देहूत इंद्रायणी काठ वारकरी, भाविकांच्या गर्दीने गजबजला Pexel
पिंपरी चिंचवड

Ashadhi Wari| ज्ञानोबा-तुकोबा नामात गोडवा वेगळा; रंगला आनंदसोहळा!

पुढारी वृत्तसेवा

प्रसाद जगताप

हाती पताका... डोईवर तुळशी वृंदावन... डोक्यावर पांढरी टोपी, अंगी पांढरी वस्त्रे, गळ्यात गमछा परिधान करून... सोबती वासुदेव साथ, हाती वीणा, टाळ, मृदुंग आणि मुखी ज्ञानोबा तुकाराम... चा जयघोष, अशा भक्तीमय वातावरणात जगद्‌गुरू श्री संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्याच्या निमित्ताने शुक्रवारी (दि. २८) देहूनगरी दुमदुमून गेली.

राज्यभरातून वारकरी, भाविक आपल्या शेतांमध्ये पेरण्या करून देहत दाखल झाले होते. त्यांची गर्दी येथे दिवसभर दिसली. अशा या वैष्णवांच्या गर्दीन इंद्रायणी काठ गजबजला, येथे वैष्णवांचा मेळाच भरल्याचे पहायला मिळाले, वारकऱ्यांच्या गर्दीसोबतच अनेक विक्रेत्यांकडून येथे विविध खेळणी, जीवनावश्यक वस्तू, फुगे, पायी वारीसाठी आवश्यक साहित्य विक्रीचे स्टॉल लावण्यात आले होते. त्या स्टॉलवर झालेल्या गर्दीमुळे देहूगावाला जत्रेचे स्वरूप आल्याचे पहायला मिळाले,

वारकऱ्यांची सेवा

  • देहूगावात आलेल्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी देहू गावातील नागरिक सरसावल्याचे पहायला मिळाले.

  • स्थानिक नागरिकांनी वारकऱ्यांसाठी जेवण,

  • अंघोळीसाठी पाणी आणि राहण्याची व्यवस्था केली

  • होती, तर येथील सामाजिक संस्था, गणेश मंडळे, विक्रेत्यांकडून ठिकठिकाणी स्टॉलद्वारे वारकऱ्यांच्या चहा, नाष्टा आणि पिण्याच्या पाणी वाटपाची व्यवस्था केली होती.

नेत्यांबरोबर कलाकारही रमले...

वारकरी भाविकांसह राजकीय नेते आणि मराठी मालिकेतील कलाकारांनी देखील हजेरी लावली. स्थानिक आमदार, खासदार पालखी सोहळ्यात दाखल झालेच होते. परंतु, मराठी मालिकांमध्ये काम करणाऱ्या कलाकारांनीही हजेरी लावली होती. स्वामी समर्थ मालिकेत स्वामी समर्थांचा अभिनय करणारे अक्षय मुदवडकर यांच्यासह बाळूमामा मालिकेतील छोट्या बाळूमामांची भूमिका करणारे समर्थ पाटील आणि मोठ्या बाळू‌मामांची भूमिका करणारे प्रकाश धोत्रे हेही उपस्थित होते.

पवित्र इंद्रायणीत अभ्यंगस्नान शुक्रवारची पहाट होताच, देहूत विसावलेल्या वारकरी भक्तांची पाऊले वर्षानुवर्षे वारकरी परंपरा जपत असलेल्या इंद्रायणीच्या दिशेने वळली. त्यांनी पालखी सोहळ्यातील पायी वारीला सुरुवात करण्यापूर्वी या इंद्रायणीच्या घाटावर अभ्यंगस्नान केले. दिवसभर या इंद्रायणीच्या घाटावर स्नान करणे, तोंड हात-पाय धुणे, आराम करण्यासाठी वारकऱ्यांची गर्दी दिसली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT