मुंबई; पुढारी वृत्तसेवा : सरकारी कामात अडथळा आणणाऱ्या एका रेकॉर्डवरील तडीपार गुन्हेगाराला वांद्रे पोलिसांनी अटक केली. आरिफ हमीद शेख ऊर्फ मायकल असे या आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला वांद्रे येथील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते. पोलीस ठाण्यात मायकलने 'कारवाई करणाऱ्या पोलिसांचा मर्डर केला नाही, तर नाव लावणार नाही', अशी धमकी दिल्याचे एका अधिकाऱ्याने बोलताना सांगितले.
रविवारी सायंकाळी रंगशारदा हॉटेलमध्ये महत्त्वाचा बंदोबस्त असल्याने तिथे वांद्रे पोलिसांच्या एका विशेष पथकाला बंदोबस्ताकामी तैनात करण्यात आले होते. रात्री बंदोबस्त संपल्यांनतर पोलीस पथक वांद्रे पोलीस ठाण्यात जात होते. रात्री साडेदहा वाजता मायकल नावाचा एक तडीपार गुन्हेगार लालमट्टी परिसरात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलिसांनी तिथे धाव घेतली असता मायकल हा काही लोकांशी वाद घालून त्यांना मारहाण करीत असल्याचे दिसून आला. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ नये म्हणून पोलिसांनी त्याला चौकशीकामी ताब्यात घेतले. यावेळी त्याने पोलिसांशी हुज्जत घालून त्यांना खोट्या गुन्ह्यांत अडकाविण्याची भाषा सुरु केली होती. तसेच पोलिसांच्या हाताला झटका देऊन एपीआय वाघमोडे यांच्या शर्टच्या कॉलर पकडून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा पळून जाण्याचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला.
यावेळी मायकलसह त्याच्या आईसह बहिणीने पोलिसांच्या कामात हस्तक्षेप करुन सरकारी कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला होता. त्यांना बाजूला करुन त्याला पोलिसांनी पोलीस ठाण्यात आणले. तिथेही त्याने पोलिसांना धमकी देण्यास सुरुवात केली. तुम्हाला बघून घेतो, तुमचा मर्डर केला नाहीतर नाव लावणार नाही असे बोलून पोलिसांना धमकी देऊ लागला. या धमकीनंतर त्याचविरुद्ध पोलिसांनी भादवीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदवून नंतर त्याला पोलिसांनी अटक केली.