Latest

बाळासाहेबांनी सत्तेसाठी कधीच तडजोड केली नाही : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Arun Patil

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : बाळासाहेब ठाकरे यांचा मूलमंत्र 80 टक्के समाजकारण, 20 टक्के राजकारण हा होता. हाच मूलमंत्र घेऊन आपण पुढे चाललो आहे. सत्तेसाठी, मुख्यमंत्रिपदासाठी त्यांनी कधीही तडजोड केली नाही, आपल्या विचारांशी कधी त्यांनी तडजोड केली नाही. हे त्यांच्याकडून आम्ही शिकलो, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी सांगितले.

ते रिमोट कंट्रोल होते. मात्र, स्वत:ला काही पाहिजे म्हणून त्यांनी कधी रिमोट कंट्रोल चालवला नाही, असेही ते म्हणाले. विधानभवनात स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राच्या अनावरणप्रसंगी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते.

सगळ्यांची भाषणे झाली आहेत. सगळ्यांनी चौकार, षटकार मारले आहेत. आजचा दिवस सर्वांसाठी महत्त्वाचा आणि आनंदाचा आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्यावर प्रेम करणार्‍या, त्यांच्या विचारांवर प्रेम करणार्‍या प्रत्येकासाठी हा कार्यक्रम अतिशय अनमोल आहे, असे सांगत मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे अभिनंदन करतो, त्यांनी आमची विनंती तत्काळ मान्य केली आणि त्यांच्या जयंती दिवशी या कार्यक्रमाचे आयोजन केले.

पाकिस्तानही बाळासाहेबांना घाबरे त्यावेळीस पाकिस्तान कुठल्याही नेत्याला, राष्ट्रपती, पंतप्रधानांना घाबरत नव्हता. फक्त एकाच नावाला घाबरत होता. ते नाव बाळासाहेब ठाकरे. ऐवढे मोठे नेतृत्व ते होते, असे सांगत मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, अगदी छोट्या छोट्या गोष्टींकडेदेखील बाळासाहेबांचे लक्ष असायचे. नागरिकांच्या प्रश्नांवर बारीक लक्ष त्यांचे होते. यामुळेच गेली 25-30 वर्षे ठाण्याची सत्ता बाळासाहेबांच्या शिवसेनेकडे आहे. तुमच्याकडे आत्मविश्वास असेल, तर जगातील कोणतीही शक्ती तुम्हाला रोखू शकणार नाही, असे बाळासाहेब नेहमी सांगायचे. त्याचा अनुभव आपण सर्वजण आता घेत आहोतच. अन्यायाविरोधात लढण्याची ताकद त्यांनीच आम्हाला दिली.

बाळासाहेबांमुळेच शेतकर्‍याचा मुलगा मुख्यमंत्री

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे माझ्यासारखे सामान्य शिवसैनिक विधानसभेपर्यंत पोहोचू शकले, लोकसभेपर्यंत पोहोचू शकले, असे सांगत मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, त्यांच्या विचारांनी माझ्यासारखे कार्यकर्ते प्रभावित झाले. त्यांच्या विचारांचा पगडा, त्यांची भाषणे ऐकत, त्यांना पाहत आम्ही इथपर्यंत पोहोचलो आणि बाळासाहेबांच्या विचारांचे सरकारदेखील आम्ही स्थापन केले. मी मुख्यमंत्री असताना बाळासाहेबांचे तैलचित्र लावले जात आहे. हा माझ्यासाठी अतिशय महत्त्वाचा क्षण आहे. लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही, बाळासाहेबांनी प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी केली. सत्ता सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचवण्याचे काम केले. त्यांच्यामुळेच शेतकर्‍याचा मुलगा मुख्यमंत्री होऊ शकला.

अन्याय होतो तिथे पेटून उठा, अन्यायाविरोधात लढा ही बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण. त्यांनी एकदा शब्द दिला की दिला. एकदा दिलेला शब्द ते फिरवत नव्हते. तेच आम्ही त्यांच्याकडून शिकलो. अन्यायाविरोधात लढण्याची ताकद, धाडस त्यांनी आम्हाला दिले. ते ठाण्यात यायचे त्यावेळी अभिमानाने सांगायचे, हा एकनाथ शिंदे आनंद दिघेंच्या तालमीत तयार झालेला आहे. आता मला ठाण्याची चिंता नाही. ते ऐकल्यानंतर ऊर भरून यायाचा, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

एकदा काही मुस्लिम बांधव 'मातोश्री'मध्ये आले होते. नमाजाची वेळ झाल्यावर त्यांना नमाज पठण करण्यासाठी बाळासाहेबांनी जागा दिली; पण देशात राहून पाकिस्तानचे गोडवे गात होते त्यांच्यासाठी बाळासाहेबांचे काय मत होते हे सर्वांनाच माहीत आहे, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT