पुणे/मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : वक्फ बोर्डाच्या जमिनीसंदर्भात झालेल्या घोटाळ्यातील जरीफ खान आणि त्याच्या साथीदारांनी बोगस ट्रस्ट स्थापन करून बोर्डाच्या जमिनीच्या बदल्यात आर्थिक फसवणूक केली होती. याप्रकरणी गुरुवारी पुण्यात 'ईडी'कडून झाडाझडती घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. सूत्रांच्या माहितीनुसार, नाना पेठेत मोठ्या पोलीस बंदोबस्तात छापेमारी करण्यात आली. या कारवाईत दोघांना ताब्यात घेण्यात आल्याचे समजते.
वक्फ बोर्ड जमीन गैरव्यवहारप्रकरणी अंमलबजावणी संचालनालय अर्थात 'ईडी'ने गुरुवारी राज्यात केलेल्या कारवाईनंतर पुणे, औरंगाबादमध्ये छापेमारी करण्यात आल्याचे समजते. येथे नाना पेठ परिसरात पोलिसांच्या वाहनांचा ताफा हजर झाला. साध्या वेशात आलेल्या अधिकार्यांनी एका घरावर छापेमारी केली. या कारवाईत काही कागदपत्रे व काही संगणक ताब्यात घेण्यात आल्याचे समजते.
दरम्यान, सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) महाराष्ट्र वक्फ बोर्डाच्या कार्यालयावर छापा मारला नाही, बोर्डाकडे नोंदणी असलेल्या संस्थेशी संबंधित जमीन प्रकरणातील गुन्ह्याच्या अनुषंगाने ते छापे आहेत, असा खुलासा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. बोर्डाकडे 30 हजार संस्थांची नोंदणी असून या सर्वांची ईडीने तपासणी करावी.
वक्फ बोर्डाची महाविकास आघाडी सरकारने साफसफाई चालवली आहे, त्याला ईडीने हातभार लावावा. वक्फचे व्यवहार नीट तपासले तर भाजपचेच नेते गोत्यात येतील, असे सूचक वक्तव्यही त्यांनी केले. केंद्रीय तपास यंत्रणांना घाबरत नसून, एनसीबीविरोधातील लढा सुरूच राहील, असे मलिकांनी स्पष्ट केले.
वक्फ बोर्डात ईडीचे स्वागत आहे. माझा विभाग ईडीला पूर्ण सहकार्य करेल. पण, ईडीने कुणाच्या तक्रारीवरून कारवाई सुरू केली, याची माहिती जनतेला द्यावी. नेत्यांना, राजकीय पक्षांना धमकावण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणा अंगावर सोडण्यात येत आहेत. महाराष्ट्रात असे राजकारण केव्हाच नव्हते.
भाजपने सर्व मर्यादा पार केल्या आहेत. पण आपण ईडीसह कोणत्याही केंद्रीय यंत्रणांना घाबरत नाही. मी अमली पदार्थ नियंत्रण विभाग (एनसीबी)कडून निरपराधांना तुरुंगात टाकण्याच्या कार्यपद्धतीवर यापुढेसुद्धा बोलत राहणार, याचा पुनरुच्चार नवाब मलिक यांनी केला.
औरंगाबाद/मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : मुंबई, पुणे आणि औरंगाबादेत गुरुवारी ईडीने छापे टाकले. औरंगाबादमध्ये पद्माकर मुळे ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज आणि बिल्डर जुगलकिशोर तापडिया यांच्या कार्यालय व घरात दिवसभर छापासत्र सुरू होते. औरंगाबादेतील छाप्यांचा थेट संबंध रामनगरच्या साखर कारखाना खरेदी-विक्रीशी जोडला जात आहे.
औरंगाबादेत पहाटेपासूनच 54 अधिकार्यांच्या पथकाने वेगवेगळ्या सात ठिकाणी छापे टाकले. रात्री उशिरापर्यंत याठिकाणी झाडाझडती सुरू होती. या कारवाईमुळे शहरातील इतर बिल्डर, उद्योजक आणि राजकीय नेत्यांमध्ये खळबळ उडाली. बिल्डर तापडिया यांचा निराला बाजार भागात बंगला आहे. तेथे एक महिला व पाच पुरुष अधिकार्यांच्या पथकाने तपासणी केली. रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती.
दुसरे 12 जणांचे पथक जुन्या मनमंदिर ट्रॅव्हल्स कार्यालयाच्या पाठीमागील कार्यालयात धडकले. त्यांनी पहिल्या मजल्यावरील तापडिया यांच्या कार्यालयात छापा मारून महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली. काही वेळ तेथे थांबलेले पथक नंतर याच इमारतीत दुसर्या मजल्यावरील पद्माकर मुळे ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजच्या कार्यालयात गेले. रात्री उशिरापर्यंत पथक तेथे झाडाझडती घेत होते.
माजी खासदार कै. बाळासाहेब पवार यांनी रामनगर येथील माळरानावर जालना सहकारी साखर कारखाना उभारला होता. बाळासाहेब पवार यांच्यानंतर हा कारखाना कर्जबाजारी झाला. राज्य सहकारी बँकेने हा कारखाना तापडिया कन्स्ट्रक्शन या कंपनीला विकला. त्यांनी साखर कारखाना चालू न करता 2016 मध्ये अर्जुन शुगर इंडस्ट्रीला विकला. यात मोठा आर्थिक भ्रष्टाचार झाला, अशी तक्रार ईडीला प्राप्त झाल्यामुळे हे छापे टाकण्यात आल्याचे सूत्रांकडून समजले.
परिणामी, शिवसेनेचे माजी मंत्री अर्जुन खोतकर यांचेही नाव या कारखाना व्यवहाराशी जोडले जात असून, तेदेखील ईडीच्या रडारवर येऊ शकतात.एकाच वेळी उद्योजक आणि राजकारण्यांवर ईडीचे छापे पडल्याने औरंगाबादच्या उद्योगजगतात एकच खळबळ उडाली. मात्र, यावर कुणीही जाहीर प्रतिक्रिया दिलेली नाही.