पंढरपूर ; पुढारी वृत्तसेवा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दुसर्या वर्षीही पालखीची परंपरा जपण्यासाठी प्रातिनिधीक व मर्यादित स्वरूपात आषाढी यात्रा भरवण्यात येत आहे. सोहळ्याच्या पूर्वसंध्येेला मानाच्या 10 पालख्या दुपारी वाखरीत दाखल झाल्या. तेथून वारकर्यांनी पंढरीपर्यंत वारी काढली.
निर्बंधांमुळे वारीवर मर्यादा असल्यातरी आषाढी सोहळ्यात उत्साह मात्र कायम आहे. आषाढी सोहळ्यासाठी मर्यादित का असेना पण वैष्णवांचा मेळा जमला आहे.
ठिकठिकाणी भाविकांनी पालखी ठेवलेल्या बसचे रस्त्याच्या कडेला थांबून, त्यावर फुलांचा वर्षाव करत हात जोडून दर्शन घेत तेथूनच पंढरीची वारी पोहोचती केली. आज मंगळवारी 400 जणांच्या वारकरी-संतांच्या उपस्थितीत मर्यादित स्वरूपात; पण उत्साही वातावरणात आषाढी सोहळा साजरा होत आहे.
वर्षानुवर्षे एकादशी निमित्ताने पंढरीत परंपरेनुसार वैष्णवांचा आषाढी मेळावा पार पडावा, विठ्ठल नामाचा खुलेआम जयघोष व्हावा, लाडक्या विठुरायाचे यानिमित्ताने पंढरीत थेट दर्शन व्हावे, यासाठी देशभरातील वारकर्यांना आस लागून राहिली होती. परंतु, यंदाही कोरोनाचे सावट कायम असल्याने दुसर्या वर्षीही आषाढी यात्रा सोहळा न भरवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
यामुळे पंढरपूर च्या आसपासच्या नऊ गावांत यात्रेदरम्यान 22 जुलैपर्यंत, तर पंढरपुरात 25 जुलैपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. संचारबंदीमुळे पंढरीनगरी सामसूम आहे. शहरातील भक्तीमार्ग, प्रदक्षिणामार्ग रिकामे आहेत. परंतु, प्रातिनिधीक स्वरूपात 10 मानाच्या पालख्या बसने वाखरीत आणि तेथून पंढरीत आणण्यास परवानगी देण्यात आली. यासाठी 400 प्रमुख वारकरी, संतांना विठ्ठल दर्शनाची मुभा देण्यात आली आहे. त्याअंतर्गत या सर्वांच्या उपस्थितीत वाखरी ते पंढरी पायी पालखी काढण्यासही परवानगी दिली.
वाखरी पालखी तळ येथे मानाच्या दहा पालख्या दाखल होताच श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक मनोज लोहिया, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, प्रांताधिकारी सचिन ढोले, आमदार प्रशांत परिचारक, आमदार समाधान आवताडे, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, सदस्य संभाजी शिंदे, उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम, नगराध्यक्षा साधना भोसले आदींनी स्वागत केले.
आषाढी एकादशीचा आजच्या मुख्य सोहळ्याच्या पूर्व संधेला म्हणजेच दशमीला (दि. 19 रोजी) दुपारी या दहा पालख्या बसने वाखरी (ता. पंढरपूर) येथील पालखीतळावर दाखल झाल्या. प्रत्येक पालखी सोहळ्यात 2 बसेस व प्रत्येक बसेसमध्ये 20 परवानाधारक मानकरी होते.
प्रत्येक पालखी सोहळ्याच्या पुढे पोलीस गाडी, त्यानंतर पालखी सोहळा असणारी एस.टी. बस व त्यांच्यासमवेत रुग्णवाहिका, असा मानाच्या पालख्यांचा ताफा कडक बंदोबस्तात दाखल झाला.
वाखरी पालखीतळ येथे या पालख्यांचे श्री विठ्ठल मंदिर समितीच्यावतीने मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. यानंतर येथून पालख्या पायी वारी सोहळ्यासाठी पंढरपूरकडे मार्गस्थ झाल्या. वाखरी ते विसावा मंदिरदरम्यान वाखरी येथे होणारे उभे रिंगण रद्द करण्यात आल्याने पालख्या थेट विसावा मंदिर इसबावी येथे दाखल झाल्या.
येथेही रांगोळ्यांसह फुलांनी रस्ते सजवून उत्साहात स्वागत करण्यात आले. विसावा मंदिर ते पंढरपूर यादरम्यान पायी पालखी वारी सोहळ्यात प्रतिपालखी केवळ दोन भाविकच सहभागी झाले होते. इतर भाविकांना तेथून बसने थेट त्यांच्या मठात नेण्यात आले.
पंढरपूर शहरात पालखी सोहळ्याचा प्रवेश होताच रस्त्यांवर रेखाटण्यात आलेल्या आकर्षक रांगोळ्यांनी मानाचे भाविक भारावून गेले. पालख्या येणार्या मार्गांवरील नागरिकांनी घराच्या गॅलरीतून, छतावरुन पृष्टवृष्टी करत पालख्यांचे स्वागत केले. मात्र पालखी सोहळ्यांचे एरवी ज्या पध्दतीने मोठ्या उत्साहाने गर्दीने स्वागत होते ती उणिव आज भासत होती.
मंगळवारी पहाटे महापूजा आणि त्यानंतर विधिवत सर्व पूजा झाल्यानंतर दर्शनासाठी दिंडीसोबत असलेल्या 400 जणांनाच मुख दर्शनाची सोय करण्यात आली आहे.
यावर्षीही आषाढी वारी भव्य स्वरूपात नसली तरी तितक्याच भक्तीभावाने, उत्साहाने आणि परंपरेनुसार जल्लोषात साजरी होत आहे. प्रशासनासह मंदिर सामितीने या अविस्मरणीय सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आल्याचे विठ्ठल जोशी यांनी सांगितले. भक्तांना या सर्व सोहळ्यांसह विठुरायाचे थेट ऑनलाईन स्वरूपात दर्शन होणार आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वारीमध्ये कोरोनाचा संसर्ग उद्भवू नये म्हणून महत्त्वाच्या ठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवला आहे. त्रिस्तरीय पोलिस बंदोबस्त असून याकरिता 3 हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
चंद्रभागा नदीकाठावरील घाट बॅरेकेडिंग करुन बंद करण्यात आलेले आहेत. मंदिर परिसर बॅरेकेडिंग करुन बंद करण्यात आलेला आहे. यानिमित्ताने पंढरपुरात पोलिसांच्याच मोठ्या संख्येने उपस्थितीतीत हा वारीचा सोहळा होत आहे. सुरक्षेसाठी ठिकठिकाणी सीसीटीव्हींमार्फत लक्ष ठेवण्यात येत आहे.