A bridge over Mula river connecting Bokkhel and Khadki
बोपखेल व खडकीस जोडणारा मुळा नदीवरील पूल पुढारी
पिंपरी चिंचवड

बोपखेल-खडकी पूल येत्या दोन महिन्यांत पूर्ण होणार

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी : बोपखेल व खडकीला जोडणार्‍या मुळा नदीवरील पुलाचे काम 98 टक्के पूर्ण झाले असून, उर्वरित काम येत्या दोन महिन्यांत पूर्ण होईल, असा दावा महापालिकेच्या अधिकार्‍यांनी केला आहे. त्यानंतर संरक्षण विभाग आणि वाहतूक पोलिसांची परवानगी घेऊन त्या पुलावरून वाहतूक रहदारी सुरू करण्यात येणार आहे.

या पुलासंदर्भात ‘पुढारी’ने सातत्याने वृत्त देऊन पाठपुरावा केला. एकूण 53 कोटी 53 लाख खर्चांच्या पुलाचे काम टीअ‍ॅण्डटी इन्फ्रा लि. या ठेकेदार कंपनीस 20 जुलै 2019 ला देण्यात आले. स्तुप कन्सल्टंट प्रा. लि. या कामाचे सल्लागार आहेत. कामाची मुदत 2 वर्षे होती. ती मुदत 19 जुलै 2021 ला संपली आहे. विविध कारणांमुळे या कामास विलंब झाल्याने 17 नोव्हेंबर 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

98 टक्के काम पूर्ण

न्यायालयीन प्रकिया, संरक्षण विभागाकडून एनओसी मिळण्यास विलंब, अतिउच्चदाब वाहक विद्युत तारा व टॉवर हटविण्यास झालेल्या विलंब आणि इतर कारणांमुळे या कामास विलंब झाल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले. टॉवर स्थलांतरित केल्यानंतर पुलाचे काम सुरू करण्यात आले आहे. आतापर्यंत 98 टक्के काम झाले आहे. ऑगस्ट 2024 पर्यंत काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. त्यानंतर हा पूल वाहतुकीस खुला करण्यात येणार आहे.

दरम्यान, पुलास जोडण्यास बोपखेल आणि खडकीच्या बाजूने अप्रोच रस्ता आहे. लष्कराच्या विविध आस्थापनांना पोहचरस्ता (अप्रोच रोड) बनविण्यात आला आहे. मिलिटरी वॉच टॉवर उभारण्यात आला आहे. स्टोअर रूम, दोन्ही बाजूने 3 मीटर उंचीची भिंत, पार्किंगची व्यवस्था, छोटे पूल, टॉयलेट ब्लॉक्स आदी सुविधा आहे.

नऊ वर्षांपासून बोपखेलचा नागरी मार्ग बंद

कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरींगने (सीएमई) 13 मे 2015 ला बोपखेल ते दापोडी हा नागरी रस्ता बंद केला. नागरिकांना नाईलाजास्तव दिघी, विश्रांतवाडी मार्गे पिंपरी-चिंचवड शहरात ये-जा करावी लागत आहे. त्यामुळे रहिवाशांची मोठी गैरसोय होत आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महापालिका नागरिकांसाठी बोपखेल ते खडकी असा मुळा नदीवर 1 हजार 866 मीटर म्हणजे सुमारे 2 किलोमीटर अंतराचा पूल बांधत आहे. न्यायालयीन प्रक्रिया, संरक्षण विभागाकडून जागा ताब्यात येण्यास विलंब आदी कारणांमुळे काम रखडले होते. बोपखेलच्या बाजूने काम पूर्ण झाल्यानंतर संरक्षण विभागाच्या खडकीकडील कामास 2 ऑक्टोबर 2021 ला परवानगी मिळाली. त्यानंतर काम सुरू करण्यात आले.

512 आर्मी बेस वर्कशॉप, अ‍ॅम्युनिशन फॅक्टरी तसेच, संरक्षण विभागाच्या इतर आस्थापनांच्या जवळून हा पूल जात असल्याने सुरक्षेसाठी पुलाच्या दोन्ही बाजूस पाच मीटर उंचीची सीमा भिंत उभारण्यात आली आहे. त्यावर 1.5 मीटर उंचीचे व्हीजन बॅरिकेट बसविण्यात येत आहेत. पुलाचे काम 90 टक्के पूर्ण झाले आहे. जागा ताब्यात घेणे, पुलाचे काम, टॉवर हटविणे, इतर कामे आदीसाठी तब्बल 100 कोटींचा खर्च महापालिकेने केला आहे. नदीपात्र, लष्कराचा रेल्वे मार्ग, वनक्षेत्र, रस्ता व विविध संरक्षण विभागाच्या भूखंडावरून पूल जातो. रस्त्यांची रुंदी 8 मीटर आहे. दोन लेनचा मार्ग आहे. पुलावर पादचार्‍यांसाठी पदपथ नाही. केवळ दुचाकी, तीन व चारचाकीसाठी वाहनांना पुलाचा वापर करता येणार आहे. पीएमपी बस वाहतूक येथून होणार नाही.

खडकी बाजारातून पिंपरी-चिंचवड व पुण्यास संपर्क साधता येणार

या पुलाचे काम पूर्णत्वाकडे आहे. त्यामुळे लवकरच वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. संरक्षण खात्याशी व वाहतूक पोलिस विभागाशी समन्वय साधून नियोजन कण्यात येत आहे. पुलामुळे नागरिकांना 2.9 किलोमीटर अंतरावर खडकी बाजार भागातून पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहराकडे ये-जा करणे सुलभ होणार आहे. त्यामुळे नागरिकांचा वेळ व इंधन खर्च वाचणार असून, पर्यावरणाचा समतोल राखता येईल, असे महापलिकेचे स्थापत्य प्रकल्प विभागाचे सहशहर अभियंता प्रमोद ओंभासे यांनी सांगितले.

SCROLL FOR NEXT