Latest

बहार विशेष : ‘स्टार्टअप’ची भरारी

Arun Patil

जगभराप्रमाणेच भारतातही 'स्टार्टअप'चा प्रचंड बोलबाला आहे. देशातील 'स्टार्टअप'ची संख्या 75 हजारांवर पोहोचली आहे. या 'स्टार्टअप'च्या माध्यमातून समोर आलेल्या नावीन्यता आणि उद्योजकतेतून देश प्रगती साधत आहे. 'स्टार्टअप'चा वाढलेला वेग हा तरुण पिढीचा बदलता द़ृष्टिकोन आणि त्यांच्यातील उद्यमशीलतेची ओढ दर्शवणारा आहे.

भारत हा प्रतिभासंपन्नांची, बुद्धिवंतांची, बौद्धिक संपदेची खाण असणारा देश म्हणून ओळखला जात असला तरी आजवर झालेल्या तीन औद्योगिक क्रांतींच्या प्रवासात आपण मागे राहिलो, हे वास्तव आहे. याचे मुख्य कारण म्हणजे आपल्याकडे उद्यमशीलतेला, उद्योजकतेला अनुकूल वातावरणनिर्मिती करण्याचे प्रयत्न फारसे झाले नाहीत. स्वातंत्र्यानंतरही अनेक वर्षे शेती हेच आपल्याकडील रोजगाराचे प्रमुख साधन होते. नव्वदीच्या दशकात आर्थिक उदारीकरणाचे पर्व सुरू झाल्यानंतर एकंदरीत अर्थव्यवस्थेची परिमाणे बदलत गेली. माहिती-तंत्रज्ञानाचे युग अवतरल्यानंतर एक नवे अवकाश तयार झाले.

दुसरीकडे, देशातील वाढत्या लोकसंख्येमध्ये तरुणाईचे प्रमाण वाढत असल्याचे लक्षात येऊ लागल्यामुळे रोजगाराचे आव्हान निर्माण झाले. त्यातूनच उद्योगधंद्यांच्या विकासाला चालना देण्याबाबतचा विचार केंद्रस्थानी आला. दरम्यानच्या काळात पाश्चिमात्य प्रगत देशांनी औद्योगिकीकरणात प्रचंड मोठी प्रगती केली होती. आपला शेजारी देश असणार्‍या चीननेही औद्योगिक क्रांती घडवून जगाचे उत्पादन केंद्र किंवा मॅन्युफॅक्चरिंग हब म्हणून ओळख मिळवली. त्या तुलनेने भारत काहीसा मागे पडला होता. वस्तुतः देशातील तरुण पिढीमध्ये अफाट ऊर्जा आणि क्षमता आहे; परंतु त्याला दिशा देण्यासाठी, संधी मिळवून देण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न झाले नाहीत.

बदलत्या जागतिक परिस्थितीचा आणि देशाच्या एकंदर अर्थमानाचा वेध घेऊन 2014 मध्ये केंद्रात सत्तेत आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शासनाने अर्थचक्राला ऊर्जा आणि गती देण्यासाठी उद्योगाभिमुख द़ृष्टिकोन स्वीकारला. यासाठी 'मेक इन इंडिया' नारा दिला गेला. या जोडीला 2015 च्या स्वातंत्र्य दिनाच्या भाषणामध्ये पंतप्रधान मोदी यांनी 'स्टार्टअप इंडिया आणि स्टँडअप इंडिया' अशी घोषणा दिली. तेव्हा अनेकांना हा नरेंद्र मोदी यांचा एक शब्दांचा खेळ आहे, असेच वाटले. परंतु हा केवळ शब्दांचा खेळ नव्हता. 'स्टार्टअप इंडिया' हा फार सखोलपणे विचार करून सुरू केलेला उपक्रम होता आणि या उपक्रमाच्या माध्यमातून उद्योजकतेच्या विकासाचा अतिशय शास्त्रशुद्ध पाया घालण्याचे उद्दिष्ट होते.

आपल्या नागरिकांच्या उद्योजकीय क्षमतेचा वापर करणार्‍या नवभारताची कल्पना मांडल्यानंतर देशात 'स्टार्टअप' तसेच नवकल्पनांना खतपाणी घालण्यासाठी अनुकूल वातावरण तयार केले गेले आणि त्यासाठीचा कृती आराखडा तयार करण्याचा कार्यक्रमही हाती घेण्यात आला. देशातील नवउद्योजकांसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देतानाच निधी, कर सवलत, बौद्धिक संपदा हक्कांसाठी तसेच आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांपर्यंत पोहोचण्यासाठी मदत आदी प्रकारे साहाय्य करण्यात आले. यामुळे अनेक जणांना यशस्वी 'स्टार्टअप'ची उभारणी करता आली. तसेच भारत जगातील तिसर्‍या क्रमांकाची 'स्टार्टअप' परिसंस्था ठरण्यासाठीही कृती आराखड्याचा उपयोग झाला.

भारतीयांची बुद्धिमत्ता ही जगात अव्वल आहे आणि सध्या अनेक देशांमध्ये अनिवासी भारतीय त्याचे प्रत्यंतरही आणून देत आहेत. या बुद्धिमत्तेच्या आधारावर देशात पूर्वीपासूनच अनेक प्रकारची संशोधने केली जातात. काही वेळा अशा संशोधनाची वृत्तपत्रात बातमी यायची; पण नंतर त्याचे पुढे काय होते, हे समजायचे नाही. बर्‍याचदा अशा संशोधनाला योग्य त्या तंत्रज्ञानाची, भांडवलाची आणि उद्योजकतेची साथ न मिळाल्याने ही संशोधने लुप्त होत असत. हे देशाचे करोडो रुपयांचेच नव्हे, तर अब्जावधी रुपयांचे नुकसान होते. ही बौद्धिक संपदा विरून जाण्याची प्रक्रिया खंडित करण्याचे काम 'स्टार्टअप इंडिया'ने केले.

आज जगभराप्रमाणेच भारतातही 'स्टार्टअप'चा प्रचंड बोलबाला आहे. या 'स्टार्टअप'च्या माध्यमातून समोर आलेल्या नावीन्यता आणि उद्योजकतेतून भारत आपली प्रगती साधत आहे. अलीकडेच समोर आलेल्या माहितीनुसार, देशातील 'स्टार्टअप'ची संख्या 75 हजारांवर पोहोचली आहे. इतकेच नव्हे, तर दररोज नोंदणी होणार्‍या 'स्टार्टअप'ची संख्याही जगात भारतात सर्वाधिक आहे. आजघडीला देशात सध्या दररोज 80 'स्टार्टअप'ची नोंदणी होत आहे. 'स्टार्टअप'चा वाढलेला वेग, तरुण पिढीचा बदलता द़ृष्टिकोन आणि त्यांच्यातील उद्यमशीलतेची ओढ दर्शवणारा आहे. गेल्या सहा वर्षांमध्ये देशात सुरुवातीच्या दहा हजार 'स्टार्टअप'साठी 808 दिवसांचा कालावधी लागला होता. मात्र, शेवटचे दहा हजार 'स्टार्टअप' अवघ्या 156 दिवसांत नोंदविले गेले. यावरून 'स्टार्टअप'च्या वाढीचा वेग लक्षात येतो.

'नोकरी मागणारे बनण्यापेक्षा नोकरी देणारे बना', हा आजच्या आधुनिक जगाचा मूलमंत्र आहे. तंत्रज्ञानाच्या लाटेमध्ये येणार्‍या काळात रोजगारसंधी कमी होण्याची भीती वर्तवली जात आहे. अशा वेळी 'स्टार्टअप'चे महत्त्व अधोरेखित होणारे आहे. आज देशात 'स्टार्टअप'मुळे रोजगार निर्मितीलाही मोठा हातभार लागला आहे. गेल्या सहा वर्षांच्या काळात देशातील 'स्टार्टअप'मधील रोजगारात दरवर्षी 110 टक्क्यांनी वाढ होत असून, सुमारे 7.5 लाख रोजगार या माध्यमातून तयार झाल्याचे समोर आले आहे. काहीतरी नवीन करण्याची भावना, जोखीम घेण्याची तयारी आणि जिद्द या त्रिसूत्रीच्या आधारावर यश नक्कीच मिळते, हे भारतात 'स्टार्टअप' सुरू करणार्‍या अनेक उद्योजकांनी दाखवून दिले आहे.

'स्टार्टअप'मध्ये देशी तंत्रज्ञानाला प्रोत्साहन दिले जात असल्यामुळे, हा 'आत्मनिर्भर भारत' बनण्याच्या प्रवासातील त्यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. कारण कोणत्याही देशाच्या प्रगतीमध्ये, विशेषतः भारताच्या प्रगतीमध्ये देशातल्या तरुणांनी शोधून काढलेली अशी तंत्रज्ञाने फार निर्णायक असतात. सध्या भारतात परदेशातल्या तंत्रज्ञानांच्या आधारे साधने तयार केली जातात. फ्रिज, वॉशिंग मशिन, लॅपटॉप, टीव्ही या सगळ्यांचे उत्पादन भारतात होत असले तरी त्यासाठीचे बरेचसे तंत्रज्ञान आपण परदेशातून घेतलेले आहे आणि ते तंत्रज्ञान आपल्याला महागात मिळालेले आहे. हे लक्षात घेऊन असे तंंत्रज्ञान आपल्याच देशात विकसित करण्याचा प्रयत्न 'स्टार्टअप'च्या माध्यमातून होत आहे. देशी तंत्रज्ञानाचा विकास हे आर्थिक प्रगतीचे मोठे साधन बनू शकते, हे लक्षात घेतले पाहिजे. अमेरिका, जर्मनी, ब्रिटन, फ्रान्स या प्रगत देशांच्या धर्तीवर आपल्या देशाच्या विकासाची वाटचाल करण्यासाठी गावागावांमध्ये उद्योग आणि कृषी क्षेत्रात नवनवे शोध लावले गेल्यास देशाचे चित्र बदलायला वेळ लागणार नाही.

आज औद्योगिक विकासाच्या संकल्पना बदलत असून 'स्टार्टअप'ना पर्याय राहिलेला नाही. नवसृजन महत्त्वाचे ठरले आहे. उद्योग उभारणे म्हणजे केवळ भांडवलाची जुळणी आणि कुशल मनुष्यबळ मिळविणे एवढेच मर्यादित उद्दिष्ट राहिलेले नसून, नवकल्पना महत्त्वाच्या ठरतात. प्रगत देशांमध्ये युवकांच्या नवकल्पनांना चालना दिली जाते. त्यासाठी त्यांना पाठबळ दिले जाते. नवकल्पनांवर आर्थिक गुंतवणूक केली जाते. ही गुंतवणूक भविष्यात उपयुक्त ठरल्याची अनेक उदाहरणे आहेत. या नवकल्पनांवर केली जाणारी गुंतवणूक म्हणजेच 'स्टार्टअप' होय. उत्तम कल्पना घेऊन आलेले तरुण आज मोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांचे प्रवर्तक ठरले आहेत. नवसृजनातूनच रोजगारसृजनही होते. या सर्व मुद्द्यांचा विचार करूनच 'स्टार्टअप'ना चालना देण्याचे प्रयत्न सुरू आहेत आणि त्याला देशातील नवतरुणाई मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद देत आहे.

कोरोनाच्या काळात लावण्यात आलेल्या लॉकडाऊनचा अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला. उद्योगधंदे ठप्प झाले होते. मात्र अशाही परिस्थितीमध्ये देशात 'स्टार्टअप' उदयास आले आणि त्यांनी मोठी व्यावसायिक भरारीदेखील घेतली. याकाळात भारतातील सुमारे 70 पेक्षा अधिक 'स्टार्टअप'नी तब्बल एक अब्ज डॉलरचा टप्पा ओलांडला. आज रतन टाटांसारख्या उद्योगजगताचे भीष्म पितामह असणार्‍या व्यक्तिमत्त्वालाही 'स्टार्टअप'ची भुरळ पडलेली दिसते. टाटा समूहातून निवृत्त झाल्यापासून रतन टाटा सक्रियपणे 'स्टार्टअप'मध्ये गुंतवणूक करत आहेत आणि त्यांनी आतापर्यंत 50 हून अधिक कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे.

असे असले तरी आजही अनेकांना 'स्टार्टअप' ही संकल्पना समजलेली नाही. अनेकांच्या मते, केवळ तरुणांनी सुरू केलेल्या उद्योगांनाच 'स्टार्टअप' म्हटले जाते. कारण आज भारतातील एकूण 'स्टार्टअप' उद्योजकांपैकी 72 टक्के उद्योजक हे पस्तीसच्या आतील आहेत. पण प्रत्यक्षात एखाद्या गावातील गृहिणीने पोळी-भाजी देणारे केंद्र सुरू केले आणि त्याला तंत्रज्ञानाची जोड देऊन नावीन्यतेने व्यवसाय सुरू केल्यास त्यालाही 'स्टार्टअप'च म्हटले जाईल. 'स्टार्टअप'साठी तंत्रज्ञानाची साथ हा महत्त्वाचा घटक असला तरी अपरिहार्य नाही. नावीन्यता, अभिनवता हा 'स्टार्टअप'चा पाया आहे. चाकोरीबाह्य किंवा मळलेल्या वाटांपेक्षा वेगळी वाट चोखाळून केलेला उद्योग 'स्टार्टअप' संकल्पनेत चपखल बसतो. आज देशात अशी असंख्य उदाहरणे पाहायला मिळतात.

मध्यंतरी उत्तर प्रदेशच्या झांशी येथे नववीत शिकणार्‍या एका मुलीने सौर ऊर्जेवर चालणारे अतिशय स्वस्त असे वातानुकूलन यंत्र तयार बनवले. केरळमधल्या एका मुलीला तिची आई आजारी असल्यामुळे घरातले धुणे धुवावे लागायचे. यावर उपाय म्हणून तिने सायकलच्या पॅडलवर चालेल, असे एक वॉशिंग मशिन तयार केले. औरंगाबादमध्ये एका मुलाने स्वस्तात चालणारा लॅपटॉप तयार केला होता. अंबाजोगाईमध्ये एका तंत्रज्ञाने सौर ऊर्जेवर चालणारा भाज्या वाळवण्याचा ड्रायर तयार केला. नागालँडमधल्या एका विद्यार्थ्याने अगदी मोजक्या पैशामध्ये एक सूक्ष्मदर्शक विकसित केला. नागपूरच्या कापूस संशोधन केंद्रामध्ये एका तरुण संशोधिकेने रंगीत कापूस तयार केला. अशा संशोधनांतून उभ्या राहिलेल्या उद्योगांची 'स्टार्टअप'च्या विश्वात अधिक चलती असते.

'स्टार्टअप'ची ही घोडदौड आशादायक असली तरी त्याची दुसरी बाजूही लक्षात घेतली पाहिजे. ती बाजू आहे अर्थकारणाची. कोणताही 'स्टार्टअप' उद्योग सुरू करताना भविष्यात त्याचे रूपांतर मोठ्या उद्योगात होण्याची क्षमता असल्याची निर्मात्यांची धारणा असते. हा भविष्यवेध विचारात घेऊन भांडवल उभारणी केली जाते. परंतु मिळालेल्या भांडवलाचा विनियोग अत्यंत काटेकोरपणाने करणे गरजेचे असते. विशेषतः ग्राहक मिळवण्यासाठी होणारा खर्च कमी करण्यावर अधिक भर देणे आवश्यक आहे.

यासाठी तंत्रज्ञानाचा अचूक वापर महत्त्वाचा ठरतो. कारण सरतेशेवटी 'स्टार्टअप' हा एक व्यवसायच आहे. त्यामुळे व्यवसाय यशस्वी होण्यासाठीची सर्व सूत्रे त्यालाही लागू होतात. उत्पादन खर्च जितका कमी तितका नफा अधिक, हे व्यवसायाचे मूलभूत सूत्र आहे. आज अनेक 'स्टार्टअप'मध्ये उत्पादन घेतले जात नसले तरी उत्पादनांच्या प्रसिद्धीसाठी होणारा खर्च करावा लागतोच. त्यावर नियंत्रण असणे आवश्यक आहे. अलीकडेच इन्फोसिसचे अध्यक्ष नंदन निलेकणी यांनीही या क्षेत्रातील तरुणांना हाच संदेश दिला आहे.

प्रक्रियात्मक खर्च वारेमाप झाल्यास त्या उद्योगाच्या 'ऑरगॅनिक ग्रोथ'वर म्हणजेच नैसर्गिक वृद्धीवर मर्यादा येतात. तसेच अशा 'स्टार्टअप'ना भांडवल संकलनासाठीही अडचणी येऊ शकतात. त्यामुळे या क्षेत्रातील यशोगाथांचे आकलन करून त्यातील मर्म समजून घेणे आवश्यक आहे. केवळ आलिशानपणा, डामडौल, दिखाऊपणा यांच्या पायावर कोणताही उद्योग अथवा व्यवसाय यशस्वी होत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे 'स्टार्टअप'च्या क्षेत्रात येताना नावीन्यतेबरोबरच राष्ट्रहिताचाही विचार महत्त्वाचा ठरतो. आज पर्यावरण, ऊर्जा, पौष्टिकता, कुपोषण, आरोग्य, शिक्षण, नागरी समस्या यांसारख्या अनेक मुद्द्यांमध्ये देशात आव्हानात्मक स्थिती आहे. त्यांची सोडवणूक करण्यासाठीचा विचार केंद्रस्थानी ठेवून 'स्टार्टअप'ची निर्मिती केल्यास ती राष्ट्रसेवा, मानवसेवा ठरेल आणि अशा 'स्टार्टअप'मधून देशाच्या विकासाला शाश्वत आधार मिळण्यास हातभार लागेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT