पुणे/बीड : पुढारी वृत्तसेवा : आरोग्य विभागाच्या पेपरफुटी प्रकरणात सायबर पोलिसांनी रविवारी बीडमधून संजय शाहूराव सानप (वय 40, मूळ वडझरी, ता. पाटोदा, बीड) याला अटक केली. सानप हा पेपरफुटीमधील महत्त्वाचा एजंट आहे. त्याने बीडमधील एका मंगल कार्यालयात परीक्षा देणारी मुले एकत्र करून पेपर वाटला असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे.
परीक्षार्थ्याला पेपर देण्याच्या मोबदल्यात संजय सानप याने मोठा आर्थिक व्यवहार केला आहे. प्रत्येक विद्यार्थ्याकडून त्याने एक ते दीड लाख रुपये घेतले आहेत. अशाप्रकारे सानप याने तो पेपर शंभर ते दीडशे जणांना दिला असल्याची माहिती आहे. सानप हा पाटोदा तालुका भाजप युवा मोर्चाचा माजी पदाधिकारी आहे. सध्या तो विद्यमान उपसरपंच आहे.
त्याचे तीन भाऊ आरोग्य विभागात नोकरीला असल्याचे समजते. आरोग्य विभागातील पेपरफुटीची पाळेमुळे अतिवरिष्ठ अधिकार्यापासून ते ग्रामीण भागापर्यंत पोहोचल्याचे दिसून येते. आरोग्य पेपरफुटी प्रकरणात भूम, उस्मानाबाद येथील ग्रामीण रुग्णालय सहायक अधीक्षक कार्यालयातील क्लार्क राजेंद्र सानप याला सायबर पोलिसांनी अटक केली होती.
त्याच्याकडे केलेल्या तपासात त्याने एजंट संजय सानप याला आरोग्य विभागाचे गट क व गट ड चे पेपर पुरविल्याची कबुली दिली होती. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत संजय सानपला अटक केली. क्लार्क राजेंद्र सानप व संजय सानप हे दोघे एकमेकांच्या परिचयाचे असून एकाच गावातील आहेत.
परीक्षेच्या एक महिन्यापूर्वीच पेपर अनेकांपर्यंत
पेपरफुटीच्या कटातील मुख्य सूत्रधार आरोग्य विभागाच्या तांत्रिक विभागाचा सहसंचालक महेश सत्यवान बोटले (वय 51) याच्याकडे आरोग्य विभागाची राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई तांत्रिक सहसंचालक म्हणून जबाबदारी देण्यात आली होती. आरोग्य विभागामार्फत घेण्यात येणार्या गट 'क' व 'ड' पदाच्या भरती प्रक्रियेत लेखी परीक्षेचा पेपर सेट करणार्या समितीत त्याची नियुक्ती होती. या दरम्यान 24 ऑक्टोबर रोजी गट 'क'ची परीक्षा तर 31 ऑक्टोबर रोजी गट 'ड' पदाची लेखी परीक्षा होणार होती. परंतु दोन्ही परीक्षेचे पेपर सेट झाल्यानंतर त्याने परीक्षा होण्यापूर्वीच एक महिना आधी म्हणजे 24 सप्टेंबर रोजी परीक्षेचा पेपर लातूरच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे मुख्य प्रशासकीय अधिकारी प्रशांत बडगिरे (50) याला पेन ड्राईव्हमधून दिला. त्यानंतर बडगिरे याने तो पेपर अनेकांना दिला होता.
संजय सानप भाजयुमोचा माजी अध्यक्ष
बीड : आरोग्य विभाग पेपर फुटीत पोलिसांनी अटक केलेला संजय शाहूराव सानप हा भाजयुमोचा माजी अध्यक्ष आहे. सानपला पुणे सायबर पोलिसांनी सोमवारी अटक केली. त्याला 23 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. संजय सानप हा बीड जिल्ह्यातील वडझरीचा उपसरपंच आहे. त्याचे निवासस्थान बीड शहरात असून त्याच्या अटकेमुळे भाजपच्या गोटात खळबळ उडाली आहे.
बीड जिल्हा पेपरफुटीचे केंद्र ?
एकट्या बीड जिल्ह्यातून पोलिसांनी आठ जणांना अटक केली आहे. पुणे पोलिसांनी आता बीड जिल्ह्यावर लक्ष केंद्रित केले आहे. या पेपरफुटीत मुंबईतील महेश बोटले आणि खलाशी प्रकाश मिसाळ हे वगळता औरंगाबाद, जालना, बीड, बुलडाणा येथील आरोग्य विभागातील अधिकारी, क्लार्क, एजंट आणि क्लासचालकांचा समावेश आहे. औरंगाबाद येथील तीन क्लासचालक, एजंट तसेच जालना, बुलडाणा येथील एजंट व परीक्षार्थींचा समावेश आहे.