Latest

पर्सिव्हरन्स रोव्हर मंगळावर घेणार जीवसृष्टीचा शोध

Arun Patil

वॉशिंग्टन : 'नासा'चे पर्सिव्हरन्स रोव्हर 18 फेब्रुवारी 2021 मध्ये मंगळ ग्रहावर उतरले होते. 45 किलोमीटरच्या परिघातील जेझेरो क्रेटरमध्ये हे रोव्हर लँड झाले त्या घटनेला आता एक वर्ष पूर्ण झाले आहे. आता हे रोव्हर आपल्या सर्वात महत्त्वाच्या मिशनवर पुढे जात आहे. हे मिशन मंगळावर जीवसृष्टीचे पुरावे शोधण्याचे आहे. 'नासा'ने म्हटले आहे की ज्या क्रेटरमध्ये हे रोव्हर लँड झाले होते त्याच्याजवळच एखाद्या सरोवरासारखा दिसणारा मोठा खड्डा आहे. या जागेकडे जाण्यासाठी सहा चाकांच्या या रोव्हरने चढण चढण्यास सुरुवात केली आहे.

या ठिकाणी जाऊन हे रोव्हर तेथील मातीचे नमुने गोळा करील. ज्याठिकाणी पाणी असते तिथे जीवनही असते असे म्हटले जाते. त्यामुळे एके काळी याठिकाणी पाणी होते तर तिथे सूक्ष्म जीवांच्या स्वरूपात का होईना जीवसृष्टीचे अस्तित्व असू शकते असे संशोधकांना वाटते. अशा सूक्ष्म जीवांचे पुरावे तेथील मातीच्या नमुन्यांमधून गोळा केले जातील.

या रोव्हरमध्ये सॅम्पल गोळा करण्याच्या ट्यूबची संख्या मर्यादित आहे. त्यामुळे रोव्हरला काही निवडक ठिकाणांमधूनच सॅम्पल गोळा करायचे आहेत. या सरोवराच्या पात्रातून रोव्हर काही खडकही गोळा करून बेसवर ठेवील जेणेकरून नंतर ते पृथ्वीवर पाठवले जातील.

2030 पर्यंत हे नमुने पृथ्वीवर पाठवण्याचे लक्ष्य आहे. या प्रोजेक्टच्या संशोधिका डॉ. केटी स्टॅक मॉर्गन यांनी सांगितले की डेल्टा जेझेरो क्रेटरमध्ये हे रोव्हरचे 'अ‍ॅस्ट्रो बायोलॉजिकल टार्गेट' आहे. जर मंगळावर कधी काळी जीवसृष्टी असेल तर तेथील दगड-मातीतून त्याचे पुरावे सापडू शकतात. तसेच मंगळावरील वातावरण कसे बदलत गेले याची माहितीही यामधून मिळू शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT