file photo 
Latest

पुणे : लाकडे कापण्याच्या कटरने नातवाने केले आजीचे तुकडे!

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा: मालमत्तेच्या हव्यासापोटी कोण काय करेल याचा काही नेम नाही. पुण्यात नातवाने आजीचा खून करून नंतर बाथरूममध्ये नेऊन लाकडे कापण्याच्या इलेक्ट्रिक कटरने तिच्या शरीराचे तुकडे करून ते नदीत फेकून दिल्याचा निर्दयी प्रकार समोर आला आहे. उषा विठ्ठल गायकवाड (वय 62, रा. म्हसोबानगर, केशवनगर, मुंढवा) असे खून झालेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे.
बाप- लेकांनी कट रचून हा खून केल्याचे पोलिस तपासात आढळून आले आहे. दरम्यान, लोणीकंद पोलिस ठाण्याच्या हद्दीत महिलेचा मिळून आलेला पाय व अपहरणाच्या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांनी या खुनाचा छडा लावला आहे.

याप्रकरणी साहिल ऊर्फ गुड्डू संदीप गायकवाड (वय 20), संदीप विठ्ठल गायकवाड (वय 42, राहणार दोघे म्हसोबानगर, केशवनगर, मुंढवा) या दोघा बाप-लेकाला मुंढवा पोलिसांनी अटक केली आहे. संदीप हा एका राजकीय पक्षाचा पदाधिकारी असल्याचे पोलिसांनी सांगितले. उषा गायकवाड या सरकारी सेवेतून निवृत्त झाल्या होत्या. त्यांना निवृत्तिवेतन मिळत होते. त्यांनी केशवनगर मुंढवा येथील म्हसोबानगर येथे जागा घेऊन घर बांधले आहे. निवृत्त झाल्यापासून त्या मुलगा, नातू व सुनेसोबत एकत्र राहत होत्या. त्यांनी मुलाला काही पैसे हातउसने दिले होते. त्यामुळे मालमत्तेच्या वादातून त्यांच्यात अनेकदा वाद होत होते.

त्यातून त्या साहिल व त्याचे वडील संदीप यांना घर सोडून जाण्यास सांगत असत. त्यामुळे साहिल हा नेहमीच आजीवर चिडून असायचा. त्यातूनच त्याने 5 ऑगस्ट रोजी उषा या घरात झोपल्या असताना, दुपारी एक ते सव्वाच्या सुमारास त्यांचा गळा दाबून खून केला. साहिल याने खून केल्यानंतर पोलिसांना गुंगारा देण्यासाठी उषा वापरत असलेला मोबाईल त्यांच्या काशेवाडी परिसरात ठेवून दिला. मंगळवार पेठेतून झाडे कापण्याचे इलेक्ट्रिक कटर घेऊन येऊन उषा यांच्या शरीराचे तुकडे केले.

यानंतर शांत डोक्याने ते तुकडे दुचाकी व चारचाकी गाडीतून पोत्यात भरून सुरुवातीला केशवनगर येथील जॅकवेल कचरा डेपोच्या बाजूला मुळा-मुठा नदीपात्रात तसेच थेऊर येथील नदीच्या पुलावरून वाहत्या पाण्यात टाकून दिले. त्यानंतर घरी येऊन काही झालेच नाही, अशा आविर्भावात इलेक्ट्रिक कटर व रक्ताने भरलेले कपडे मांजरी येथील नदीपात्रात टाकून दिले. या प्रकरणाचा तपास लावण्याची कामगिरी अपर पोलिस आयुक्त नामदेव चव्हाण, उपायुक्त नम—ता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक ब—ह्मानंद
नाईकवाडी, गुन्हे निरीक्षक प्रदीप काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अविनाश मराठे, संतोष जगताप, राजू कदम, महेश पाठक, वैभव मोरे, योगेश गायकवाड, नीलेश पालवे, दिनेश भांदुर्गे यांनी केली.

बेपत्ता महिलेची तक्रार अन् खुनाचा छडा
आईचा फोन लागत नसल्याने व ती घरी मिळून न आल्याने मुलगी शीतल कांबळे (वय 40) यांनी मुंढवा पोलिस ठाण्यात आईचे अपहरण झाल्याची तक्रार दिली होती. तसेच तिच्या जिवाचे बरेवाईट झाल्याची शंका व्यक्त केली होती. त्यानुसार पोलिसांनी तत्काळ तपासाची सूत्रे गतिमान करत नातू साहील व मुलगा संदीप या दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. तसेच साहीलची सख्खी व सावत्र आई अशा दोघींकडे चौकशी केली. त्या वेळी पोलिसांना सर्वांच्या बोलण्यात विसंगी आढळून आली.

पोलिसांनी प्रत्येक एका व्यक्तीकडे केलेल्या चौकशीत साहील याच्या दोन्ही आईंनी पोलिसांना खरे वास्तव कथन केले. त्यानुसार पोलिसांनी साहील व संदीप या दोघांना पोलिसी खाक्या दाखवला त्या वेळी साहील याने उषा यांच्या शरीराचे केलेले तुकडे व थेऊर येथील वाडेगाव मुळा-मुठा नदीच्या कडेला मिळून आलेला पाय याबाबत साम्य मिळून आले. तसेच डॉक्टरांनी दिलेला शवविच्छेदन अहवाल आणि डीएनए टेस्टचा रिपोर्ट सकारात्मक मिळून आला. त्यामुळे तो पाय उषा यांचाच असल्याची खात्री पोलिसांना झाली.

घरात रक्ताचे डाग अन् फिनेलचा वास
साहील याने आजीचा खून करून तुकडे केले तेव्हा घरात कोणी नव्हते. जेव्हा साहीलची आई घरी पोहचली तेव्हा तिने घरातील ते दृश्य पाहिले. घरातील फरशीवर ठिकठिकाणी रक्ताचे डाग पडलेले होते, तर बाथरूमध्येदेखील फिनेलचा उग्र वास येत होता. घरातील धान्य फरशीवर ओतलेले होते. त्या वेळी तिने साहील याला विचारले तेव्हा त्याने चिकनवाल्याला पोते हवे होते म्हणून दिल्याचे सांगितले.

क्राईम पेट्रोल आणि 'दृश्यम' चित्रपट पाहून काढला काटा

आरोपी साहील याने हे सर्व करण्यापूर्वी क्राईम पेट्रोल मालिका आणि 'दृश्यम' चित्रपट अनेकदा पाहिला असल्याचे पोलिसांनी सांगितले. उषा यांचा खून केल्यानंतर त्याने शांत डोक्याने त्यांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यापासून ते पोलिसांना गुंगारा देण्याचे काम केले. उषा यांचे वजन जास्त असल्यामुळे एकाच वेळी त्यांना मृतदेह बाहेर फेकणे असल्याचे साहील याच्या लक्षात होते. त्यासाठी त्याने इलेक्ट्रिक कटर विकत आणून मृतदेहाचे डोक्यापासून पायापर्यंत लहान-लहान तुकडे केले. त्यानंतर पोत्यात भरून वेगवेगळ्या ठिकाणी नदीच्या पाण्यात फेकून दिले.

पोलिसांना गुंगारा देण्यासाठी त्याने मुंढवा पोलिसात वडिलांना सोबत घेऊन आजी बेपत्ता झाल्याची तक्रारदेखील दिली. मात्र पोलिसांनी जेव्हा घरी जाऊन पाहिले तेव्हा उषा यांची चप्पल आणि काठी बाहेर मिळून आली. उषा यांना पायाचा आजार असल्याने चालता येत नव्हते. तेथूनच पोलिसांनी तपासाला गती दिली. पोलिस आपल्या घरच्या लोकांकडे चौकशी करतील म्हणून त्याने सुरुवातीपासूनच त्यांना पोलिसांना कशी उत्तरे द्यायची हे सांगितले होते.

मालमत्तेच्या वादातून नातू आणि मुलाने वृद्ध महिलेचा खून केल्याचे समोर आले आहे. त्यानुसार खुनाचा गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे. महिलेच्या मृतदेहाचे काही अवयव पोलिसांना मिळून आले होते. ते वृद्ध महिलेचेच असल्याचे समोर आले आहे. आरोपींनी अतिशय नियोजनपूर्वक कट रचून हा खून केला आहे.

                         ब्रम्हानंद नाईकवाडी, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, मुंढवा पोलिस ठाणे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT