Latest

बालदिन विशेष : ‘बालकल्याण’ संकल्पनेचे प्रणेते राजर्षी छत्रपती शाहू महाराज

निलेश पोतदार

'आमची सर्व प्रजा सुखी असावी. तिचे कल्याणाची सतत वृद्धी व्हावी व आमचे संस्थानची हरएक प्रकारे सदोदीत भरभराट होत जावी, अशी आमची उत्कट इच्छा आहे', अशा व्यापक भावनेने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी शिवछत्रपतींच्या रयतेच्या कल्याणकारी राज्याचा वारसा जपत तो विकसित केला. इतर सर्व घटकांप्रमाणेच बालकल्याणासाठी विशेष प्रयत्न केले.

मुले राष्ट्र घडविणारी भावी पिढी असते. यामुळेच कल्याणकारी राज्यात शासनाकडून शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा, महिला व  मागासवर्गीयांच्या विकासाबरोबरच बालकल्याणाला महत्त्व दिले जाते. या विचारांचे कृतिशील कार्य तब्बल 100 वर्षांपूर्वी राजर्षी शाहू महाराज यांनी आपल्या राज्यात करून दाखवले होते. अनाथालय, पाळणाघर, गाव तेथे शाळा, मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण, सर्व जाती-धर्मीयांसाठीची विद्यार्थी वसतिगृहे, बालविवाह प्रतिबंधक धोरण, विविध खेळांना प्रोत्साहन व पाठबळ अशा अनेक महत्त्वपूर्ण योजना त्यांनी यशस्वीपणे राबवल्या होत्या.

बालकल्याणा संदर्भातील विविध अध्यादेश

17 जानेवारी 1910 रोजी राजर्षींनी अनाथ व बेवारस मुलांच्या संगोपनाची व्यवस्था अल्बर्ट एडवर्ड हॉस्पिटलमध्ये करण्यासाठीचा जाहीरनामा काढला होता. रजपूतवाडी कॅम्प येथील 'कर्नल वुडहौसी अनाथ विद्यार्थी बोर्डिंग हाऊस'मधील विद्यार्थ्यांच्या जेवण, कपडे, पुस्तके वगैरेकरिता दरमहा 600 रुपये याप्रमाणे दर सालचे 7 हजार 200 रुपये बजेट वाढविण्याचे आदेश देण्यात आले होते.

तर श्री. स. सौ. राणीसाहेब महाराज यांच्याकडील अनाथ मुलांच्या खर्चासाठी दरमहा 300 याप्रमाणे दर सालचे 3 हजार 600 रुपये बजेट वाढवून देण्याचे आदेश राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी दि. 11 जानेवारी 1920 रोजी दिले होते. तसेच या अनाथ मुलांच्या पुनर्वसनासाठी त्यांना स्वालंबी बनविण्यासाठी धार्मिक शिक्षण देऊन पुरोहित करण्यासाठी 3 मे 1921 रोजी परवानगी दिली होती.

दुष्काळातील 'पाळणाघर' संकल्पना

राजर्षी शाहूंच्या काळात इसवी सन 1896-97 व 1899-1900 या दोन मोठ्या दुष्काळांसह 1901-02, 1905-06 व 1918-19 या तीन असे एकूण 5 दुष्काळ पडले होते. अशा संकटकाळात राजर्षी शाहूंनी मुक्या जनावरांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत प्रत्येकाची आवर्जुन काळजी घेतली होती. विशेषत: लहान मुलांच्या संगोपन व संरक्षणासाठी पाळणाघरे निर्माण केली होती. दुष्काळामुळे घरातील मोठे रोजगार व पाण्यासाठी घराबाहेर पडायचे. यामुळे लहान मुले घरात उपाशी रडत बसायची. अशा मुलांसाठी दरबारच्या खर्चाने ठिकठिकाणी पाळणा घरे निर्माण केली. तेथे मुलांचा सांभाळ करण्यासाठी पगारी आया, दूध-पाणी व सकस आहाराची व्यवस्थाही केली होती. या पाळणाघरांमध्ये 4146 मुले होती. या योजनेवर 31 हजार 353 रुपये खर्च झाल्याच्या नोंदी आहेत.

राजर्षींच्या 'बालकल्याण' कार्याचा वारसा

राजर्षी शाहू महाराजांच्या बालकल्याणा संदर्भातील आदर्श व अत्यावश्यक कार्याचा वारसा अनेकांनी पुढे अखंड सुरू ठेवला. छत्रपती राजाराम महाराज यांनी गोरगरीब अनाथ मुलांना आश्रय देण्यासाठी 'शिशू वात्सल्य' योजना राबवली. सूनबाई इंदुमतीदेवी यांनी मुलींसाठी 'ललिता विहार', 'महाराणी शांतादेवी गायकवाड गृहशास्त्र संस्था, महाराणी विजयमाला छत्रपती गृहिणी महाविद्यालय' सुरू केले. सासने मास्तर यांनी न्यू शाहूपुरी येथे 'भवानी आश्रम' सुरू केले. सत्यशोधक रामचंद्र बाबाजी जाधव ऊर्फ दासराम यांनी मुलांची मने घडविणारे 'सचित्र बालमासिक' सुरू केले. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्था आणि वसतिगृह स्थापन केले. बालकल्याण संस्थेच्या छायेत आज शेकडो विद्यार्थी वाढत आहेत.

समाजातील अनाथ, निराधार, निराश्रीत मुलांच्या काळजी आणि संरक्षणाचे अत्यंत महत्त्वपूर्ण कार्य शंभर वर्षांपूर्वी लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी केले होते. त्यांनी दूरद़ृष्टीने केलेले 'बालकल्याणाचे' कार्य सर्वांना आदर्शवत, प्रेरणादायी व मार्गदर्शक आहे.
– प्राचार्य डॉ. जे. के. पवार (सदस्य बालकल्याण समिती)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT