गारगोटी ; रविराज वि. पाटील : प्रकाश आबिटकर यांनी एकनाथ शिंदे गटाची पाठराखण केल्यामुळे राधानगरी विधानसभा मतदारसंघाला मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आबिटकरांनी दोन निवडणुकांत राष्ट्रवादीचे माजी आमदार के. पी. पाटील यांच्याशी लढत देऊन विजय संपादन केला. गत निवडणुकीत जिल्ह्यात निवडून आलेल्यांमध्ये शिवसेनेचे ते एकमेव आमदार ठरले. या मतदारसंघात सर्वाधिक विकास निधी खेचून आणण्यासाठी आ. आबिटकर यांना तत्कालीन मंत्री एकनाथ शिंदे यांचे मोठे पाठबळ मिळाले. यामुळेच आ. आबिटकर हे शिंदे यांच्या गोटात दाखल झाल्याचे बोलले जाते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आ. आबिटकर यांना मंत्रिपद देऊन सन्मान करतील, असा विश्?वास कार्यकर्त्यांत आहे.
भौगोलिकदृष्ट्या राधानगरी-भुदरगड- आजरा या विस्तीर्ण क्षेत्रात विस्तारलेल्या या राधानगरी विधानसभा मतदारसंघातील मतदारांची अपेक्षापूर्ती करताना महाविकास आघाडी शासनात आ. आबिटकरांची मोठी दमछाक होत होती. सत्तेत असूनही राष्ट्रवादी, काँग्रेसच्या मंत्र्यांच्या आडकाठीमुळे म्हणावी तशी प्रश्?नांची उकल होत नसल्याची कार्यकर्त्यांत भावना होती. त्यामुळे नव्या सरकारमध्ये आ. आबिटकर यांना मानाचे स्थान मिळेल व विविध प्रलंबित प्रश्?न सोडविण्यास मदत होईल, अशी चर्चा आहे.
बदलत्या राजकीय समीकरणात स्थानिक भाजप कार्यकर्त्यांना आ. आबिटकर यांच्याशी जुळवून घ्यावे लागेल, असे चित्र आहे; तर भुदरगडचे सुपुत्र व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची आबिटकरांना साथ मिळाल्यास मतदारसंघाचा कायापालट होण्यास वेळ लागणार नाही, अशा प्रतिक्रिया सामान्यांतून उमटत आहेत.
आ. आबिटकर यांच्या भूमिकेमुळे आबिटकर गटास मोठे बळ मिळणार असून, मूळ शिवसैनिकांना त्यांचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी झगडावे लागणार आहे. आगामी निवडणुकांत नव्या सरकारमुळे भाजप कार्यकर्त्यांना बळ मिळेल; मात्र राष्ट्रवादी, काँग्रेस पक्षाला त्याचा लाभ होणार नाही. त्यामुळे या समीकरणात कार्यकर्ते, राजकीय सत्ता सांभाळताना त्यांना मोठी कसरत करावी लागणार आहे. नव्या राजकीय समीकरणांमुळे आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व बिद्री साखर कारखान्यासह विविध सहकारी संस्थांच्या निवडणुकांत याचे पडसाद उमटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.