सांगली ः शासकीय विश्रामगृह येथे नळपाणी पुरवठा योजनांबाबत आढावा बैठकीत बोलताना पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील.  
Latest

पाणी योजना सौर ऊर्जेवर चालवा : मंत्री गुलाबराव पाटील

अमृता चौगुले

सांगली; पुढारी वृत्तसेवा : पाणीपुरवठा योजनांची विद्युत बिले वेळेत न भरल्याने अनेक योजना बंद पडल्या आहेत. त्यामुळे छोट्या गावांत जिथे जागा उपलब्ध असेल तिथे नळ पाणी पुरवठा योजना सौर ऊर्जेवर चालवा. त्यासाठी आवश्यक प्रस्ताव तातडीने तयार करा, असे आदेश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.

जिल्ह्यातील नळपाणी पुरवठा योजनांबाबत येथील शासकीय विश्रामगृहामध्ये पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार अनिल बाबर, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार, प्रकल्प संचालक जल जीवन मिशन तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणीपुरवठा व स्वच्छता) विजयसिंह जाधव, ग्रामीण पाणीपुरवठा योजनेचे कार्यकारी अभियंता एस. एम. कदम, उपकार्यकारी अभियंता बी. जे. सोनवणे उपस्थित होते.

मंत्री पाटील म्हणाले, सांगली जिल्ह्यात जलजीवन मिशनअंतर्गत एकूण 706 योजनांचे परिपूर्ण प्रकल्प आराखडे तयार करण्यात आले आहेत. यातील 586 योजनांच्या कामांना तांत्रिक तर 485 कामांना प्रशासकीय मान्यता देऊन निविदा जाहीर करण्यात आल्या आहेत. 356 कामांना कार्यादेश देण्यात आले आहेत. यातील 314 कामे सुरू आहेत. तर 42 कामे पूर्ण झाली आहेत. जिल्ह्यात जलजीवन मिशनअंतर्गत काम चांगले असले तरी या कामांवर झालेला खर्च तुलनेने कमी दिसत आहे. कामांच्या निधी उपलब्धतेत केंद्राचा वाटा 50 टक्के, राज्याचा वाटा 50 टक्के व लोकवर्गणी 10 टक्के आहे. ही योजना 2024 पर्यंत राबविण्यात येणार आहे. त्यामुळे वेळेत कामे पूर्ण होणे आवश्यक आहे. त्यासाठी यंत्रणांनी दर आठवड्याला कामांच्या प्रगतीचा आढावा घ्या.

मंत्री पाटील म्हणाले, योजनेच्या कामातील गैरव्यवहार खपवून घेतला जाणार नाही. अधिकार्‍यांनी योजनतील आपली कामे मुदतीत पूर्ण करावीत. ज्या कंत्राटधारांचा पूर्वानुभव चांगला नाही, त्यांना कामे देऊ नयेत. जे कंत्राटदार कामे मुदतीत व गुणवत्तापूर्ण करू शकतील, त्यांनाच कामे द्यावीत.

ते म्हणाले, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडील 26 योजना प्रस्तावित आहेत. यातील 6 योजनांचे कार्यादेश दिले आहेत. या सर्वच्या सर्व योजनांची कामेही गतीने सुरू करा. दि. 30 जूनपर्यंत प्रस्तावित नळपाणी पुरवठा योजनांचे कार्यादेश निर्गमित करण्याचे विभागाचे धोरण आहे. त्यामुळे यंत्रणांनी तातडीने आराखडे सादर करावेत. तसेच पाणी हा विषय संवेदनशील असल्याने पाणीपुरवठ्याविषयी निवेदन घेऊन येणार्‍या नागरिकांशी अधिकार्‍यांनी सौजन्यपूर्ण वर्तन ठेवा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT