Latest

प्रासंगिक : ब्राझीलमधील सत्तांतर

Arun Patil

ब्राझीलमध्ये बोलसानारो विरुद्ध लुला या लढतीला हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीची जागृती अशी झालर प्राप्त झाली होती. लुला यांच्या विजयाने ब्राझीलमध्ये पुन्हा एकदा लोकशाहीला समृद्ध करू पाहणारा आणि समाजात पुरोगामी विचारांना चालना देणारा राष्ट्राध्यक्ष मिळाला आहे. लुला यांचा विजय हा पृथ्वीचा विजय म्हणून साजरा होत आहे.

ब्राझील या लॅटिन अमेरिकेतील सर्वात मोठ्या देशाच्या राष्ट्राध्यक्षीय निवडणुकीत लुइस इनॅसिओ लुला डा'सिल्वा या कामगार पक्षाच्या नेत्याने विद्यमान राष्ट्राध्यक्ष जैर बोलसानारो यांचा केलेला पराभव ही लक्षणीय घडामोड आहे. ब्राझीलच्या 34 वर्षांच्या लोकशाही निवडणुकीच्या इतिहासात प्रथमच विद्यमान राष्ट्राध्यक्षाला पराभवाची चव चाखावयास मिळते आहे. माजी लष्करी अधिकारी असलेले बोलसानारो हे 34 वर्षांपूर्वीच्या ब्राझीलमधील लष्करी सत्तेचे प्रशंसक आहेत, तर लुला डा'सिल्वा यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवातच कामगारांना लष्करी सत्तेविरुद्ध संघटित करण्यातून झाली होती. त्यामुळे बोलसानारो विरुद्ध लुला या लढतीला हुकूमशाही प्रवृत्ती विरुद्ध लोकशाहीची जागृती अशी झालर प्राप्त झाली होती.

लुला यांच्या विजयाने ब्राझीलला पुन्हा एकदा लोकशाहीला समृद्ध करू पाहणारा आणि समाजात पुरोगामी विचारांना चालना देणारा राष्ट्राध्यक्ष मिळाला आहे. लुला यांच्या विजयाने केवळ ब्राझीलच नाही तर जगभरातील पर्यावरणवाद्यांना बळ मिळणार आहे. लुला यांनी नेहमीच हवामान बदलाच्या प्रक्रियेला अत्यंत गांभीर्याने घेतले आहे, तर बोलसानारो यांच्या काळात अमॅझॉन खोर्‍यातील जंगलाची बेफाम कत्तल झाली आहे. या जंगलतोडीचा जगभरातून निषेध झाल्यानंतरही बोलसानारो सरकारने त्यावर कोणतीही कारवाई न केल्याने पर्यावरणवादी संतप्त होते. आता या निवडणुकीतील लुला यांचा विजय हा पृथ्वीचा विजय म्हणून साजरा होत आहे.

यापूर्वी सन 2003 ते 2010 या कालावधीत लुला हे ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षपदी होते. त्यांची ही 7 वर्षांची कारकीर्द गरिबी निर्मूलन कार्यक्रम, समाजातील वंचित घटकांना व महिलांना न्याय, पर्यावरण रक्षणाची धडाडी आणि जागतिक राजकारणात अमेरिकेच्या एकाधिकारशाहीविरुद्धची भूमिका या बाबींमुळे देदीप्यमान ठरली होती. पण जनतेच्या वाढत्या आकांक्षा, उच्चमध्यमवर्गीय व श्रीमंतांची त्यांच्या विरोधातील आघाडी, अत्याधिक धार्मिक घटकांचा उफाळून आलेला विरोध आणि त्यांच्यावर झालेले भ्रष्टाचाराचे आरोप या कारणांनी लुला यांना सत्तेतून पायउतार व्हावे लागले होते. त्यानंतर भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली लुला यांना कारावासाची शिक्षासुद्धा ठोठावण्यात आली होती. मात्र, अलीकडेच ब्राझीलच्या सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्याविरोधातील खटल्यांत सरकारी पक्ष व न्यायालयाने संगनमत केल्याची दलील मान्य करत लुला यांची तुरुंगातून सुटका केली होती.

यापूर्वीच्या लुला यांच्या राष्ट्राध्यक्षीय कारकिर्दीची तीन ठळक वैशिष्ट्ये होती, ज्यांची परिणामकारकता त्यांच्या येत्या कारकिर्दीत पणास लागणार आहे. एक, लुला हे अत्यंत लोकप्रिय राष्ट्राध्यक्ष असूनही त्यांनी लोकशाही संस्थांचे खच्चीकरण न करता त्यांचे सक्षमीकरणच केले होते. सरकारी संस्थांची स्वायत्तता तसेच न्याय यंत्रणेची आणि निवडणूक आयोगासारख्या संस्थांची स्वतंत्रता सुद़ृढ करण्यावर लुला यांचा भर होता. विद्यमान राष्ट्राध्यक्ष बोलसानारो यांनी मात्र लोकशाही संस्थांची तमा न बाळगता स्वत:चा करिश्मा निर्माण करत देशाचा गाडा हाकण्याचा प्रयत्न केला, ज्यात त्यांना यश देखील आले.

मात्र, त्यातून ब्राझीलमध्ये हुकूमशाही व्यवस्थेचे समर्थक व लोकशाहीवादी असे दोन उभे तट तयार झाले आहेत. या निवडणुकीत बोलसानारो यांचा विजय झाला असता तर ब्राझीलच्या लोकशाहीचे अस्तित्वच धोक्यात आले असते याबाबत शंका नाही. या निवडणूक प्रचारात बोलसानारो यांनी स्वत: सत्ताधीश असून देखील निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेवर आणि इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांच्या विश्वासार्हतेवर सातत्याने शंका उपस्थित केल्या होत्या.

निवडणूक निकाल विरोधात गेल्यास निवडणूक प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह लावायचे आणि लष्कराच्या मदतीने सत्तेत कायम राहायचे इतपत बोलसानारो यांची तयारी होती, असे त्यांच्या टीकाकारांचे मत आहे. पण निवडणूक निकालात ब्राझीलच्या संसदेत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नसल्याने (लुला यांचा कामगार पक्ष सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला आहे) आणि काही राज्यांच्या गव्हर्नरपदी बोलसानारोच्या पक्षाचे उमेदवार विजयी झाल्याने निवडणूक निकालाला नाकारणे त्यांना कठीण झाले आहे.

लुला यांच्या पूर्वीच्या राष्ट्राध्यक्षीय कारकिर्दीचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची संघर्षाऐवजी संवाद व सहकार्याची कार्यशैली! ब्राझीलच्या बाहेर लुला यांची ओळख ही डाव्या विचारांचे कडवे ट्रेड युनियनिस्ट अशी असली तरी ब्राझीलच्या राजकारणात त्यांनी नेहमीच विरोधकांशी संवाद व नवनव्या घटकांना राजकीय आघाडीत समाविष्ट करण्याला प्राधान्य दिले आहे. विशेष म्हणजे, सन 1989 पासून आजपर्यंत ब्राझीलमध्ये झालेल्या प्रत्येक निवडणुकीत लुला हे उमेदवार म्हणून लोकांना सामोरे गेले आहेत. केवळ मागील निवडणुकीत न्यायालयाने त्यांना निवडणुकीत सहभागी होण्यास अपात्र ठरवल्याने ऐन प्रचाराच्या काळात त्यांना राजकीय रणांगणातून दूर व्हावे लागले होते.

यंदाच्या निवडणूक निकालानंतर लुला यांनी तत्काळ स्पष्ट केले आहे की, त्यांचे सरकार हे ब्राझीलच्या सर्व नागरिकांचे आहे आणि केवळ त्यांना मतदान करणार्‍या समाजघटकांचे नाही. ज्याप्रकारे बोलसानारो यांनी ब्राझीलमध्ये ध्रुवीकरणाचे राजकारण करत स्वत:ची लोकप्रियता निर्माण केली त्या पार्श्वभूमीवर लुला यांचे प्रतिपादन आश्वासक असले तरी कितपत प्रभावी ठरेल याबाबत शंका आहेत. स्वत:च्या मतदार वर्गासाठीचा पुरोगामी व गरिबी निर्मूलनाचा अजेंडा अंमलात आणण्याकरिता लुला यांची सर्व समाजघटकांशी चर्चेची व त्यांना विश्वासात घ्यायची तयारी असली तरी लुला यांच्या विरोधात असलेल्या मतदारांची आज तरी संवादाची मन:स्थिती नाही.

महिलांना बरोबरीचे व विशेषत: गर्भपाताचे अधिकार आणि तृतीय लैंगिकांना समान अधिकार या मुद्द्यांवर ब्राझीलचे एवेंजिकल चर्च लुला यांच्या विरोधात आहे. सर्व वंशीयांना व त्यातही देशातील आदिवासी जनजातींना मुख्य प्रवाहात सहभागी करण्यासाठीचे प्रक्रिया-निर्माण यांवर लुला यांच्या राजकारणाचा भर आहे, तर या विरोधात श्वेतवर्णीयांची प्रचंड मोठी फळी बोलसानारो यांच्या पाठीशी आहे. याचप्रमाणे गरिबी निर्मूलनासाठी व निम्न मध्यमवर्गाला दिलासा देण्यासाठी मोठ्या प्रमाणात कल्याणकारी योजना राबवणे लुला यांच्यासाठी आवश्यक असले तरी देशातील भांडवलदार, श्रीमंत शेतकरी वर्ग व लष्करातील मोठा गट यांना हे फारसे रुचणारे नाही.

या गटातील अनेकांना बोलसानारो सरकारच्या आर्थिक धोरणांनी मोठा लाभ झालेला आहे, तर इतरांना लुला यांच्या तुलनेत बोलसानारो आर्थिकद़ृष्ट्या कमी अपायकारक वाटतात. या सर्वांचा लुला यांना असणारा विरोध पराकोटीचा आहे, ज्याचा लुला यांना संयमाने सामना करावयाचा आहे. लुला यांच्या पहिल्या राष्ट्राध्यक्षीय कारकिर्दीची सर्वात मोठी उपलब्धी ही ब्राझीलचा आर्थिक विकासाचा दर वाढता ठेवत दोन कोटींहून अधिक लोकांना गरिबी रेषेच्या वर आणण्यात त्यांना मिळालेले यश ही होती. याउलट विद्यमान राष्ट्राध्यक्ष बोलसानारो यांच्या सन 2018 पासूनच्या कार्यकाळात अंदाजे एक कोटी लोक दारिद्य्ररेषेखाली फेकले गेले आहेत. कोव्हिड-19 चा उद्रेक झाल्यापासून आतापर्यंत या महामारीने ब्राझीलमध्ये 70 लाख बळी घेतले आहेत.

बोलसानारो यांच्या पराभवामागील हे एक प्रमुख कारण आहे. कोव्हिड-19 चा फटका बसलेली ही सर्व कुटुंबे लुला यांच्याकडे आशेने बघत आहेत, जे लुला यांच्यापुढील सर्वात मोठे आव्हान ठरणार आहे. यापूर्वीचा लुला यांचा कार्यकाळ हा ब्राझील व जगातील अनेक देशांसाठीचा आर्थिक विकास व भरभराटीचा काळ होता. या काळात आलेल्या संपन्नतेचा लुला यांनी देशातील गरिबांना कौशल्याने फायदा करून दिला होता. मात्र जागतिक अर्थव्यवस्थेत व विशेषत: ब्राझीलचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार असलेल्या चीनमध्ये आर्थिक विकासाचा दर जोपर्यंत पूर्ववत होत नाही, तोवर देशातील गरजूंना दीर्घकालीन आर्थिक दिलासा देणे लुला यांना शक्य होणार नाही.

ब्राझीलमध्ये लुला यांच्या समोरील आव्हान हे कमी-अधिक प्रमाणात लॅटिन अमेरिकेतील सर्वच डाव्या विचारसरणीची सरकारे असलेल्या देशांपुढे आहे. लॅटिन अमेरिकेत सध्या दुसरी गुलाबी लाट आलेली आहे, ज्यामध्ये बहुतांश देशांमध्ये डाव्या विचारसरणीचे नेतृत्व सरकारमध्ये पुनरागमन करत आहे किंवा पहिल्यांदाच सरकार स्थापन करत आहे. 21 व्या शतकाच्या सुरुवातीला लॅटिन अमेरिकेत लोकशाहीची पहिली गुलाबी पहाट अवतरली होती. कालांतराने डाव्या सरकारांची जागा कडव्या उजव्या विचारसरणीच्या नेत्यांनी घेतली होती. आता पुन्हा एकदा लॅटिन जनता डावीकडे झुकली आहे. या प्रक्रियेत निश्चितपणे लॅटिन अमेरिकेतील लोकशाही मजबूत होते आहे.
(लेखक एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्न्मेंट, पुणे इथे कार्यरत आहेत.)

परिमल माया सुधाकर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT