ऋग्वेदात म्हटले आहे की, 'एकम् सत् विप्रा बहुधा वदन्ति'. एकच परमसत्य आहे आणि विद्वान लोक त्याला वेगवेगळ्या नावांनी संबोधतात, असा त्याचा अर्थ. या एकमेवाद्वितीय परमसत्याचा, परब्रह्माचा वेदान्तातून म्हणजेच उपनिषदांमधून सुंदररीत्या बोध करण्यात आला आहे. हे एकच परमसत्य वेगवेगळ्या नाम-रूपात भरून राहिलेले आहे. श्रीमद् भगवद्गीतेतही म्हटले आहे की, 'यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवती भारत। अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्॥' (हे भारता, अर्जुना, ज्या ज्या वेळी धर्माची हानी व अधर्माची वृद्धी होते, त्यावेळी मी साकार रूपात प्रकटतो) हेच सर्वव्यापी परब्रह्म पाच हजार वर्षांपूर्वी 'भगवान श्रीकृष्ण' या नावाने आणि सुंदर, सावळ्या रूपाने प्रकटले. भगवंताने जन्मापासून ते महानिर्याणापर्यंत मानवाला थक्क करणार्या अनेक लीला केल्या.
अर्जुन, उद्धवाचे निमित्त करून जगाला भरभरून ज्ञान दिले व 'कृष्णं वन्दे जगद्गुरूम' ही ओळखही निर्माण केली. श्रीकृष्णाचा अवतार व लीला अगाध आहेत. स्वतः श्रीकृष्णानेच गीतेत म्हटले आहे की, 'जन्म कर्म च मे दिव्यमेवं यो वेत्ति तत्त्वतः। त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति सोऽर्जुन॥' (हे अर्जुना, माझे जन्म व कर्म दिव्य आहेत, जो त्यांना तत्त्वतः जाणतो, त्यांचा पुनर्जन्म होत नाही तर ते माझी प्राप्ती करतात.) भगवान श्रीकृष्णाने आपल्या या लोकोत्तर चरित्रात अनेक प्रकारच्या भूमिका समर्थपणे वठवल्या. श्रीकृष्णाचे हे चरित्र अनेक प्राचीन ग्रंथांमध्ये आहे. त्यामध्ये एकूण बारा स्कंध असलेल्या श्रीमद् भागवत महापुराणाचे स्थान अनन्यसाधारण आहे.
विशेषतः भागवताच्या दहाव्या स्कंधात श्रीकृष्णाच्या अतिशय सुंदर बाललीला आहेत. अकराव्या स्कंधात श्रीकृष्णाने उद्धवाला केलेला उपदेश व महानिर्याणाचे वर्णन आहे. महाभारतातही ठिकठिकाणी श्रीकृष्णाचे वर्णन आहे. महाभारताचेच खील पर्व (पुरवणी किंवा परिशिष्ट) असलेल्या हरिवंशामध्येही श्रीकृष्णाचे चरित्र आहे. याशिवाय ब्रह्मवैवर्त पुराण, विष्णू पुराण यांसारख्या अनेक पुराणांमध्येही श्रीकृष्ण चरित्र आहे. छांदोग्य उपनिषदात घोर अंगीरसाचा शिष्य असलेल्या 'देवकीपुत्र कृष्णा'चा उल्लेख आहे. हा कृष्ण वेगळा असल्याचे काहींचे म्हणणे आहे, तर काहींना हाच देवकी-वसुदेवांचा पुत्र भगवान श्रीकृष्ण असावा, असे वाटते. शतपथ ब्राह्मण व ऐतरेय आरण्यकात श्रीकृष्ण व त्याच्या वृष्णी वंशाचा उल्लेख आहे. पाणिनीच्या अष्टाध्यायीतही वासुदेव श्रीकृष्ण आणि अर्जुनाचा उल्लेख आहे. यास्काचार्यांच्या 'निरुक्त' (वैदिक शब्दकोश) मध्येही अक्रुराजवळील स्यमंतक मण्याचा व पर्यायाने कृष्णकथेचा संदर्भ आढळतो. अनेक संतकवींनी श्रीकृष्णाचे रसाळ चरित्र आपापल्या भाषेत लिहून ठेवले आहे.
अनेक वैष्णव संप्रदायांचे आराध्य दैवत भगवान श्रीकृष्णच आहे. अर्थातच परमात्म्याचे कोणतेही सुदिव्य रूप व त्याचे कार्य (लीला) किंवा उपदेश हा केवळ सांप्रदायिक संकुचितपणाचा विषय ठरत नाही. भगवंताचे कोणतेही दिव्य रूप हे अखिल मानवजातीच्या उद्धारासाठीच असते व त्याला कोणत्याही विशिष्ट सीमा नसतात. एकाच असीमित अशा आनंदस्वरूप परब्रह्माचे हे वेगवेगळ्या नावाने व रूपाने घेतलेले अवतार असल्याने त्यांच्यामध्ये भेद करून त्यांना किंवा स्वतःच्या पारमार्थिक प्रगतीलाही मर्यादित, संकुचित करण्याचा प्रयत्न हानिकारकच ठरतो. भगवान श्रीकृष्णाने स्वतःच्या अलौकिक चरित्रात तसेच गीता किंवा उद्धवगीतेसारख्या उपदेशातही असा संकुचितपणा झिडकारून उदात्त, भव्य मार्ग दर्शविलेला आहे.
सर्व स्तरांतील मानवांचा आणि निसर्ग व पशुपक्ष्यांचाही मेळ घालून सुंदर सहजीवन कसे जगायचे हे त्यांनी आपल्या बाललीलेतून दर्शवले. भुकेलेल्यास अन्न देणे (यज्ञपत्नींची कथा), निसर्ग-नद्या आणि पर्वतांची काळजी घेणे (गोवर्धनपूजा), अन्यायाला प्रखर विरोध करणे (कंस व असुरांचे मर्दन), विद्यासंपादन व गुरुशुश्रूषा करणे (सांदिपनी आश्रम), गरिबांची उन्नती घडवून आणणे (सुदामा) असे अनेक प्रकारचे उपदेश श्रीकृष्णाच्याच चरित्रातून मिळतात. भौमासुराने अपहरण केलेल्या राजकन्यांशी विवाह करून श्रीकृष्णाने त्यांना समाजात मानाचे स्थान मिळवून दिले. एक योद्धा, राजनीतिज्ञ म्हणूनही श्रीकृष्णाने महत्त्वाची भूमिका बजावली. या पूर्णावतारास जन्माष्टमीनिमित्त शतशः नमन!