कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : महाद्वार, गरुड मंडप, कासव चौक, पितळी उंबरा, गाभारा असा प्रवास करत मावळतीच्या सुवर्ण किरणांनी अखेर रविवारी करवीरनिवासिनी श्री अंबाबाई देवीच्या मूर्तीवर पूर्णपणे प्रकाशझोत टाकला. सूर्यकिरणे देवीच्या मुखापर्यंत पोहोचली. मंदिर स्थापत्याच्या वैशिष्ट्यामुळे झालेला किरणोत्सवाचा हा अनुपम सोहळा पाहून पर्यटक भारावून गेले. पूर्ण क्षमतेने किरणोत्सव होताच 'अंबा माता की जय' अशा जयघोषात आरती करण्यात आली.
करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिरात वर्षातून दोनवेळा किरणोत्सव होतो. हा किरणोत्सव तीन-तीन दिवसांचा असायचा. मात्र, स्वामी विवेकानंद महाविद्यालयातील प्रा. खगोल अभ्यासक डॉ. मिलिंद कारंजकर व त्यांच्या सहकार्यांनी किरणोत्सवाचा कालावधी तीन नव्हे, तर पाच दिवसांचा असल्याचे अभ्यासाअंती सिद्ध केले. त्यानंतर गेल्या काही वर्षांपासून पाच दिवस किरणोत्सव होतो. किरणोत्सवातील अडथळेही देवस्थान समितीने कोल्हापूर महापालिकेच्या मदतीने टप्प्याटप्प्याने हटविले आहेत.
यंदा शनिवारी किरणोत्सवास सुरुवात झाली. पहिल्या दिवशी किरणोत्सव मार्गात एक अडथळा आल्याने किरणे मूर्तीच्या कमरेपर्यंतच पोहोचली होती. रविवारीही वातावरण स्वच्छ असल्याने सायंकाळी प्रकाश किरणेही प्रखर होती. तसेच किरणोत्सव मार्गातील सर्व अडथळे दूर झाल्याने किरणोत्सव पूर्ण क्षमतेने होईल, अशी अपेक्षा होती. त्यानुसार घडले.
* प्रत्यक्ष किरणोत्सवाच्या आधी दोन दिवसांपासूनच किरणोत्सव
* चांदीच्या उंबर्यापर्यंत प्रकाश किरणांची तीव्रता 10 वर्षांत प्रथमच 16 हजार 600 लक्ष
* स्वच्छ वातावरण, कमी आर्द्रता व धूलिकण नसल्याने पूर्ण क्षमतेने किरणोत्सव
करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिरातील किरणोत्सव सोहळा तीन दिवसांऐवजी पाच दिवस होत असल्याचे खगोल अभ्यासक डॉ. मिलिंद कारंजकर यांच्या अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. त्यानुसार प्रत्यक्ष किरणोत्सवाच्या आधी दोन दिवसांपासूनच किरणोत्सव पाहण्यास मिळाला.
– शिवराज नाईकवाडे, सचिव, देवस्थान समितीपाच दिवसांच्या किरणोत्सवाच्या पहिल्या दिवशीपेक्षा तिप्पट तीव्रता दुसर्या दिवशी होती. चांदीच्या उंबर्यापर्यंतची तीव्रता 10 वर्षांत प्रथमच 16 हजार 600 लक्ष इतकी नोंद झाली आहे. शिवाय, स्वच्छ वातावरण, कमी आर्द्रता व धूलिकण नसल्याने पूर्ण क्षमतेने किरणोत्सव झाला.
– प्रा. डॉ. मिलिंद कारंजकर, खगोल अभ्यासक