Latest

फिफा विश्‍वचषकात प्रेक्षकांसाठी कठोर नियमावली

Arun Patil

दोहा ; वृत्तसंस्था : फिफा विश्‍वचषक म्हणजे जगभरातील फुटबॉल चाहत्यांसाठी मेजवानीच असते. यावर्षीचा विश्‍वचषक 21 नोव्हेंबर ते 28 डिसेंबर 2022 या कालावधीदरम्यान आखाती देश असलेल्या कतारमध्ये आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे जगभरातील फुटबॉल चाहते प्रत्यक्षात सामन्यांचा आनंद लुटण्यासाठी कतारमध्ये दाखल होणार, हे निश्‍चित आहे. मात्र, या चाहत्यांना अनेक कठोर नियमांचा सामना करावा लागणार आहे. कतार सरकारने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन केल्यास चाहत्यांना तुरुंगवासही भोगावा लागू शकतो.

समलैंगिक संबंधांविरोधी आणि इतर काही कठोर नियम असलेल्या देशांमध्ये कतारचा समावेश होतो. फुटबॉल विश्‍वचषकाच्या पार्श्‍वभूमीवर कतारने देशात येणार्‍या चाहत्यांसाठी नियमांची यादी तयार केली आहे. त्या यादीनुसार विश्‍वचषकादरम्यान देशात आलेल्या व्यक्‍तींना मद्य सेवनास आणि वन नाईट स्टँडसाठी बंदी घालण्यात आली आहे.

फिका विश्‍वचषकादरम्यान कतारमध्ये वन नाईट स्टँड करताना पकडले गेल्यास दोन्ही व्यक्‍तींना सात वर्षांपर्यंतचा तुरुंगवास भोगावा लागू शकतो. कतारमध्ये विवाहबाह्य लैंगिक संबंध ठेवण्यास बंदी आहे. त्यामुळे तेथील नागरिकांना या कायदे आणि नियमांची सवय झालेली आहे. मात्र, विश्‍वचषक पाहण्यासाठी येणार्‍या चाहत्यांना ही गोष्ट सातत्याने लक्षात ठेवावी लागणार आहे.

कतार पोलिस प्रशासनातील एका अधिकार्‍याने सांगितले की, कतारमध्ये लग्‍नाशिवाय लैंगिक संबंध ठेवण्यास परवानगी नाही. त्यामुळे फुटबॉल विश्‍वचषकासाठी आलेल्या चाहत्यांनाही हा नियम पाळावा लागेल. लग्‍नाचा पुरावा असलेल्या पती-पत्नींना मात्र या नियमातून सवलत देण्यात आली आहे. याशिवाय सामन्यांनंतर कोणत्याही प्रकारची पार्टी करण्यासही बंदी घालण्यात आली आहे.

विवाहबाह्य लैंगिक संबंधांव्यतिरिक्‍त कतारमध्ये दंडसंहिता 2004 अंतर्गत समलैंगिक संबंधांवरदेखील बंदी आहे. समलैंगिक संबंध ठेवल्याबद्दल दोषी आढळलेल्या व्यक्‍तींना कतारमध्ये एक वर्षापर्यंत तुरुंगवास भोगावा लागू शकतो. या कायद्यासाठी कतारला जगभरातून तीव्र टीका सहन करावी लागली आहे.

याशिवाय चाहत्यांच्या कपड्यांबद्दलही नियमावली जाहीर करण्यात आली आहे. महिला चाहत्यांना सार्वजनिक ठिकाणी खांदे झाकणारे आणि पायघोळ कपडे घालावे लागणार आहेत. पुरुषांनाही सार्वजनिक ठिकाणी गुडघ्यापर्यंतचे कपडे घालता येणार नाहीत. कतार हा इस्लामिक देश आहे. त्यामुळे तिथे येताना सामानात दारू, अमली पदार्थ, पोर्नोग्राफी, गैर-इस्लामिक धार्मिक पुस्तके आणि ई-सिगारेट आणता येणार नाही.

कतारने जाहीर केलेल्या या नियमावलीमुळे जगभरातील अनेक चाहत्यांची निराशा झाली आहे. काही ठिकाणी तर याबाबत टीका सुरू झाली आहे. जेव्हापासून कतारला फिफा विश्‍वचषकाचे यजमानपद दिले आहे, तेव्हापासूनच वाद सुरू झालेले आहेत. कतारने यजमानपद मिळवण्यासाठी लाच दिल्याचा आरोप झाला होता. याशिवाय स्टेडियमच्या बांधकाम कामात आतापर्यंत 6,500 हून अधिक कामगारांचा मृत्यू झाल्याच्याही बातम्याही आल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT