सर्वच युवक करिअर यशस्वी करण्यासाठी धडपडत असतात. परंतु, सुरुवातीच्या काळात काही किरकोळ चुकांमुळे जॉब मार्केटमध्ये प्रतिमा खराब होते. परिणामी, नोकरी मिळण्यास अडचणी येऊ लागतात. गैैरसमजापोटी कंपनीच्या मनात एखाद्या उमेदवाराबाबत चुकीची प्रतिमा निर्माण होते. या गोष्टी टाळण्यासाठी काही खबरदारी घेणे गरजेचे आहे. या आधारावर आपण यशस्वी करिअर करू शकतो.
अल्पकालीन आणि दीर्घकालीन ध्येय लक्षात घेऊनच करिअरचे नियोजन करायला हवे. जोपर्यंत ध्येय निश्चित करत नाहीत, तोपर्यंत आपण करिअरवर फोकस करू शकणार नाही आणि स्थैर्यही येणार नाही. कामाप्रती म्हणजेच असायनमेंटला दुय्यम स्थान देण्याचे टाळा. सकारात्मक विचाराने वाटचाल करा. प्रत्येक काम काळजीपूर्वक करा. लहान-सहान कामातूनच मोठी जबाबदारी येते.
टाईम मॅनेजमेट शिका. यासाठी कामाचा प्राधान्यक्रम ठरवा आणि ठरलेल्या वेळेत ती कामे पूर्ण करण्याबाबत आग्रही राहा. कामात चालढकल करू नका. वरिष्ठ आणि सहकार्यांकडून शिकण्याची तयारी ठेवा. जर नवीन शिकण्याची संधी मिळाली तर ती सोडू नका. कोणतेही नवीन आव्हान, संधी स्वीकारण्यास घाबरू नका. नवीन प्रकल्पावरील कामाला स्वत:पासून सुरुवात करा. प्रत्येक वेळी बॉस किंवा सिनिअर मंडळीकडून प्रोत्साहन मिळेलच असे नाही.
नवीन वातावरण आणि नवीन लोकांसमवेत काम करताना स्वत:चा इगो बाजूला ठेवा. कोणत्याही कामाला नाही म्हणू नका. मी हे का करू, ते का करू… असे बोलू नका. यामुळे आपल्याविषयी नकारात्मक प्रतिमा उभा राहू शकते. कंपनीतील विशेष प्रशिक्षण कार्यक्रम आणि सेमिनारमध्ये आवर्जुन सहभागी व्हा. यामुळे आपल्या प्रतिभेला आणि क्षमतेत सुधारणा येईल. हा अनुभव भविष्यासाठी फायदेशीर राहील. आपण ज्या क्षेत्रात काम करत आहात, त्या क्षेत्राशी निगडीत आणखी माहिती मिळवण्याचा प्रयत्न करा. अपडेट राहून कामात अधिकाधिक अचूकता आणा. कामाप्रती प्रामाणिक राहा.
कंपनीची महत्त्वपूर्ण आणि गोपनीय माहिती तसेच डेटा लिक करू नका. कामाच्या ठिकाणी पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफला वेगवेगळे ठेवा. कुटुंबातील अडचणींचा पाढा सहकारी, सिनिअर मंडळीसमोर वाचू नका. कार्यालयातील तणाव घरात आणू नका. यामुळे दोन्ही ठिकाणी आपण शंभर टक्के योगदान देऊ शकणार नाही. सतत नोकरी बदलण्याचा विचार करू नका. पैशासाठी ही मंडळी कधीही नोकरी सोडू शकतात, असा कंपनीचा समज होतो. त्यामुळे कंपनी जबाबदारी देताना विचार करते. बॉस, सिनिअर, सहकारी आणि ऑफिसबॉय यांच्यासमवेत चर्चा किंवा बोलताना बेसिक मॅनर्स पाळण्याची गरज आहे.
आपल्या व्यवहारातून किंवा कामाच्या पद्धतीतून एखादा अडचणीत येणार नाही, याची काळजी घ्या. करिअरच्या प्रारंभीच्या काळात अधिक वेतनाची मागणी करू नका. नवीन जॉबच्या ठिकाणी कौशल्य वाढवण्याचा प्रयत्न करा. करिअरचा ग्रोथ कसा वाढेल याचाच विचार करा. वर्कप्लेसवर फोनचा वापर गरजेपेक्षा अधिक करू नका. मिटिंग, सेमिनार किंवा क्लाईंटबरोबर बोलताना फोन सायलेंट मोडवर ठेवा.
– जगदीश काळे