बर्लिन : संशोधकांनी रोमानियामध्ये तब्बल 7 कोटी वर्षांपूर्वीच्या गोड्या पाण्यात राहणार्या कासवाचे एक जीवाश्म शोधले आहे. कासवांची ही एक अज्ञात प्रजाती असून या वेगळ्या प्रजातीची कासवं ज्या घटनेमुळे पृथ्वीवरून डायनासोर नष्ट झाले त्या आपत्तीतही तग धरून राहिली होती असे दिसून आले आहे.
रोमानियाच्या हॅतेग खोर्यात हे जीवाश्म सापडले होते. त्यामध्ये कासवाचे जवळ जवळ पूर्ण स्थितीत असलेले पाठीवरील कवच म्हणजेच 'कॅरापेस' तसेच खालील बाजूचे कवच 'प्लॅस्टोर्न'चा समावेश आहे. कासवाच्या एका पायाचे हाड आणि दुसर्या पायाच्या मांडीचे हाडही यामध्ये आहे. त्यावरून संशोधकांनी अंदाज बांधला की हे कासव सुमारे 7.5 इंच म्हणजेच 19 सेंटीमीटर लांबीचे होते. त्यांनी या नव्या प्रजातीला 'डोर्टोका रेमिरी' असे नाव दिले आहे. क्रेटाशियस काळातील पृष्ठवंशीय प्राण्यांविषयी मोलाचे संशोधन केलेल्यामॅटियास रेमीर या संशोधकाचे नाव या प्रजातीला देण्यात आले आहे.
रेमीर यांचा 2020 मध्ये मृत्यू झाला होता. ही 'डी. रेमीरी' प्रजाती 'साईड-नेकेड' किंवा 'शॉर्ट नेकेड टर्टल' म्हणून ओळखल्या जाणार्या कासवांच्या कुळातील आहे. सध्या या कुळातील 16 प्रजाती दक्षिण अमेरिका, आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियात आहेत. कदाचित 'डी. रेमीरी' कासवांपासूनच निर्माण झालेल्या 5 कोटी 70 लाख वर्षांपूर्वीच्या काही तशाच प्रजातींच्या कासवांचे जीवाश्मही सापडलेले आहे. त्यावरून असे दिसून येते की क्रेटाशियस काळात ज्या आपत्तीमुळे पृथ्वीवरील 75 टक्के जीवसृष्टी नष्ट झाली, त्या आपत्तीतही 'डी. रेमीरी' कासवं तग धरून राहिली होती. जर्मनीच्या तुबिंजेन युनिव्हर्सिटीतील फेलिक्स ऑगस्टीन यांनी याबाबतची माहिती दिली आहे.