Latest

बंडखोरांना आणण्यासाठी सातारचा शिवसैनिक गुवाहाटीत

Shambhuraj Pachindre

वरकुटे – मलवडी : पुढारी वृत्तसेवा

माण तालुक्यातील बिजवडी येथील शिवसैनिक व उपजिल्हाप्रमुख संजय भोसले हे थेट गुवाहाटीत एकनाथ शिंदेंना भावनिक साद घालण्यासाठी पोहोचले आहेत. त्यांनी बंडखोर आमदार वास्तव्यास असलेल्या हॉटेलच्या बाहेर 'शिवसेना झिंदाबाद'च्या घोषणा देत बॅनरबाजी केली. दरम्यान, त्यांना आसाम पोलिसांनी अटक केली.

एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेत अस्वस्थता निर्माण झाली असून महाविकास आघाडी सरकारही कोसळण्याच्या वाटेवर आहे. एकनाथ शिंदेंवर टीका करणारे व त्यांचे समर्थन करणारे असे दोन गट निर्माण झाले आहेत. या सगळ्या गदारोळात एकनाथ शिंदे यांना परत आणण्यासाठी माण तालुक्यातील बिजवडी गावचे रहिवाशी व उपजिल्हाप्रमुख संजय भोसले थेट गुवाहाटीत गेले. एकनाथ शिंदे ज्या रेडिसन ब्ल्यू हॉटेलात थांबले आहेत, त्याच हॉटेलबाहेर संजय भोसले पोहोचले असून 'साहेब मातोश्रीवर परत चला' अशी साद त्यांनी एकनाथ शिंदेंना घातली आहे. संजय भोसले यांनी आपल्या गळ्यात एक पाटी अडकवून एकनाथ शिंदेंना आवाहन केले आहे. 'शिवनसेना झिंदाबाद! एकनाथ शिंदे (भाई) मातोश्रीवर परत चला, उद्धवजी आणि आदित्यजींना साथ द्या' असा मजकूर त्यावर लिहलेला होता. दरम्यान, हॉटेलबाहेर उभ्या असलेल्या संजय भोसले यांना स्थानिक पोलिसांनी ताब्यात घेतलेे.

बिजवडी (ता. माण) येथील संजय भोसले यांनी अतिशय तरुण वयात शिवसैनिक म्हणून काम करण्यास सुरुवात केल्यानंतर शाखाप्रमुख, विभागप्रमुख, माण तालुकाप्रमुख व आता सातारा उपजिल्हाप्रमुख म्हणून ते काम पाहत आहेत. सडेतोड भूमिका घेवून कोणालाही शिंगावर घेण्याची त्यांची तयारी असते. गुवाहाटी येथील त्यांचे आंदोलन सुध्दा असेच असून ते गुवाहाटीत गेल्याची साधी कुणकुण सुध्दा शिवसैनिकांना नव्हती. या आंदोलनामुळे संजय भोसले चर्चेत आले आहेत.

अन्यथा शेकडो शिवसैनिक गुवाहाटीला  रवाना होतील ; म्हसवड पोलिसांना निवेदन

शिवसेनेचे सातारा उपजिल्हाप्रमुख संजय भोसले यांना आसाम पोलिसांनी राजकीय हेतूने अटक केली आहे. त्यांची तत्काळ सुटका करण्यात यावी, अन्यथा शेकडो शिवसैनिक गुवाहाटीला रवाना होतील, असा इशारा माण तालुक्यातील शिवसैनिकांनी म्हसवड पोलिसांना निवेदनाद्वारे दिला आहे. यावेळी तालुका प्रमुख बाळासाहेब मदने, उपतालुकाप्रमुख शिवदास केवठे, शहरप्रमुख राहुल मंगरुळे, विभाग प्रमुख अमित कुलकर्णी, युवासेना शहरप्रमुख सोमनाथ कवी, प्रविण कट्टे, सतिश विरकर, सिद्धनाथ कवी, सोनू मदने, आदित्य सराटे, प्रितम तिवाटणे उपस्थित होते.

शिवसेनेसाठी प्रसंगी प्राणही देईन : संजय भोसले

मी बाळासाहेबांचा व उध्दवसाहेबांचा कट्टर शिवसैनिक आहे. शिवसेनेसाठी जीवाचे रान करु शकतो. शिवसेनेसाठी प्रसंगी प्राणही देईन, अशी प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना दिली. खूप काही बोलायचे आहे. पण मला पोलिसांनी इथल्या चौकीत आणून बसवले आहे. इथल्या पोलिसांची नजर माझ्यावर आहे. मला आता काहीही बोलता येणार नाही, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे सातारा उपजिल्हाप्रमुख संजय भोसले यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT