मारूल हवेली : धनंजय जगताप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या बंडखोर आमदारां मधील एक असलेले आ. शंभूराज देसाई यांच्या पाटण विधानसभा मतदारसंघातील हर्षद कदम यांची जिल्हाप्रमुखपदी तर जिल्हा संघटक म्हणून जयवंतराव शेलार यांची नियुक्ती केली आहे. या नियुक्त्यांमुळे निष्ठावंत शिवसैनिकांत चैतन्य निर्माण झाले आहे. यामुळे तालुक्यात देसाई गट विरुध्द शिवसैनिक यांच्यातील राजकीय संघर्ष पुन्हा एकदा पेटणार आहे.
शिवसेनेच्या स्वतंत्र अस्तित्वामुळे आगामी निवडणुका देसाई गटासाठी आव्हानात्मक राहतील अशा चर्चा रंगू लागल्या आहेत. शिवसेनेत झालेल्या बंडखोरीमुळे राज्यासह पाटण तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. या बंडखोरीत माजी राज्यमंत्री आ. शंभूराज देसाई यांचा सहभाग असल्याने पाटण तालुक्यातून संमिश्र प्रतिक्रिया उमटत होत्या. तर पाटण विधानसभा मतदारसंघाबाबत उद्धव ठाकरे कोणती भूमिका घेतात याबाबत तर्कवितर्क लढवले जात होते. दरम्यान, शंभूराज देसाई शिवसेनेचे आमदार असले तरी पाटण तालुक्यात स्वतंत्र गट वाढवण्याकडे त्यांचा नेहमीच कल राहिला आहे. त्यामुळे पक्षकार्यातील योगदान व नेतृत्वाबद्दलच्या निष्ठा याविषयी शिवसैनिकाकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते.
2017 साली झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत मल्हारपेठ जिल्हा परिषद गटातून तत्कालीन जिल्हाप्रमुख हर्षद कदम शिवसेनेकडून उभे राहिले होते. मात्र, शिवसेनेच्या उमेदवाराला साथ न देता देसाई गटाने विकास आघाडीच्या माध्यमातून वेगळे उमेदवार देऊन त्यांचा पराभव केला होता. त्यावेळी शिवसेना विरूध्द शिवसेना अशा झालेल्या लढतीची चर्चा जिल्हाभरात सुरू होती. त्यानंतर मल्हारपेठ ग्रामपंचायत निवडणुकीत हर्षद कदम यांनी सरपंच पदासाठी पत्नीची उमेदवारी देऊन देसाई गटाच्या उमेदवाराचा दणदणीत पराभव केला होता.
आ. शंभूराज देसाई व हर्षद कदम यांच्यातील राजकीय मतभेद वाढल्याने मध्यंतरी हर्षद कदम यांना आपले जिल्हाप्रमुख पद गमवावे लागले होते. राज्यातील बंडखोरीच्या घडामोडीनंतर पाटण तालुक्यातील शिवसेना कोणाच्या दावणीला बांधली जाणार की, आपले स्वतंत्र अस्तित्व जपणार याकडे तालुकावासीयांचे लक्ष लागले होते. शिवसेना पक्षश्रेष्ठींनी हर्षद कदम यांची पुन्हा जिल्हाप्रमुख पदी नियुक्ती करून निष्ठावंतासह बंडखोरांना योग्य तो संदेश दिला असल्याची भावना व्यक्त होऊ लागल्या आहेत.
पाटणचे राजकारण हे देसाई-पाटणकर गटाभोवती केंद्रित असते. नेत्यांकडून पक्षापेक्षा गटाला प्राधान्य दिले जात असल्याने निष्ठावंत कार्यकर्त्यांच्यात नाराजीचा सूर उमटत असतो. मात्र, आता तालुक्यात बंडखोर आणि निष्ठावंत असा राजकीय सामना रंगणार आहे. या सामन्यात शिवसेना आपली ताकद दाखवणार का? याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.
पाटण तालुक्यातील निष्ठावंत शिवसैनिक पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबत कायम उभा आहे. तालुक्यातील एकही शिवसैनिक कुठेही गेलेला नाही. वेळोवेळी दुटप्पी भूमिका घेऊन पक्षाशी विश्वासघात करणार्यांना शिवसैनिक माफ करणार नाहीत.
– हर्षद कदम
जिल्हाप्रमुख शिवसेना.