Latest

पर्सिव्हरन्स रोव्हरने मंगळावर दुसर्‍यांदा केले ड्रील

Arun Patil

वॉशिंग्टन : 'नासा'च्या पर्सिव्हरन्स रोव्हर ने आता मंगळभूमीवरील खडक आणि मातीचे नमुने घेण्यास सुरुवात केली आहे. ऑगस्टमध्ये या रोव्हरने मंगळाच्या जमिनीत ड्रील करून तेथील मातीचे नमुने घेतले होते. आता या रोव्हरने दुसर्‍यांदा ड्रील केले आहे. यावेळी हे ड्रील जमिनीत नव्हे तर एका खडकात केले आहे.

नव्या छायाचित्रांमधून पर्सिव्हरन्स रोव्हर ची ही कामगिरी दिसून येत आहे. या रोव्हरने एका सपाट दगडावर छिद्र पाडले आहे. या दगडाला संशोधकांनी 'रोशेट' असे नाव दिले आहे.

गेल्या महिन्यात पर्सिव्हरन्सने दगडात ड्रील केले होते; पण त्याचा ठोस भाग गोळा करता आला नव्हता. या दगडाचा भुगा पडला होता व त्यामुळे त्याचा कठीण भाग घेण्यात यश आले नव्हते. आताही तसेच घडले आहे की खडकाचा कठीण, ठोस भाग ड्रील करून उचलण्यात रोव्हरला यश आले आहे हे पाहिले जात आहे.

जर यावेळी पर्सिव्हरन्सला यश आले असेल तर हा खडक पृथ्वीवर येणारा मंगळभूमीवरील पहिलाच खडक ठरू शकेल. पुढील वर्षभराच्या काळात दोन डझनपेक्षाही अधिक खडकांचे नमुने या रोव्हरकडून गोळा केले जाणार आहेत. दशकभरानंतर हे सर्व नमुने अमेरिका आणि युरोपियन देशांच्या प्रयत्नाने पृथ्वीवर आणले जातील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT