संग्रहित फोटो 
Latest

पावसामुळे मध्य व पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले

अमृता चौगुले

मुंबई : पुढारी वृत्तसेवा :  मुंबई शहर व उपनगरांत सोमवारी दुपारपासून पावसाने पुन्हा जोर पकडला आणि सलग दोन ते तीन तास पडलेल्या मुसळधार पावसामुळे मध्य व पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले.
किंग्ज सर्कल, हिंदमाता, सायन, वडाळा, चेंबूर आदी सखल भागात पाणी तुंबले. जोरदार पावसामुळे वाहनांचा वेगही मंदावला त्यामुळे सर्व उपनगरांत ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती. रेल्वे मार्गात पाणी तुंबण्याची भीती असल्यामुळे चाकरमानीही घराकडे लवकर निघाल्याने सीएसएमटी, चर्चगेट, दादर, स्टेशनवर मोठी गर्दी उसळली.

लोकलचा वेग मंदावला

संध्याकाळनंतर मुंबई, ठाणे, नवी मुंबईत पावसाचा जोर वाढल्याने लोकलचा वेग मंदावला. सीएसएमटी ते कल्याण, पनवेल आणि चर्चगेट ते विरार लोकलचे वेळापत्रक कोलमडले.त्यामुळे संध्याकाळी घरी जाण्यासाठी निघालेल्या प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. धुवाधार पावसामुळे दृश्यमानता कमी झाल्याने मध्य रेल्वेवरील लोकल चालवताना मोटरमनला अडचणी येऊ लागल्या. परिणामी लोकल वीस ते तीस मिनिटांपेक्षा अधिक वेळ विलंबाने धावू लागल्या. त्यातच कुर्ला ते विद्याविहार, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे, पनवेल ते कर्जत या पट्टयात काही प्रमाणात रुळावर पाणीही साचल्याने लोकलचा वेग कमी करण्यात आला. चर्चगेट ते विरार दरम्यानच्याही लोकल उशिराने धावू लागल्या. हार्बर आणि ठाणे ते वाशी, पनवेल ट्रान्स हार्बरवरील लोकलही उशिरानेे धावल्या.

पावसामुळे शहर भागात 2 ठिकाणी, पश्चिम उपनगरांत 7 ठिकाणी तर पूर्व उपनगरांत 5 ठिकाणी अशी 14 झाडे पडली. 5 ठिकाणी घरांची पडझड झाल्याचे वृत्त आहे. कुर्ला ( प.), संतोषी माता नगर, होमगार्ड कार्यालय येथे संरक्षक भिंत कोसळून 5 घरांचे नुकसान झाले. 5 ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या.

सुदैवाने या घटनांत कोणीही जखमी झाले नाही. सकाळी 8 ते सायंकाळी 6 या कालावधीत शहरात – 21 मिमी, पूर्व उपनगरांत – 17 मिमी तर पश्चिम उपनगरांत – 25 मिमी इतक्या पावसाची नोंद करण्यात आली आहे. वरळी, प्रभादेवी येथे 22 मिमी, परळ 20 मिमी, मुंबई सेंट्रल हाजीअली 19 मिमी, मलबार हिल 17 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे.

जुहू येथे बुडालेल्या दोघांपैकी एकाचा मृत्यू

जुहू कोळीवाडा पोलीस बीट चौकी जवळ रविवारी दोन जण समुद्रात बुडाले होते. त्यापैकी एकास बाहेर काढून पालिकेच्या कुपर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. या मुलाचे नाव प्रणय भोसले असून तो 19 वर्षाचा आहे. तर अन्य एकाचा गेल्या काही तासापासून शोध सुरू होता. अखेर सोमावारी 35 वर्षाच्या आशिष या तरुणाला समुद्रातून बाहेर काढण्यात आले. त्याला तातडीने कूपर हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले असता, डॉक्टरांनी मृत घोषित केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT