Latest

प्रियांका गांधी यांचे ‘महिला सक्षमीकरण’

रणजित गायकवाड

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेस 40 टक्के महिला उमेदवार रिंगणात उतरवणार आहे. महिला मतपेढी तयार करण्याच्या या व्यूहनीतीमुळे नेमके काय होईल? प्रियांका गांधी यांचे या निर्णयाचा काँग्रेसला फायदा होईल का?

उत्तर प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुकीत स्वबळावर लढण्याचा निर्णय काँग्रेस पक्षाने घेतला आहे आणि पक्षाकडून सर्वच्या सर्व 403 विधानसभा मतदारसंघांत उमेदवार दिले जाणार आहेत. प्रियांका गांधी यांनी सांगितले आहे की, काँग्रेसकडून 40 टक्के महिला उमेदवार रिंगणात असतील. सीतापूरमध्ये काँग्रेस नेत्या शमीना शफीक या रहिमाबाद गावातील एका बैठकीत उपस्थित असलेल्या महिलांना उद्देशून मोठ्या त्वेषाने म्हणतात, 'लडकी हूँ…' त्यावर उत्तर येते 'लड सकती हूँ…' काँग्रेस पक्षाने विधानसभा निवडणुकांपूर्वीच महिला सशक्तीकरण अभियान धूमधडाक्यात सुरू केले आहे. प्रियांकांनी आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये महिला सशक्तीकरणासाठी जो जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे तो 15 पानी आहे.

पक्षाकडून आगामी निवडणुकीत 40 टक्के महिलांना उमेदवारी दिली जाईल, याची चर्चा आधीपासूनच राज्यात सुरू होती. प्रियांका गांधींनी अशी घोषणा केली की, पक्षाच्या पहिल्या 100 उमेदवारांच्या यादीत 60 महिला आहेत. पक्षाची उमेदवारी मिळवू इच्छिणार्‍या शेकडो महिलांमध्ये शमीना शफीक यांचाही समावेश आहे. या निर्णयामुळे पक्षात आणि पक्षाबाहेरील पुरुषांमध्ये खळबळ उडाली आहे, असे त्या म्हणतात. काँग्रेससाठी चिंतेचा विषय असा की, राजकीय निरीक्षकांनी काँग्रेसला स्पर्धेत गृहित धरलेलेच नाही आणि भाजपचा थेट
मुकाबला समाजवादी पक्षाशी होईल, असे म्हटले आहे. उत्तर प्रदेशात काँग्रेस गेली 32 वर्षे सत्तेबाहेर आहे आणि राज्यात पक्षाला जनाधार उरलेला नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. एका जाणकाराने असे सांगितले की, मुसलमान आणि यादव ही समाजवादी पक्षाची मतपेढी मानली जाते, तर दलित ही बहुजन समाज पक्षाची मतपेढी मानली जाते. परंतु, काँग्रेसला स्वतःची मतपेढीच उरलेली नाही. म्हणूनच काँग्रेस महिलांमध्ये जनाधार शोधत असावी का, हा निरीक्षकांना पडलेला प्रश्न आहे. एवढे करूनही गेल्या वेळेपेक्षा फार चांगली प्रगती काँग्रेस करू शकेल, असे निरीक्षकांना वाटत नाही.

2017 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला केवळ 7 जागा जिंकता आल्या. या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या या रणनीतीबाबत रतन मणी या राजकीय विश्लेषकांच्या म्हणण्यानुसार, पक्षाचे म्हणणे लोकांपर्यंत पोहोचवू शकेल, संपूर्ण राज्यभरात प्रचारासाठी फिरू शकेल आणि सर्व ठिकाणच्या मतदारांवर प्रभाव पाडू शकेल, मोठी गर्दी जमवू शकेल असा सोनिया गांधी, प्रियांका गांधी आणि राहुल गांधी यांच्या व्यतिरिक्त कोणताही चेहरा काँग्रेसकडे नाही. परंतु, काँग्रेस एकीकडे महिला सशक्तीकरणाचा नारा देत असताना आणि सरकारी नोकर्‍यांमध्ये महिलांना आरक्षण देण्याचा विचार व्यक्त करीत असताना दुसरीकडे अनेक महिला काँग्रेसला रामराम ठोकत आहेत. ऑगस्ट महिन्यात काँग्रेसच्या महिला अध्यक्षा सुश्मिता देव पक्ष सोडून तृणमूल काँग्रेसमध्ये गेल्या आणि रायबरेली सदर मतदारसंघाच्या आमदार आदिती सिंह या गेल्या महिन्यात भाजपमध्ये सामील झाल्या. ज्या मतदारसंघाच्या खासदार सोनिया गांधी आहेत, अशा मतदारसंघातील त्या आमदार आहेत. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत मोदी लाटेचा मुकाबला करून जे सात आमदार निवडून आले, त्यापैकी आदिती सिंह या एक होत.

महिलांना मोठ्या संख्येने उमेदवारी देणे हे ऐतिहासिक पाऊल असल्याचे काँग्रेसचे नेते मानत असले, तरी राजकीय विश्लेषकांना हे फार मोठे क्रांतिकारक पाऊल वाटत नाही. काँग्रेसमधील महिलांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत; परंतु अधिक जागा जिंकण्याची कुवत कदाचित पक्षात राहिलेली नाही. या निर्णयाचा विधानसभा निवडणुकीत फारसा फायदा झाला नाही, तरी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत निश्चित लाभ होईल, असाही एक मतप्रवाह पक्षात दिसून येत आहे.

– जगदीश काळे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT