साडेचार हजार वर्षांपूर्वी शलमोन राजाने बांधलेल्या येरुशलेहेमाच्या मंदिरांचे व्यापारीकरण झाले होते. त्याला आव्हान देण्याचे धाडस कुणामध्ये नव्हते. प्रभू येशूंची आध्यात्मिकता त्या कर्मकांडात अडकणारी नव्हती. त्यांना पारंपरिक कर्मकांडे झुगारून द्यायची होती. येशूंनी खरी आध्यात्मिकता ही प्रेम, सेवावृत्ती, क्षमा, दया आणि बंधुभावातच असते हे निक्षून सांगितले. पुरोहितशाही आपले वर्चस्व टिकविण्यासाठी धर्मशास्त्राच्या नावाखाली लोकांना कर्मकांड शिकविते, हे प्रभू येशू जाणून होते. प्रभू येशूने मंदिरात प्रवेश केला. देश-विदेशातून येणारे लोक चलनाची देवघेव तेथे करत होते.
येशूने सराफांचे नाणी मांडलेले चौरंग आणि बळी देण्यासाठी पशुपक्षी विकणार्या लोकांच्या बैठका उचलून फेकून दिल्या. तो त्यांना म्हणाला, माझे घर हे प्रार्थना मंदिर असेल, असे लिहून ठेवलेले आहे; पण तुम्ही तर या मंदिराला चोरांची गुहा बनवून टाकली आहे. प्रभू येशूंनी केलेल्या या कृत्याबद्दल प्रमुख पुरोहित आणि शास्त्री-परुशीलोक मनात डूख धरून होते. प्रभू येशूंची शिकवण, त्यांनी केलेली दिव्य कृत्ये आणि त्यांना अनुसरणारा प्रचंड जनसमुदाय, हे सर्व त्या धर्ममार्तंड मंडळींच्या मनात सलत होते.
आपण शुद्ध आहोत आणि आपले धर्माचरणही शुद्ध आहे, हे दाखविण्याचा प्रयत्न करणार्या या धर्मपंडितांचा पाणउतारा करीत प्रभू येशू म्हणतात, तुम्ही परुशी प्याला व ताट बाहेरून स्वच्छ करता; पण तुमचे अंतरंग आतून लोभाने, अधाशीपणाने, फसवणुकीच्या विचारांनी व दुष्टतेने भरले आहे. स्वतःचे सामाजिक श्रेष्ठत्व मिरविण्याचा आटापिटा हे धर्मपंडित करीत; पण सर्वसामान्य लोकांसाठी ते कणभरही काही करीत नसत. म्हणून प्रभू येशू त्यांना म्हणतात, नियमशास्त्राच्या शिक्षकांनो, तुमचा धिक्कार असो. कारण, तुम्ही लोकांना वाहण्यास कठीण असे ओझे लादता व ते उचलण्यास तुमच्या एका बोटानेसुद्धा मदत करीत नाही.
उच्च-नीचता आणि भेदाभेद मानणार्या आणि सामान्यजनांची अवहेलना करणार्या या धर्ममार्तंडाना प्रभू येशू म्हणतात, तुमचा धिक्कार असो. कारण, तुम्हाला सभास्थानातील महत्त्वाच्या जागी बसणे आणि बाजारात नमस्कार घेणे आवडते. अशाप्रकारे उघडपणे टीकास्त्र सोडून या मंडळींच्या सामाजिक, धार्मिक आणि आर्थिक स्थानालाच धक्का देणार्या प्रभू येशूचा काटा काढण्याचे कटकारस्थान रचण्यास धर्ममार्तंड व वरिष्ठांनी सुरुवात केली नसती तरच नवल.
भेदाभेद, जातीय उच्च-नीचता, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष अस्पृश्यता, द्वेष आणि द्वेशोक्ती हे धार्मिक आचरण ठरू शकत नाही, तर त्याउलट प्रेम, सेवा, क्षमा, दया या मूल्यांचे जो पालन करतो तोच खरा धार्मिक असतो हे प्रभू येशूंनी शिकविले आहे. त्यांची आज्ञा आहे की, जसे तू स्वतःवर प्रेम करतोस, तसे तू इतरांवरही प्रेम कर. ही त्यांची एकमेव आज्ञा असली तरी त्याची एक पोट-आज्ञा देखील त्यांनी दिलेली आहे. ती पोट-आज्ञा आहे, तू आपल्या शत्रूवरही प्रेम कर. परमेश्वर प्रेम आहे, असे स्पष्ट विधान बायबलमध्ये आहे. ज्यांच्या ठायी प्रेम आहे, त्यांच्या ठायी परमेश्वर असतो. तर ज्यांच्या हृदयी द्वेष आहे, तिथे सैतान असतो.
शास्त्री-परुशी येशूंचा मनोमन द्वेष करू लागले. चांदीची तीस नाणी घेऊन फितूर झालेल्या यहुदा इस्कारीओतच्या मदतीने प्रभू येशूंना प्रमुख याजकाच्या सैनिकांनी ताब्यात घेतले. निर्दोष प्रभू येशूंला संगनमताने क्रूसावरील मृत्यूची शिक्षा देण्यात आली. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे शरीर तागाच्या कपड्यात गुंडाळून एका थडग्यात ठेवले आणि मोठी धोंड लोटून ते थडगे बंद केले. तो दिवस शुक्रवारचा (गुड फ्रायडे) होता.
प्रभू येशूंच्या जन्म-मृत्यूचे नियोजन ईश्वराने केल्याचे जुन्या करारात लिहून ठेवले आहे. हे जुन्या कराराचे पुस्तक येशूंच्या जन्मापूर्वी 335 वर्षे अगोदर लिहून पूर्ण झाले. प्रभू येशूंच्या मृत्यूनंतर तिसर्या दिवशी, रविवारी (इस्टर) त्याचे पुनरुत्थान झाले. त्यानंतर चाळीस दिवस तो आपल्या शिष्य, अनुयायांना भेटत राहिला. येशू ख्रिस्ताचे पुनरुत्थान हा ख्रिश्चन विश्वासाचा पाया आहे. जेव्हा येशू मेलेल्यांतून उठला, तेव्हा देवाचा पुत्र म्हणून त्याच्या ओळखीची पुष्टी झाली.
– प्रा. डॉ. मार्यान रॉड्रिक्स