नवी दिल्ली ; वृत्तसंस्था : वय कोणतेही असो, जिद्द आणि इच्छाशक्ती प्रबळ असल्यावर काहीही साध्य करता येते हे एका 63 वर्षीय छोटेलाल अहिरवार या वृद्धाने साध्य करून दाखविले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्याच्या त्यांच्या तीव्र इच्छेने त्यांनी सुमारे 22 दिवसांचा प्रवास करत 700 कि.मी. अंतर पायी पार करत पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली.
भाजपचा कार्यकर्ते असलेले छोटेलाल हे मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातील आहेत. पंतप्रधान मोदी यांना भेटण्यासाठी त्यांनी मध्य प्रदेश ते दिल्ली असा 700 कि.मी. पायी प्रवास केला. अनुसूचित जातीमधील लोकांना होणारा त्रास आणि बेरोजगारीचा मुद्दा मोदींची भेट घेतल्यानंतर त्यांनी उपस्थित केला. छोटेलाल यांनी या वेळी पंतप्रधान मोदी यांच्या मागण्यांचे एक पत्रच दिले. आपल्या भागात जास्तीत जास्त रोजगार निर्मिती करण्याचा आग्रह पंतप्रधानांकडे त्यांनी केला.
छोटेलाल यांनी 22 दिवस पायी प्रवास केला. देवरी येथून प्रवास सुरू केल्यानंतर 11 ऑक्टोबरला ते राजधानी दिल्लीत दाखल झाले. पंतप्रधानांची भेट झाल्यानंतर ते खूपच लोकप्रिय झाले असून मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान, भाजपचे केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल यांच्या भाजपमधील अन्य नेत्यांच्या चर्चेचा विषय छोटेलाल ठरले आहेत. 14 ऑक्टाबेरला पंतप्रधान मोदीं यांची भेट घेतल्यानंतर छोटेलाल दुसर्या दिवशी रेल्वेने सागरला परतले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला आनंदाने मिठी मारली. सरकारने गरिबांसाठी सुरू केलेल्या योजनांची माहिती त्यांना यावेळी दिली. भेटण्यासाठी पायी येण्याची काय गरज होती, असे पंतप्रधान मोदी विचारल्यानंतर पायी आलो नसतो तर कदाचित आपली भेट झाली नसती, असे छोटेलाल यांनी सांगितले. छोटेलाल यांनी यावेळी भाजपचा झेंड्याच्या रंगाचे कपडे घातले होते.