Latest

पोर्तुगालमध्ये सापडल्या आठ हजार वर्षांपूर्वीच्या ममी

अमृता चौगुले

लिस्बन :  दक्षिण पोर्तुगालमध्ये 60 वर्षांपूर्वी एका पुरातत्त्व संशोधकाने आठ हजार वर्षांपूर्वीच्या थडग्यांमधील अनेक मानवी सांगांड्यांची छायाचित्रे टिपली होती. आता नव्या संशोधनातून असे दिसून आले आहे की या फोटोंमधून दिसणारे सांगाडे म्हणजे जगातील सर्वात जुने मानवी ममींचे उदाहरण आहे. विशेष म्हणजे अशा सर्वात जुन्या ममी इजिप्त किंवा चिलीमध्ये सापडल्या नसून ते युरोपमध्ये सापडलेल्या आहेत!

1960 च्या दशकात पोर्तुगालमधील दक्षिणेकडील सॅडो व्हॅलीत बारापेक्षाही अधिक प्राचीन मानवी सांगाडे सापडले होते. यापैकी किमान एका मानवी देहावर ममी बनवण्याची प्रक्रिया करण्यात आली होती असे संशोधकांना वाटते. ही क्रिया कदाचित दफनापूर्वी मृतदेहाचे स्थलांतर करण्याच्या सोयीसाठी केलेली असावी. संशोधकांनी या दफनभूमीला भेट दिली आणि तेथील सांगाड्यांच्या छायाचित्रांचे विश्लेषणही केले. तेथील अन्यही काही मृतदेहांचे ममीकरण करण्यात आलेले असावे अशा खुणा आढळल्या आहेत. त्या काळात संबंधित भागात ही पद्धत चांगली रुळलेली असावी असेही दिसून आले आहे.

इजिप्तमध्ये 4500 वर्षांपेक्षाही जुन्या काळात मृतदेहांवर विविध प्रक्रिया करून त्यांचे रूपांतर दीर्घकाळ टिकून राहू शकणार्‍या 'ममी' मध्ये केले जात असे. युरोपमध्येही कुठे कुठे दोन हजार वर्षांपूर्वीच्या ममींच्या खुणा आढळलेल्या आहेत. चिलीच्या अटाकामा वाळवंटातही किनारपट्टीजवळ एक हजार वर्षांपूर्वीच्या ममी आढळल्या. मात्र, आता पोर्तुगालमध्ये या तब्बल आठ हजार वर्षांपूर्वीच्या ममींचे पुरावे सापडले आहेत. पोर्तुगीज पुरातत्त्व संशोधक मॅन्युएल फरिन्हा डोस सँटोस यांनी त्यांचे फोटो टिपले होते. या संशोधकाचा 2001 मध्ये मृत्यू झाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT