Latest

पंढरपूर : भारतातील हिदूंची मंदिरे सरकारमुक्‍त करा

अमृता चौगुले

पंढरपूर : पुढारी वृत्तसेवा :  पंढरी ही साक्षात कृष्णाचा अवतार असणार्‍या विठुरायाची असून येथील मंदिर सरकारीकरणामधून मुक्‍त झाले पाहिजे. हिंदूंची मंदिरे सरकारच्या ताब्यात असून ती पुन्हा संत, महंत यांच्या ताब्यात द्यावीत. देशात कर्नाटकात सर्वात प्रथम असा कायदा होत असून सर्वच राज्यांत तो करावा, यासाठी आम्ही प्रयत्न सुरू केले आहेत, अशी माहिती महामंडलेश्‍वर अखिलेश्‍वरदास यांनी दिली.

वारकरी सांप्रदायातील महाराज मंडळींबरोबर बैठक घेण्यासाठी अखिलेश्‍वरदास पंढरपूरच्या दौर्‍यावर आले आहेत. यावेळी त्यांनी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या भक्त निवास येथे पत्रकारांशी संवाद साधला.

सध्या देशभरात काश्मीर फाईल्स वरून जोरदार वादंग सुरू असून अनेक वर्षांपासूनचे सत्य बाहेर आले आहे. विश्‍व हिंदू परिषद तसेच विविध संघटना हे वारंवार काश्मिरी पंडितांवरील अत्याचाराबाबत माहिती देत होत्या. परंतु, या सिनेमामुळे हा अन्याय जगासमोर आला असल्याचे अखिलेश्‍वरदास यांनी सांगितले.

भाजपचे सरकार आल्यापासून हिंदू व मुस्लिम यांच्यामध्ये उभी फूट पडली असून, यास हिंदुत्ववादी संघटना जबाबदार असल्याचा आरोप होत आहे. या प्रश्‍नावर त्यांनी, हजारो वर्षांपासून 'वसुधैव कुटुंबकम्' अशी हिंदूंची संस्कृती आहे. याचा अर्थ 'सर्व जग एका कुटुंबाप्रमाणे एकत्र आनंदात राहावे' असा आहे. आम्ही स्वार्थी असतो तर 'वसुधैव हिंदू कुटुंबकम्'अर्थात 'केवळ हिंदू कुटुंब सुखी राहो' असे म्हणालो असतो. परंतु, आमच्या पूर्वजांनी 'सर्वेपि सुखीनः' अर्थात 'सर्वजण सुखी राहो' असा मंत्र आम्हाला शिकवला व आजही केवळ हिंदूच सर्वांना बरोबर घेऊन जगू शकतात, हे सिध्द झाले आहे. मात्र, काहीजण जाणीवपूर्वक आमच्या धर्माच्या विरोधात वागतात. त्यांनी जे पेरले आहे, तेच त्यांना मिळणार आहे. काश्मीर फाईल्स सारखे सिनेमे मोदी व योगी यांच्याच काळात येणार यामध्ये आश्‍चर्य काय आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

सध्यादेखील काश्मिरमध्ये पंडितांसाठी घरे बांधणे व इतर विकास कामे होत आहेत. काश्मीर फाईल्स सारखे सिनेमे बनणे गरजेचे असून यामधून हिंदूंवर झालेल्या अत्याचाराची माहिती आज जगभरात पोहोचली आहे. यानंतरही हिंदू सुधारले नाहीत, तर पुढील काळात भारत फाईल्स बनवला जाईल, अशी भीती महामंडलेश्‍वर अखिलेश्‍वरदास यांनी व्यक्त केली.

सत्तेसाठी शिवसेनेने हिंदूत्व सोडले

शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचा आम्ही प्रखर हिंदुत्ववादी नेता म्हणून आदर करतो. परंतु, त्यांच्या मुलाने सत्तेसाठी हिंदूत्व सोडून दिले. मुख्यमंत्रिपदासाठी उध्दव ठाकरे हे लालची झाल्याची टीका केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT