इस्लामपूर; पुढारी वृत्तसेवा : सत्ता, पदे ही स्वतःची घरे, तिजोरी भरण्यासाठी, वसुली करण्यासाठी नसतात, सामान्य नागरिकांच्या हितासाठी असतात. यापुढे आपण सर्वांनी एकत्र राहून पक्षासाठी, समाजासाठी काम करायचे आहे. या बळावरच पश्चिम महाराष्ट्रात भाजपचे वर्चस्व आणखी वाढवू, असा विश्वास विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पेठनाका येथे बोलताना व्यक्त केला.
नानासाहेब महाडिक शैक्षणिक संकुलानजीकच्या इंदिरा पॅलेस हॉलमध्ये झालेल्या भाजपच्या जाहीर मेळाव्यात ते बोलत होते. प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते आ. प्रवीण दरेकर, खासदार संजय पाटील, माजी खा. धनंजय महाडिक, आ. सुधीर गाडगीळ, आ. सुरेश खाडे, आ. विनय कोरे, आ. सदाभाऊ खोत, आ. गोपीचंद पडळकर, आ. शिवेंद्रराजे भोसले, आ. प्रसाद लाड, जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष राहुल महाडिक, कार्यसमिती सदस्य सम्राट महाडिक, मिनाक्षीताई महाडिक, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सत्यजित देशमुख, डॉ. अतुल भोसले, युवा मोर्चाचे सचिव जयराज पाटील, संंग्राम देशमुख, निशिकांत पाटील आदी प्रमुख उपस्थित होते.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, निवडणूक जिंकलो काय, हरलो काय, एका पराभवाने खचून जायचे नसते. जो समाजासाठी काम करतो, त्याला यश निश्चित मिळते. सम्राट महाडिक यांनी शिराळा मतदारसंघात विधानसभेला 50 हजार मते मिळविली. पुढील निवडणुकीत याच मतदारसंघात नव्हे तर शेजारील मतदारसंघातही भाजपचा उमेदवार केवळ विकासकामांच्या जोरावर विजयी होईल. येथे भाजपला रोखणे आता अशक्य आहे. सांगली जिल्ह्यामध्ये भाजपचे वर्चस्व आहेच, ते आणखी वाढवायचे आहे.
प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले, राज्याने स्व. वसंतदादा पाटील आणि स्व. राजारामबापू पाटील यांचा संघर्ष पहिला आहे. त्यानंतर स्व. छगनबापू व स्व. राजारामबापूंचाही संघर्ष पाहिला. या संघर्षावेळी स्व. नानासाहेब महाडिक हे छगनबापूंच्या कुटुंबासोबत ठामपणे राहिले. देवेंद्र फडणवीस हे सम्राट महाडिक यांना संधी देवून स्व. नानांचे हे स्वप्न नक्कीच पूर्ण करतील.
पाटील म्हणाले, 2019 च्या विधानसभा निवडणुकीत आम्ही या मतदारसंघात जास्त लक्ष घालू शकलो नाही. नाहीतर सम्राट महाडिक यांची समजूत काढली असती आणि येथे भाजपचा उमेदवार विजयी झाला असता. भाजपच्या अजून पंधरा जागा आल्या असत्या तर भाजपची सत्ता आली असती. सांगली, सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यात महाडिक गटाचे वर्चस्व आहे. त्यामुळे भविष्यात राज्यात भाजपची सत्ता येण्यासाठी महाडिक गटाची नक्कीच मदत होईल.
सम्राट महाडिक म्हणाले, 2014 च्या विधानसभा निवडणुकीत शिवाजीराव नाईक यांनी नानासाहेब महाडिक यांना विनंती केल्याने मी उमेदवारी मागे घेतली. त्यावेळी त्यांनी पुढील निवडणुकीत महाडिक गटाला सहकार्य करण्याचे आश्वासन दिले होते. त्यांनी ते पाळले नाही. माझी उमेदवारी कोणाला पाडण्यासाठी नव्हे तर आमचा गट राखण्यासाठी होती. सत्ता असताना अनेकजण पक्ष प्रवेश करतात. आम्ही मात्र भाजपची सत्ता नसताना पक्षप्रवेश केला आहे. पक्षाने आम्हाला मानसन्मानाबरोबरच भरभरून दिले आहे. भविष्यात शिराळा नव्हे तर इस्लामपूर मतदारसंघातही भाजपचा उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करू, असेही ते म्हणाले. माजी आ. भगवानराव साळुंखे यांनी मनोगत व्यक्त केले.
भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष राहुल महाडिक यांनी प्रास्ताविक केले.प्रा. महेश जोशी यांनी आभार मानले. आ. प्रकाश आवाडे, विलासराव जगताप, मकरंद देशपांडे, निता केळकर, विक्रम पाटील, सागर खोत, दिनकर पाटील, प्राजक्ता कोरे, नरेंद्र पाटील, विक्रम पावसकर, समित कदम आदी उपस्थित होते.
…म्हणून शिवाजीराव नाईक राष्ट्रवादीत गेले!
शिराळा मतदारसंघात महाडिक गटाचे वाढत असलेले वर्चस्व पाहून, भविष्यात काय घडणार याची चाहुल लागल्यानेच आमचे मित्र शिवाजीराव नाईक हे राष्ट्रवादीत गेले. भाजपचे या परिसरातील वर्चस्व वाढल्याने शिराळ्याबरोबरच बाजूचा मतदार संघदेखील भाजपकडे येईल, असे सूतोवाचही फडणवीस यांनी यावेळी केले.
…तो ग्लास मला चालत नाही
दूध डेअरीच्या उद्घाटनावेळी सम्राट महाडिक यांनी फडणवीस यांना फ्लेवर्ड मिल्कचा ग्लास दिला होता. त्याचा संदर्भ घेत फडणवीस म्हणाले, दूध डेअरीच्या उद्घाटनानंतर सम्राट आपण मला फ्लेवर्ड मिल्कचा ग्लास दिला. आता एखादी डिस्टिलरी उभारून त्याचा ग्लास मला देऊ नका, तो मला चालत नाही, असे म्हणताच उपस्थितातून हशा पिकला.