नवी दिल्ली ; वृत्तसंस्था : आशिया चषक काही दिवसांवर येऊन ठेपला असताना पाकिस्तानच्या संघाला आता एक मोठा धक्का बसला असून, त्यांच्या टीममध्ये तारांबळ उडाली आहे. कारण, आशिया चषकापूर्वीच पाकिस्तानचा महत्त्वाचा मॅचविनर खेळाडू वेगवान गोलंदाज शाहिन आफ्रिदी हा संघाबाहेर झालेला आहे. पाकिस्तान संघ सोमवारी आशिया चषकासाठी रवाना होणार आहे. त्यामुळे आफ्रिदी आता आशिया चषकात खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
आफ्रिदीला गंभीर दुखापत झाल्याचे समोर आले आहे. गॉल येथे श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत क्षेत्ररक्षण करताना शाहिनच्या उजव्या गुडघ्याला दुखापत झाली होती. त्यानंतर शाहिनची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. त्यानुसार आफ्रिदीला आता 4 ते 6 आठवड्यांची विश्रांती देण्यात आलेली आहे.
शाहिन आफ्रिदी आता फक्त आशिया चषकाला मुकणार नाही, तर त्याला इंग्लंडविरुद्धच्या महत्त्वाच्या मालिकेतही खेळता येणार नाही. साधारणत:, दीड महिन्यानंतर आफ्रिदीची फिटनेस टेस्ट घेण्यात येईल आणि त्यामध्ये जर तो पास झाला; तरच त्याला संघात स्थान देण्यात येणार आहे. त्यामुळे आफ्रिदी आता थेट ऑक्टोबरमध्ये मैदानात परतू शकतो; असे म्हटले जात आहे.आफ्रिदी कदाचित थेट टी-20 विश्वचषकात आपल्याला खेळताना दिसू शकतो.
विश्वचषक ही सर्वांसाठीच महत्त्वाची स्पर्धा आहे. या स्पर्धेसाठी संघात पुनरागमन करण्यास आफ्रिदी उत्सुक असेल. त्यामुळे आता आफ्रिदीच्या दुखापतीवर कसे उपचार होतात, तो या उपचारांना कसा प्रतिसाद देतो आणि तो फिट होऊन कधी मैदानात परततो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.
'पीसीबी'चे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नजीबुल्लाह सुमरो यांनी आफ्रिदीबाबत सांगितले की, मी शाहिनशी बोललो आहे आणि तो या दुखापतीमुळे अस्वस्थ आहे. परंतु, तो एक धाडसी तरुण आहे आणि आतापर्यंत त्याने देशासाठी नेत्रदीपक कामगिरी केली आहे. त्यामुळे तो लवकरच या दुखापतीमधून बरा होईल आणि संघात पुनरागमन करेल, असा मला विश्वास आहे.