कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : पोस्टल कर्मचार्यांची सेवाशर्ती असो किंवा अन्य प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडे प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही माजी खासदार संभाजीराजे यांनी दिली.
अखिल भारतीय डाक कर्मचारी संघटना वर्ग तीन, पोस्टमन व एम. टी. एस. शाखेचे संयुक्त द्वैवार्षिक अधिवेशन रविवारी मंगळवार पेठेतील दैवज्ञ बोर्डिंगमध्ये झाले. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी गोवा रिझनचे सचिव नितीन नेमलेकर होते.
संभाजीराजे म्हणाले, खेडोपाडी, वाड्या-वस्त्यांवरील लोकांच्या घरी जाऊन संदेशाची देवाणघेवाण करण्याचे मोठे काम पोस्टल कर्मचार्यांकडून होत आहे. शासनाच्या सर्व योजना या विभागामुळे लोकांपर्यंत जाऊन पोहोचत आहेत. अशा या पोस्ट खात्याला संपविण्यासाठी खासगीकरणाचा पर्याय उभा करणे, हे यापुढे चालणार नाही.
कॉ. संभाजी मगदूम म्हणाले, सध्या सर्व विभागात प्रतिकूल परिस्थिती आहे. त्यामुळे संघर्षाशिवाय पर्याय नाही. प्रलंबित मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी येत्या काळात संप पुकारला जाईल.
संघटनेचे सचिव संजय पताडे यांनी संघटनेच्या कार्याचा आढावा घेतला. या अधिवेशनास अमोल शिंदे, जी. बी. चौगुले, सुयोग हुले, जी. आय. पाटील, दीपक भितले, आर. डी. माने, वल्लभ म्हैदरकर, रामचंद्र संकपाळ यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, सभासद उपस्थित होते.