क्षेत्रात तांत्रिक ज्ञान असणे आवश्यक आहे. आयआयटीसह अनेक विद्यापीठांमध्ये डेटा अॅनालिटिक्समध्ये पूर्णवेळाचा अभ्यासक्रम चालवत आहेत. हा अभ्यासक्रम एक वर्षापासून ते दोन वर्षांपर्यंतच्या कालावधीचा आहे. हा अभ्यासक्रम पदवीनंतर करता येऊ शकतो. हा अभ्यासक्रम ऑनलाईन पद्धतीनेही करता येतो. अनेक खासगी संस्था बिग डेटा अॅनालिटिक्समध्ये शॉर्ट टर्म कोर्सही चालवतात. नोकरीमध्ये बदल करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या लोकांसाठी हा कोर्स उपयुक्त आहे.
पात्रता-
कुशल अॅनालिटिक्स होण्यासाठी गणित आणि स्टॅटिस्टिक खूप चांगले असले पाहिजे. सध्याच्या नोकरीच्या स्वरूपाची चर्चा केल्यास डेटा वैज्ञानिकांपैकी 92 टक्के व्यक्ती अशा आहेत ज्या व्यक्तींकडे उच्च शैक्षणिक पदवी आहे आणि रुबी, पायथॉनसारखी प्रोग्रॅमिंग कौशल्ये ज्यांनी आत्मसात केली आहेत.
जान्हवी शिरोडकर