Latest

कर्नाटकात हिजाब, हलालनंतर आता मशिदींवरील ध्वनिक्षेपकांविरुद्ध ‘आवाज’, हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

Arun Patil

बंगळूर ; पुढारी वृत्तसेवा : हिजाब, हलालनंतर आता मशिदींवरील ध्वनिक्षेपकांविरुद्ध हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. मशिदींमध्ये अजानसाठी ध्वनिक्षेपकांची गरज नाही, असे सांगत ध्वनिक्षेपकांच्या वापरावर बंदी घालण्याची मागणी संघटनांनी केली आहे. त्यासाठी 13 एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली आहे. याआधी यात्रांमध्ये मुस्लिम व्यापार्‍यांवर बंदीची मागणी संघटनांनी केली होती. गेल्या आठवड्यात काही यात्रांमध्ये अशा बंदीचे फलकही लागले होते. दरम्यान, मंदिरांमध्येही ध्वनिक्षेपक बसवण्याची मोहीम सुरू झाली असून, काही मंदिरांमध्ये पहाटे मंत्रपठणही सुरू झाले आहे.

मशिदींमध्ये अजानवेळी ध्वनिक्षेपकाचा वापर केला जातो. यामुळे ध्वनिप्रदूषण होत असल्याची तक्रार करत तत्काळ कारवाई करावी; अन्यथा तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा श्रीराम सेनेचे संस्थापक प्रमोद मुतालिक यांनी दिला आहे. तर सर्वोच्च न्यायालयाचा आदेश असतानाही पालन होत नसल्याचा आरोप श्रीराम सेनेचे प्रदेशाध्यक्ष सिद्धलिंगस्वामी यांनी केला. ते म्हणाले, रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत ध्वनिक्षेपकाचा वापर करु नये, असा आदेश आहे. त्यामुळे 13 एप्रिलपर्यंत मशिदींवरील ध्वनिक्षेपकांवर निर्बंध घातले नाहीत, तर 14 एप्रिलपासून श्रीराम सेनेकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.

मंदिरांमध्ये वापर सुरू

मंदिरांमध्ये ध्वनिक्षेपकाचा वापर सुरु झाला आहे. हासन जिल्ह्यातील अर्सीकेरे येथील कालिका मंदिरात पहाटे 5.30 वाजता ऋषीकुमार स्वामींनी रामतारक मंत्र पठण करुन मोहीम सुरु केली. यलेहंकातील न्यू टाऊन येथील वीरांजनेय स्वामी, मॅजेस्टिकमधील अण्णम्मा मंदिर, राजाजीनगरातील राम मंदिर, संजयनगरातील वेणूगोपाल स्वामी मंदिर, पादरायनपूरमधील शिवालय, के. आर. मार्केटमधील गणपती मंदिरावर ध्वनिक्षेपक लावण्यात आले आहेत.

रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत तरी बंदीच

ध्वनिप्रदूषणाच्या कायद्यानुसार पोलिसांच्या परवानगीविना ध्वनिक्षेपकाचा वापर करता येत नाही. सार्वजनिक ठिकाणी रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत ध्वनिक्षेपक वापरू नये. ऑडिटोरियम, सभागृहात ठराविक मर्यादेपर्यंतच ध्वनिक्षेपकाचा वापर करण्याची मुभा आहे. राज्य सरकारकडून अनिवार्यतेवेळी रात्री 10 ते 12 पर्यंत ध्वनिक्षेपकाच्या वापरास परवानगी देता येते. ही परवानगी केवळ धार्मिक कारणासाठी देता येते. केवळ 15 दिवसांपर्यंत अशी परवानगी देणे शक्य आहे. ध्वनिक्षेपकाचा आवाज 10 ते 75 डेसिबलपर्यंतच असणे आवश्यक आहे.

मंदिर, मशिदींना नोटीस

उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयाने मशिदींवर ध्वनिक्षेपक लावण्याबाबत आदेश दिले आहेत. पण, काही ठिकाणी आदेशाचे उल्लंघन होत असल्याने संबंधित मंदिर, मशिदींना बंगळूर पोलिस आयुक्त कमल पंत यांनी नोटीस बजावली आहे. यासह पब, कारखान्यांनाही नोटिसा देण्यात आल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT