अभय जगताप : संत एकनाथ महाराजांनी श्रीक्षेत्र पैठणला जलसमाधी घेतली. हीच त्यांची जन्मभूमी, कर्मभूमी व समाधीभूमी. गावातील मंदिर आणि गावाबाहेर नदीकाठचे समाधी मंदिर हे त्यांचे राहते घर. गावातील मंदिरांत महाराजांच्या नित्य पूजेतील 'विजयी पांडुरंग' व स्वतः देवाने त्यांच्या घरी ज्या रांजणात पाणी भरले तो रांजण आहे. नाथ महाराजांचे चिरंजीव हरिपंडित रुसून काशीला निघून गेले तेव्हा हरीपंडितांच्या मुलांपैकी सर्वांत धाकटे राघोबा महाराज आजोबांबरोबर पैठणला राहिले. त्यांनी नाथांचा वारसा पुढे चालवला. वारी पुढे चालवली. या घराण्यातील जानकीबाईंनी नाथांच्या पादुका पालखीतून नेण्याची प्रथा सुरू करून सोहळ्याचे वैभव वाढवले. तेव्हापासून नाथवंशजांच्या या शाखेस पालखीवाले असे उपनाम पडले.
पालखी प्रस्थान ज्येष्ठ वद्य सप्तमीला होते. या सोहळ्याचे निमंत्रण अर्थात अक्षदा ज्येष्ठ शुद्ध एकादशीला दिली जाते. पालखीवाले गोसावी मंडळी देवांना व मानकर्यांना अक्षदा देतात. वद्यपंचमी दिवशी 'विजयी पांडुरंग'ला व एकनाथ महाराजांच्या पादुकांना विशेष अभिषेक पूजा केली जाते. नाथमंदिरात प्रस्थानाचा कार्यक्रम होतो. यावेळी पंढरीच्या वारीचे वर्णन करणारे अभंग म्हटले जातात. त्यानंतर पादुका महाद्वारात ठेवलेल्या पालखीत ठेवल्या जातात. नाथवंशज घरातील स्त्रियांकडून देवाला औक्षण केले जाते. मानकर्यांना नारळ प्रसाद दिल्यानंतर पालखी निघते. पहिला विसावा गावाबाहेरील समाधी मंदिरात होतो.
भोजनानंतर पालखी गावातील पालखी कट्ट्यावर विसावते. भाविक पालखीचे दर्शन घेतात व पालखीला निरोप देतात. रोज काकडा व नित्यपूजा होते. पालखी मुक्कामी 'शरण शरण एकनाथा' हा अभंग म्हणून नाथांची आरती म्हटली जाते. मुक्कामाच्या ठिकाणी रात्री पादुकांची पूजा होते. त्यानंतर कीर्तन व जागर होतो. पैठण, चनकवाडी, हादगाव, लाडजळगाव, कुंडलपारगाव, मुंगसवाडे, राक्षसभुवन, रायमोह, पाटोदा, दिघोळ, खर्डा, दांडेगाव, अनाळे, परांडा, बिटरगाव, कुर्डू, अरण, करकंब, होळे, शिरढोणमार्गे पालखी दशमीला पंढरपूरला पोहोचते. वाटेत पाच रिंगण होतात.
होळेजवळ 'श्रीं'चे भीमा स्नान होते. हाटकरवाडीजवळ पालखीमार्ग डोंगरातून जातो. रस्ता खराब असल्याने तेथील ग्रामस्थ पालखी खांद्यावरून वाहून नेतात. डोंगरावर आल्यावर त्यांना नाथवंशजांकडून प्रसाद दिला जातो. षष्ठीदिवशी पालखी अरण येथे संत सावता महाराज समाधी मंदिरात मुक्कामी असते. रात्री हजेरीची कीर्तने होतात. सर्वांत शेवटी मालकांचे म्हणजे पालखीवाले गोसावी मंडळींचे कीर्तन होते. शेवटचे गोल रिंगण कव्हे येथे झाल्यावर भारूड होते.
दशमीदिवशी सोहळा पंढरपुरात प्रवेश करतो. नाथ मंदिरात पालखीचा मुक्काम असतो. एकादशीला चंद्रभागा स्नान व नगरप्रदक्षिणा होते. चतुर्दशीला नाथ महाराजांचे पणजोबा संत भानुदास महाराजांची पुण्यतिथी असते. यानिमित्त नाथ मंदिरातून दिंडी निघते. विठ्ठल मंदिरात जाऊन भानुदास महाराजांच्या समाधीची पूजा व नैवेद्य होतो. पौर्णिमेला सर्व पालखी सोहळे गोपाळपूरला काला करण्यासाठी जातात. नाथ महाराजांच्या पालखीचा काला मात्र विठ्ठल मंदिरात होतो. पौर्णिमेला सकाळी साडेसहा वाजता दिंडी विठ्ठल मंदिरात येते. येथे लाकडी सभामंडपात नाथांच्या पालखीचा काला व देवभेट होते. पौर्णिमेला पालखीचा परतीचा प्रवास सुरू होतो. बारा दिवस प्रवास करून वद्य एकादशीला पालखी पैठणला परत येते.