मुंबई; पुढारी डेस्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवार दि. १९ जानेवारी रोजी मुंबई दौऱ्यावर येत असून ते यावेळी सुमारे ३८,८०० कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील. यामध्ये प्रामुख्याने मेट्रो ७ आणि मेट्रो २ अ या मार्गिकांचे लोकार्पण तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या पुनर्विकासाची पायाभरणीही करणार आहेत.
२०१५ मध्ये मेट्रोच्या मार्गिकांची पायाभरणीदेखील पंतप्रधानांनी केली होती. दरम्यान वांद्रे-कुर्ला संकुलात मोदी यांची जाहीर सभा होणार आहे. पंतप्रधान मुंबई १ मोबाईल अॅप आणि नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (मुंबई १) चा प्रारंभ करतील. पंतप्रधान सुमारे १७, २०० कोटी रुपये खर्च करून बांधल्या जाणाऱ्या सात सांडपाणी प्रक्रिया केंद्रांची पायाभरणी करतील. मालाड, भांडुप, वर्सोवा, घाटकोपर, वांद्रे, धारावी आणि वरळी येथे ही सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारली जाणार आहेत. त्यांची एकत्रित क्षमता सुमारे २, ४६० एमएलडी इतकी असेल.
मुंबईतील आरोग्य सेवेच्या पायाभूत सुविधा मजबूत करण्याचा प्रयत्न म्हणून पंतप्रधान २० 'हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब 'ठाकरे आपला दवाखाना'चे उद्घाटन करतील. ३६० खाटांचे भांडुप मल्टीस्पेशालिटी सरकारी रुग्णालय, गोरेगाव (पश्चिम) येथील ३०६ खाटांचे सिद्धार्थ नगर रुग्णालय, आणि १५२ खाटांचे ओशिवरा मॅटर्निटी होम, या मुंबईमधील तीन रुग्णालयांच्या पुनर्विकासाची पायाभरणीही पंतप्रधान करणार आहेत. पंतप्रधान मुंबईतील सुमारे ४०० किमी लांबीच्या रस्त्यांचा काँक्रिटीकरण प्रकल्पाचा शुभारंभ करतील.
पंतप्रधान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या पुनर्विकासाची पायाभरणीही करणार आहेत. टर्मिनसच्या दक्षिणेकडील हेरिटेज नोडच्या (वारसा स्थळी) ठिकाणी होणारी गर्दी कमी करणे, सुविधा वाढवणे आणि या जगप्रसिद्ध प्रतिष्ठित संरचनेचे भूतकाळातील वैभव जतन आणि संवर्धन करणे या उद्देशाने ही पुनर्विकासाची योजना आखण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी १,८०० कोटी रुपयांहून जास्त खर्च अपेक्षित आहे. त्यानंतर प्रधानमंत्री पीएम स्वनिधी योजनेच्या एक लाखापेक्षा जास्त लाभार्थ्यांना मंजूर झालेल्या कर्जांच्या हस्तांतरणाचा प्रारंभ करतील.