Latest

ग्रंथ परिचय : परमार्थ साधनेतील उत्कृष्ट ग्रंथ

backup backup
  • ह. भ. प. हिंदुराव भोईटे

काळाच्या ओघात काही चांगले बदल समाजामध्ये घडून येताना दिसत आहेत. त्यातील एक म्हणजे परमार्थाकडे वळलेला मध्यम वर्ग आणि तरुणाई. हा वर्ग पायी वारीमध्ये लक्षणीय स्वरूपात सामील होत आहे. या सर्वांमध्ये तसेच पिढ्यान् पिढ्या 'ज्ञानेश्वरी', 'तुकाराम गाथा', 'भागवत' यांची पारायणे करणार्‍यांमध्ये संत वाङ्मयाबद्दल आस्था आहे, श्रद्धा आहे. परंतु नुसती श्रद्धा असून चालत नाही, तर त्यासाठी एक 'शास्त्रद़ृष्टी' तयार व्हावी लागते. या शास्त्रद़ृष्टीने संत वाङ्मयाचा अभ्यास केला, तर ते ग्रंथ आपणाशी बोलू लागतात.

सर्वसामान्यांना अशी शास्त्रीयद़ृष्टी प्राप्त करून देण्यासाठी प्रकरण ग्रंथांची रचना केलेली आहे. त्यात वारकरी संप्रदायाने विशेषकरून अभ्यासाकरिता घेतलेले ग्रंथ म्हणजे 'विचार सागर' आणि 'पंचदशी.' यातील 'विचार सागर' या मूळ संस्कृत ग्रंथाची रचना हरियाणामधील साधू श्री निश्चलदासजी यांनी केली आहे. वेदांतरूपी सागर सात तरंगांमध्ये समजावून देताना निश्चलदासजींनी उत्तम, मध्यम आणि मंद असे तीनही साधक डोळ्यासमोर ठेवले आहेत. पहिल्या तरंगामध्ये ग्रंथामध्ये प्रवेश होण्यासाठी ग्रंथाचा अधिकारी, विषय, प्रयोजन (ग्रंथ वाचनाचे फलित) आणि संबंध याचे वर्णन केले आहे. दुसर्‍या तरंगात याचाच अधिक विस्तार करून साधकाच्या सर्व शंकांचे निरसन केले आहे. वास्तविक पाहता, हे दोन तरंग म्हणजे या ग्रंथाचा पायाच होत. तिसर्‍या तरंगामध्ये सर्वांच्या जिव्हाळ्याच्या आणि कुतूहल असणार्‍या विषयाची म्हणजेच परमार्थाचा शिष्य कसा असावा व उपदेश करणारे श्रीगुरू कसे असावेत, याची शास्त्रशुद्ध मांडणी केली आहे.

चवथा, पाचवा आणि सहावा हे तरंग अनुक्रमे उत्तम, मध्यम आणि मंद साधकांसाठी असून; सातव्या तरंगामध्ये सर्व शास्त्रांचा समावेश केला आहे. लहान-मोठ्या अशा एकूण तीनशेपेक्षा जास्त प्रश्नांचा ऊहापोह केलेल्या या ग्रंथाचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे यातील तक्ते. यात पंचकोश, पंचमहाभूते व त्यांचे पंचीकरण, विविध ख्याती, ज्ञानाचे वर्गीकरण, समाधीचे प्रकार, सहा शास्त्रे, अनेक उपयुक्त तक्ते सर्वसामान्यांना लक्षात राहतील अशा भाषेत आणि सोप्या सुटसुटीत प्रकारे दिले आहेत.

हा ग्रंथ प्रथमतः मराठीमध्ये श्री हरभरे शास्त्री व त्यानंतर श्रीगुरू विनायक नारायण जोशी उपाख्य साखरे महाराज यांनी भाषांतरीत केला. याच ग्रंथाचे गुरुमुखाने श्रवण करून त्यांचेच शिष्य ह. भ. प. रामचंद्र तुकाराम यादव महाराज यांनी या ग्रंथाचा योग्य ठिकाणी संतवचनांची रेलचेल करून अधिक विस्तार केला आहे. अत्यंत सोपी भाषा हेही या ग्रंथाचे वैशिष्ट्य आहे. मागील दोन वर्षे करोना महामारीमुळे हा ग्रंथ उपलब्ध होत नव्हता. परंतु यंदाचे वर्षी हा ग्रंथ परत एकदा साधकांना उपलब्ध झाला आहे. नूतन आवृत्तीचे प्रकाशन नुकतेच शिवगड-मुरगूड येथे प. पू. डॉ. श्रीकृष्ण देशमुख महाराज यांचे हस्ते झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT