मुंबई; पुढारी वृत्तसेवा : बर्मिंगहॅम येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत वेटलिफ्टिंग स्पर्धेत रौप्य पदक मिळविल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगलीचा खेळाडू संकेत सरगरचे अभिनंदन केले. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा2022 मध्ये सहभागी झालेल्या भारतीय पथकाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा आणि माहिती आणि प्रसारणमंत्री अनुरागसिंह ठाकूर आणि युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री निशिथ प्रामाणिक या सोहळ्याला उपस्थित होते. देशातल्या नवीन प्रतिभांचा शोध घेऊन त्यांना व्यासपीठ मिळवून देण्याचे आपले प्रयत्न असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. जागतिक स्तरावर सर्वोत्कृष्ट, सर्वसामावेशक, वैविध्यपूर्ण आणि गतिमान क्रीडा क्षेत्राची परिसंस्था निर्माण करणे ही आपली जबाबदारी आहे.
कुठलीही प्रतिभा मागे राहू नये, यावर पंतप्रधानांनी जोर दिला. खेळाडूंच्या याशामागे असलेल्या क्रीडा प्रशिक्षक, क्रीडा प्रशासक आणि अन्य सहकारी कर्मचारी यांच्या भूमिकेचा देखील पंतप्रधानांनी विशेष उल्लेख केला.