साओ पावलो, वृत्तसंस्था : फुटबॉल विश्वात महान समजले जाणारे ब्राझीलचे फुटबॉलपटू पेले (Pele Death) यांचे गुरुवारी वयाच्या 82 व्या वर्षी निधन झाले. पेले हे तीन वेळा फिफा विश्वचषक जिंकणारे एकमेव खेळाडू होते. पेले यांच्या निधनाने ब्राझिलमध्ये तीन दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.
पेले या नावाने प्रसिद्ध असलेले एडसन अरांतेस डो नासिमेंटो यांचा जन्म 23 ऑक्टोबर 1940 रोजी ब्राझीलच्या मिनास गेराईस राज्यातील ट्रेस कोराकोस येथे झाला. 1958 मध्ये ब्राझीलच्या पहिल्या फिफा विश्वचषक विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच किशोरवयीन असलेल्या पेले यांनी फ्रान्सविरुद्धच्या उपांत्य फेरीत हॅट्ट्रिक केली होती.
पेले यांना कोलन कॅन्सर झाला होता. त्यांची किडनी व हृदय नीट कार्य करत नव्हते. त्यामुळे त्यांची प्रकृती अधिकच खालावली होती. त्यांना रुग्णालयात डॉक्टरांच्या विशेष निगरानीत ठेवण्यात आले होते. अखेर त्यांची झुंज अयशस्वी ठरली आणि त्यांचे निधन झाले.
ब्राझीलचे दिग्गज फुटबॉलपटू पेले यांचे वयाच्या 82 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या मुलीने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून ही माहिती दिली. पेले हा केवळ ब्राझीलमधीलच नव्हे तर जगातील महान फुटबॉलपटूंपैकी एक मानला जातो. कोलन कॅन्सरमुळे त्यांना काही काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याचवेळी त्याच्या निधनामुळे संपूर्ण क्रीडा जगत शोकसागरात बुडाले असून, फुटबॉलपटू लियोनल मेस्सीपासून ते क्रिकेटपटू जसप्रीत बुमराहने त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
तीन विश्वचषक जिंकण्याचा विक्रम करणारा तो जगातील एकमेव खेळाडू आहे. ब्राझीलकडून खेळताना त्यांनी 1958, 1962 आणि 1960 मध्ये संघाला चॅम्पियन बनवले. फुटबॉलच्या जगात पेले यांना ब्लॅक पर्ल आणि ब्लॅक डायमंड म्हणूनही ओळखले जात होते.
माजी फुटबॉलपटू केमोथेरपी घेत होते; परंतु कर्करोगाशी त्यांचा लढा अपयशी ठरला. रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांना श्वासोच्छ्वासाचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले. गेल्या वर्षी सप्टेंबरपासून पेले नियमित रुग्णालयात उपचार घेत होते. त्यांना फुटबॉलपासून क्रिकेटपर्यंतच्या अनेक खेळाडूंनी श्रद्धांजली वाहिली आहे. (Pele Death)
ब्राझीलियन आणि पॅरिस सेंट-जर्मेन सुपरस्टार नेमारने आपल्या देशाच्या महान खेळाडूला श्रद्धांजली अर्पण करताना लिहिले, पेलेच्या आधी, 10 ही फक्त एक संख्या होती; परंतु ते सुंदर वाक्य अपूर्ण आहे. मी म्हणेन की पेलेपूर्वी फुटबॉल हा फक्त एक खेळ होता, ज्याचे त्याने कलेमध्ये रूपांतर केले. मनोरंजनाने भरलेले फुटबॉल आणि ब्राझील हे नाव किंग (पेले) मुळे मिळाले, पण त्याची जादू कायम राहील.
अर्जेंटिनाचा विश्वचषक विजेता लियोनल मेस्सीने आपल्या पोस्टमध्ये पेलेला श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्याने दोघांचा एक फोटोही शेअर केला आहे. रोनाल्डोनेही पेले यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने आणि माजी फिरकीपटू हरभजन सिंगने देखील ट्विटरवरून पेले यांना श्रद्धांजली वाहिली आहे.