वॉशिंग्टन : अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था 'नासा'ने म्हटले आहे की फ्रान्समधील आयफेल टॉवरइतक्या आकाराचा एक विशाल लघुग्रह पुढील महिन्यात पृथ्वी जवळून जाणार आहे. 'नासा'ने त्याला संभाव्य धोकादायक लघुग्रहांच्या यादीत समाविष्ट केलेले असले तरी तो पृथ्वीपासून बर्याच अंतरावरून पुढे निघून जाईल. या लघुग्रहाचे नाव '4660 नेरेअस' असे असून तो फुटबॉलच्या पीचपेक्षा सुमारे तिप्पटीने अधिक मोठा आहे.
इतक्या मोठ्या आकाराच्या लघुग्रहाची जर पृथ्वीला धडक झाली तर मोठी हानी होऊ शकते. मात्र, या लघुग्रहाबाबत तो धोका नाही. 'नासा'ने म्हटले आहे की हा लघुग्रह 39 लाख किलोमीटर अंतरावरून निघून जाईल. हे अंतर पृथ्वी आणि चंद्रादरम्यानच्या एकूण अंतराच्या दहा पट अधिक आहे. 11 डिसेंबरला हा लघुग्रह पृथ्वी जवळून जाण्याची शक्यता आहे. हा नेरेअस लघुग्रह 330 मीटर लांबीचा आहे. 90 टक्के लघुग्रहांच्या तुलनेत तो आकाराने मोठा आहे.
अर्थात त्याच्यापेक्षाही मोठ्या आकाराचे काही लघुग्रह अंतराळात आहेत. मंगळ आणि गुरू या ग्रहांदरम्यान लघुग्रहांचा एक पट्टा म्हणजेच 'अॅस्टेरॉईड बेल्ट'च आहे. 'नेरेअस' 664 दिवसांमध्ये सूर्याभोवतीची एक प्रदक्षिणा पूर्ण करतो. भविष्यात 2 मार्च 2031 मध्ये तो पृथ्वीजवळून जाण्याची शक्यता आहे. अमेरिकन खगोलशास्त्रज्ञ अॅलेनोर एफ.
हेलिन यांनी 1982 मध्ये या लघुग्रहाचा शोध लावला होता. 'नासा' सध्या दोन हजार अशा लघुग्रहांवर नजर ठेवून आहे ज्यांच्यापासून पृथ्वीला धोका संभवतो. अशाच एका लघुग्रहाच्या धडकेनंतर पृथ्वीवरून डायनासोर व अन्य अनेक जीव नष्ट झाले होते.